राष्ट्रवादीला विसंवादाच्या कलहाचे ग्रहण

राष्ट्रवादीला विसंवादाच्या कलहाचे ग्रहण

नाशिक - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी लवकरच आचारसंहिता लागू होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे राजकारण तापू लागले आहे. या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विसंवाद, अंतर्गत कलहामुळे पुढच्या निवडणुकीत सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य जिल्हाध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत, तर पदाधिकाऱ्यांतील कलगीतुऱ्याचे जाहीर प्रदर्शन सुरु झाले आहे.

जिल्ह्यात गेल्या पंधरा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे छगन भुजबळ अशी परिस्थिती असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत निवडणुक लढविण्याबाबत इच्छुक चाचपडत आहेत. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांनी नाशिकमधून राजकारणास प्रारंभ केल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर एकहाती नियंत्रण मिळविले. तसे करताना त्यांनी पक्षाच्या प्रस्थापितांना पद्धतशीरपणे बाजुला ठेवण्याचे डावपेच खेळले. भुजबळ यांची पक्षावर पकड व सत्तेतील सहभाग या मुळे नवीन कार्यकर्त्यांना संधी देऊनही पक्षाच्या शक्तीवर काहीही परिणाम होत नव्हता. परंतु राज्यात व केंद्रातील सत्तांतरानंतर स्वतः भुजबळांनाच तुरूंगात जावे लागल्यामुळे येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये पोरकेपणाची भावना झाली आहे. 

राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेतृत्त्वानेही भुजबळांच्या अनुपस्थितीत पक्षाची जबाबदारी सांभाळण्यासाठी सक्षम प्रभारी नेत्याची नियुक्ती करण्यास रस घेतला नाही. सुरूवातीच्या काळात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दोन-तीन वेळा बैठका घेतल्या,पण "वन डे आऊटींग' पलिकडे त्यांचा रस नसल्याचे येथील पदाधिकाऱ्यांच्याही लक्षात आले. तसेच पक्षातून त्यांना फारशी मोकळीक न दिल्याच्या कारणामुळे त्यांनीही तटस्थ राहण्याची भूमीका घेतल्याचे बोलले जाते. यामुळेच सध्या जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची ग्रामीण भागात ताकद असूनही नेतृत्त्वाच्या अभावामुळे त्या ताकदीचे विजयात रुपांतर करण्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. 

मागील महिन्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकीत याचे प्रत्यंतर आल्यामुळेच जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हाध्यक्ष बदलाबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्याचे जिल्हाध्यक्ष हे तालुकावार बैठका घेऊन जिल्हा परिषदेची तयारी करीत असल्याचे चित्र असले तरी निवडणुकीतील इच्छुकांचाच त्यांच्यावर विश्‍वास नसल्याचे चित्र आहे. त्यातच मागील निवडणुकीत अपक्ष म्हणून विजयी झालेल्या सौ. किरण थोरे व सौ. विजयश्री चुंभळे यांच्यात मागील महिन्यापासून धुसफुस सुरू आहे. या दोन्ही सदस्यांनी निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्यत्व घेतले आहे. म्हणजेच जिल्हा परिषदेत सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमधील विसंवादाचा मतदारांमध्ये चुकीचा संदेश जात आहे. राष्ट्रवादीचे बहुतेक सदस्य, पदाधिकारी त्यांच्या गटात प्रबळ आहेत, तेथे निवडून येण्याची वा आरक्षित जागांवर दुसऱ्यांना निवडूून आणण्याची त्यांची व्यक्तिगत पातळीवर क्षमता आहे. परंतु या सर्वांना एकत्र बांधून ठेवणाऱ्या नेतृत्त्वाचा अभाव आहे. यामुळे अशा विस्कळित अवस्थेत निवडणुकांना सामोरे जाण्यामुळे नगरपालिका निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याचा धोका असल्याची कार्यकर्त्यांची भावना निर्माण होऊ लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com