जवान चंदू चव्हाण घरी परतले, आनंदाला उधाण 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मार्च 2017

आमचा चंदू परत येणार याची खात्री होती. तो आल्याचा आम्हा कुटुंबीयांना आनंद झाला आहे. भामरेसाहेबांमुळेच आम्हाला आज चंदू दिसत आहे. त्यांच्यासह परमेश्‍वराचे आम्ही आभार मानतो. चंदूचा पाकिस्तानने अनन्वित छळ केला आहे. आज तो खूप थकलेला आहे. अजून दोन-तीन दिवस आराम केल्यानंतर त्याच्या हस्ते त्याच्या आजीच्या अस्थींचे विसर्जन केले जाईल. 
- चिंधा पाटील, जवान चंदू चव्हाण यांचे आजोबा

धुळे : गस्तीवर असताना अनवधानाने नियंत्रणरेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेलेले बोरविहीर (ता. धुळे) येथील जवान चंदू चव्हाण यांच्या यशस्वी सुटकेनंतर शनिवारी ते आपल्या गावी बोरविहीरला परतले. धुळ्यात त्यांच्या स्वागतासाठी मिरवणूक काढण्यात आली.

दुपारी एकला त्यांचे गावी आगमन झाले. धुळेकरांसह बोरविहीरवासीयांसाठी आजचा आनंदाचा दिवस ठरला. चंदू यांना पाहताच त्यांच्या आजोबांसह कुटुंबीय अन्‌ गावकऱ्यांना आनंदाश्रू अनावर झाले. 

दरम्यान, या साऱ्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी सर्वांच्या सहकार्यामुळे जवान चंदू सुखरूप परतल्याचे सांगून गावकरी करू इच्छित असलेल्या सत्काराला कृतज्ञतापूर्वक नकार दिला. जवान चंदू चव्हाण गेल्या वर्षी 29 सप्टेंबरला अनवधानाने पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. तेव्हापासून ते पाकिस्तानच्या ताब्यात होते. जानेवारीत ते सुखरूप मायदेशी परतले होते. त्यानंतर आज दुपारी डॉ. भामरे यांच्यासमवेत त्यांचे धुळ्यात आगमन झाले. त्यांचे नागरिकांनी जंगी स्वागत केले. चंदू यांचे कुटुंबीय, नागरिक, बोरविहीरचे ग्रामस्थ उपस्थित होते. 

जिल्ह्यासाठी आनंदाचा दिवस 
डॉ. भामरे म्हणाले, की धुळेकरांसाठी आज आनंदाचा दिवस आहे. चंदू यांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू होते. बोरविहीर येथे जाऊन आपण चंदू यांच्या कुटुंबीयांची भेटही घेतली होती. त्यांनाही आपण चंदू यांना परत आणू, असा शब्द दिला होता. तो आज पूर्ण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळे ते आज आपल्यात परतले आहेत.