वृद्धाच्या खुनाच्या शोधाचे पोलिसांपुढे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जुलै 2016

11 जूनला सोनाळा (ता. जामनेर) गावापासून दोन किलोमीटर अंतरावर काशामळा शिवारात संध्याकाळी एका 80 वर्षीय वृध्दाचा दगडाने ठेचून खून झाल्याची धक्‍कादायक घटना घडली होती. या खुनामागे कोण याचा तपास पोलिसांनी सुरु केला असला तरी या खुनाचा शोध घेणे हे पोलिसांपुढील सध्यातरी मोठे आव्हानच असल्याचे वाटत आहे.

11 जूनला सोनाळा (ता. जामनेर) गावापासून दोन किलोमीटर अंतरावर काशामळा शिवारात संध्याकाळी एका 80 वर्षीय वृध्दाचा दगडाने ठेचून खून झाल्याची धक्‍कादायक घटना घडली होती. या खुनामागे कोण याचा तपास पोलिसांनी सुरु केला असला तरी या खुनाचा शोध घेणे हे पोलिसांपुढील सध्यातरी मोठे आव्हानच असल्याचे वाटत आहे.

जामनेर तालुक्‍यातील सोनाळा येथील शिवाजी उखर्डू पाटील (वय 80) हे घटनेच्या दिवशी रात्री आठ वाजेच्या सुमारास घरातून काही कामासाठी बाहेर गेले असता साधारणपणे तास दीड तास उलटून देखील घरी परत न आल्याने कुटुंबियांना चिंता वाटू लागली. त्यानंतर कुटुंबियांनी त्यांचा गावालगत शोध घेतला असता ते कुठेही आढळून आले नाहीत. त्यामुळे कुटुंबियांना अधिकच चिंता वाटू लागली होती.

मुळव्याध व्याधीवर उपाय करणारे घरगुती वैद्य
शिवाजी पाटील हे परिसरात मुळव्याध याच्या उपचारासाठी प्रसिध्द होते. कदाचित उपचारासाठी शेजारच्या गावातील कुणीतरी व्यक्‍ती त्यांना घेऊन गेला असावा असा अंदाज त्यांच्या कुटुंबियांनी घेतला व सकाळपर्यत वाट पाहिली. परंतु सकाळपर्यंत देखील घरी परत न आल्यामुळे पुन्हा त्यांचा शोध घेण्याचे काम कुटुंबियांनी सुरु केले.

नातवाला सापडला मृतदेह
आजोबांचा तपास करीत गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या काशामळा शेती शिवारात पोहचल्यानंतर नातू सुनील अवधुत पाटील यांना तेथील रस्त्याच्या कडेला आजोबा शिवाजी पाटील यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी लागलीच कुटुंबियांसह पहूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी तत्काळ पहूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक माहेन बोरसे, पोलिस हेडकॉन्स्टेबल अतुल तडवी, विनायक सानप, अनिल अहिरे पोहचले व घटनास्थळावरील मृतदेहाची पाहणी केली असता मृत शिवाजी पाटील यांच्या डोक्‍यावर दगडाने वार केल्याचे दिसत होते. त्यांच्या मृतदेहाशेजारी साधारण 20 किलो वजनाचा दगड रक्‍ताने माखलेला आढळला. त्यावरुन त्यांचा निर्घृण खुन झाल्याचे पोलिसांच्या प्रथमदर्शनी लक्षात आले.

सोन्याच्या अंगठीसाठी खून ?
मृतदेहाची पाहणी केली असता कुटुंबियांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृताच्या हातात घटनेपूर्वी एक तोळ्याची सोन्याची अंगठी होती. परंतु आजोबांच्या हातातील अंगठी गायब आहे असे दिसून आले. त्यामुळे हा खून चोरीच्या उद्देशाने झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला. दरम्यान घटनास्थळी चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, पोलिस उपअधीक्षक रमेश गावित यांनी भेट देवून घटनेची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांच्याकडून घेतली.
 

श्‍वान पथक पाचारण
दरम्यान, घटनास्थळी श्‍वान पथकाला देखील बोलाविण्यात आले. त्यानुसार श्‍वान हे जवळच असलेल्या एका विहिरीजवळ जाऊन घुटमळताना दिसले. तसेच ठसे तज्ञाकडून घटनास्थळावरील नमुन्यांची चाचपणी करण्यात आली.
 

या घटनेबाबत धागेदोरे मिळाले असून त्याआधारे तपास सुरु असून लवकरच आरोपीचे निष्पन्न होऊन हा गुन्हा उघडकीस आणू.
- मोहन बोरसे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पहूर