डॉ. पूर्णपात्रेंच्या इतिहासाला शार्पशूटरच्या चर्चेत उजाळा

डॉ. पूर्णपात्रेंच्या इतिहासाला शार्पशूटरच्या चर्चेत उजाळा

चाळीसगाव - गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्‍यात बिबट्याची दहशत पसरली आहे. तब्बल सात बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालण्यासाठी हैदराबादहून शार्पशूटर बोलावले आहेत. यानिमित्ताने १९७० च्या दशकात राज्यात प्रसिद्ध असलेले शार्पशूटर डॉ. वा. ग. पूर्णपात्रे यांच्या स्मृतींना उजाळा मिळाला.

पाटणादेवी परिसरात ३०-३५ वर्षांपूर्वी वाघांसह बिबट्यांचा वावर होता. फर्दापूर ते सिन्नरपर्यंत घनदाट अभयारण्य होते. या परिसरात ४० वर्षांपूर्वी कुठेही हिंस्र प्राण्यांचा उपद्रव झाल्यास शार्पशुटर म्हणून प्रसिद्ध असलेले व बंदुकीचा अधिकृत परवाना असलेले एकमेव डॉ. वामन गणेश पूर्णपात्रे ऊर्फ काका यांना वन विभागाकडून बोलावणे व्हायचे. सध्या शार्पशुटरच्या या चर्चेमुळे डॉ. पूर्णपात्रेंच्या स्मृतींना तालुक्‍याला उजाळा मिळाला आहे. 

तालुक्‍यातील बिबट्याच्या उपद्रवामुळे १२२ जणांचे पथक त्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यामध्ये देशात प्रसिद्ध असलेले शार्पशुटर नवाब खान आले आहेत. गौताळा अभयारण्यात नऊ बिबट व दोन बछड्यांची अधिकृत आकडेवारी यापूर्वी वनविभागाने प्रसिद्ध केली आहे. कधीकाळी वाघाचे अस्तित्व असलेल्या या घनदाट जंगलात नरभक्षक बिबट्या गिरणा परिसरात हैदोस घालत आहे. आज डॉ. पूर्णपात्रे यांचा दांडगा अभ्यास या बिबट्याला पकडण्यासाठी कामी आला असता, अशी चर्चा तालुक्‍यात होत आहे. पंचवीस कॅमेरे, नऊ पिंजरे, तीन मानवी मनोरे, चार गस्ती पथके व पाच शार्प शूटर असा फौजफाटा सध्या बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कधीकाळी गौताळा, यावल व उत्तर महाराष्ट्रातील जंगल परिसरात अशा नरभक्षक व वाघ यांच्या हल्ल्याच्या घटनांप्रसंगी डॉ. पूर्णपात्रे यांना बोलाविले जात होते.

‘सोनाली’ सिंहिणीचे केले पालन 
१९८४ मध्ये सायगाव परिसरात डॉ. पूर्णपात्रे यांनी वाघाला बेशुद्ध करून पिंजऱ्यात केले होते. एवढेच नव्हे, तर ‘सोनाली’ नावाच्या सिंहिणीला त्यांनी आपल्या घरात वाढविले होते. यामुळे त्यांचा दबदबा राज्यासह देशात होता. सध्या नरभक्षक बिबट्याच्या चर्चेमुळे डॉ. पूर्णपात्रेंच्या इतिहासाला उजाळा मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com