पावसाअभावी गुरांच्या बाजारात मंदी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

चाळीसगावातील चित्र; खरेदी-विक्रीअभावी मंदावले व्यवहार

चाळीसगाव - येथील बाजार समितीच्या शनिवारच्या गुरांच्या बाजारात पहिल्यांदा अत्यंत कमी प्रमाणात गुरे विक्रीला आली होती. पावसाने डोळे वटारल्यामुळे शेतकऱ्यांनी या बाजाराकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. सध्या शेतीची कामे सुरू असल्याने शेतकऱ्यांनी शेतातच राहणे पसंत केले. दरम्यान, आजचा बाजार हा वर्षातील सर्वाधिक मंदीचा बाजार ठरला. 

सुमारे महिन्यापासून पाऊस गायब झाला आहे. रिमझिम पाऊस वगळता कुठेही मुसळधार पाऊस झालेला नाही. काही भागात पिके तरारलेली दिसून येत असली तरी काही भागात पाण्याअभावी पिके पिवळी देखील पडत आहेत. परिणामी, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. अशा परिस्थितीत गुरांच्या बाजाराकडे शेतकऱ्यांनी सपशेल पाठ फिरविली आहे. त्यामुळे आजच्या बाजारात गुरांची तुरळक आवक दिसून आली. ज्या गरजू शेतकऱ्यांना पैशांची आवश्‍यकता होती, अशांनीच आपली जनावरे विक्रीसाठी आणली होती. 

व्यापाऱ्यांनीही फिरविली पाठ 
पावसाची परिस्थिती, शेतीची सुरू असलेली कामे, दुबार पेरणीचे संकट अशा अनेक कारणांचा विचार करून व्यापाऱ्यांनी या बाजाराकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. बाजारात खरेदीदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहता, बहुतांश व्यापारी रात्री किंवा भल्या पहाटे आपली गुरे विक्रीला आणतात. वरखेडी, धुळे, नांदगाव, सायगाव, कन्नडसह औरंगाबाद व जालना भागातील व्यापारी येथील बाजारात येतात. आजच्या बाजारात मात्र मोजकेच व्यापारी व ते देखील कमी गुरे घेऊन आले होते. आजच्या बाजारात बैलांसह म्हशी व शेळ्या- मेंढ्यांची आवक जवळपास नव्हती. गुरांचे विविध साहित्य विकणाऱ्यांच्या व्यवसायांवरही विपरीत परिणाम दिसून आला.