चाळीसगाव- बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

शिवनंदन बाविस्कर
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

पिलखोड(ता. चाळीसगाव) - तामसवाडी(ता. चाळीसगाव) येथील मांजरी जंगललगतच्या शेती शिवारात काल(ता. 1) सायंकाळी सहाच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळी ठार झाल्याची घटना घडली. या हल्ल्यामुळे परिसरात भीती पसरली आहे.

पिलखोड(ता. चाळीसगाव) - तामसवाडी(ता. चाळीसगाव) येथील मांजरी जंगललगतच्या शेती शिवारात काल(ता. 1) सायंकाळी सहाच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळी ठार झाल्याची घटना घडली. या हल्ल्यामुळे परिसरात भीती पसरली आहे.

पिलखोडपासून दोन किलोमीटर अंतरावर तामसवाडी(ता. चाळीसगाव) गाव आहे. येथील शेतकरी कृष्णा बाबुलाल पाटील यांची शेती मांजरी जंगल भागात आहे. शेतात त्यांच्या चार शेळ्या डाळींबाच्या बागेत बांधलेल्या होत्या. काल(ता. 1) सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक बिबट्या आला आणि त्याने एका शेळीवर हल्ला केला. शेतात काम करणार्यांनी ती घटना स्वतः डोळ्याने पाहिली. शेतकर्यांनी भ्रमणध्वनीद्वारे गावातील काही जणांना कळवून मदतीसाठी बोलावले. मात्र तोपर्यंत बिबट्याने त्या शेळीला ठार केले होते. काही ग्रामस्थांच्या जमावाने बिबट्याला हाकलले. बिबट्या मृत शेळीला सोडून जंगलात पळून गेला. दरम्यान, कृष्णा पाटील यांचे सुमारे नऊ हजारांचे आर्थिक नुकसान झाले असून भरपाईची मागणी होत आहे.

बिबट्याच्या हल्ल्यांमधे कमालीची वाढ

दोन दिवसांपुर्वी तिरपोळे(ता. चाळीसगाव) शिवारात पिनल गायकवाड व कुटुंबियांना बिबट्याचे दर्शन घडले होते. त्यांनी याबाबत वनविभागाला माहिती देखील दिली होती. त्यानुसार वनविभागाच्या कर्मचार्यांनी प्रत्यक्षदर्शींचा जबाब नोंदवून घेतला. यापूर्वी बिबट्याने उंबरखेड(ता. चाळीसगाव) येथील एका बालकाला ठार केले होते. तसेच वरखेडे(ता. चाळीसगाव) शेती शिवारात बोकड व वासरुंना बिबट्याने फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत.