रेल्वेस्थानकातील अस्वच्छतेसाठी होणार दंड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

रेल्वेस्थानक आणि गाड्यांमध्येही स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे आणि याची जबाबदारी प्रशासनाची, तशी प्रवाशांचीही आहे. याबाबत प्रवाशांना वारंवार सूचना केल्यानंतरही मानसिकता बदलण्यास तयार नाही

भुसावळ - अस्वच्छतेबाबत वारंवार सूचना करूनही प्रवाशांना शिस्त लागत नाही, म्हणून रेल्वे प्रशासनातर्फे स्थानकात अस्वच्छता करणाऱ्यांना दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच संपूर्ण भुसावळ विभागात लावण्यासाठी 1200 फलके तयार करण्याच्या सूचना विभागीय रेल्वे प्रबंधक राम करण यादव यांनी दिल्या आहेत. त्यामुळे स्थानकात अस्वच्छता करणारे प्रवासी, वेंडर अथवा जो कोणी दोषी सापडेल, त्याला भुर्दंड सहन करावा लागणार आहे. दरम्यान, मागील महिन्यात स्थानकातील फलक हटविण्याच्या कारवाईनंतर विभागीय रेल्वे प्रबंधक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील दोन शुभेच्छाफलक अद्याप कायम दिसून आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छतेची मोहीम सुरू केली आहे. गावागावांमध्ये याबाबत अंमलबजावणी सुरू आहे, तशी रेल्वेस्थानक आणि गाड्यांमध्येही स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे आणि याची जबाबदारी प्रशासनाची, तशी प्रवाशांचीही आहे. याबाबत प्रवाशांना वारंवार सूचना केल्यानंतरही मानसिकता बदलण्यास तयार नाही.

अधिकाऱ्यांची बैठक
नवनियुक्त विभागीय रेल्वे प्रबंधक यादव यांनी हे लक्षात घेऊन आज सकाळी बैठक घेऊन वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा व अधिकाऱ्यांना अंमलबजावणीच्या सूचना केल्या. त्यानुसार भुसावळ विभागात भुसावळसह नाशिक ते बडनेरा आणि खंडव्यापर्यंतच्या स्थानकांमध्ये स्वच्छता राखण्याच्या सूचना देणारी 1200 फलके तयार करावीत, असे सांगितले.

दंडाचा अहवाल
अस्वच्छता करणाऱ्याला दंड केला जाईल, असा स्पष्ट निर्देश या फलकांवर दिला जाणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासात कुठेही आणि कशीही घाण केली, तरी आपले काही बिघडत नाही, अशा अविर्भावात वावरणाऱ्या विशेषत: उत्तर प्रदेश, बिहारच्या प्रवाशांना आळा बसणार आहे. उत्तर प्रदेश, बिहारकडून येणाऱ्या गाड्यांमध्ये सर्वांत जास्त अस्वच्छता असते, अशी सामान्य प्रवाशांची ओरड आहे. अस्वच्छतेसाठी दंड करण्याच्या सूचना करून श्री. यादव थांबलेले नाहीत, तर किती प्रवाशांना दंड केला, याचा अहवाल रोज श्री. यादव यांना देणे बंधनकारक केले आहे. या कामाची सुरवात अधिकाऱ्यांनी केली आहे.

संपूर्ण विभागाची पाहणी
पदभार स्वीकारल्यानंतर श्री. यादव संपूर्ण विभागाची माहिती जाणून घेत आहेत. त्याचा भाग म्हणून आज सकाळी ते मनमाडला रवाना झाले. त्याआधी सकाळी सातलाच अधिकाऱ्यांना बोलावून त्यांनी स्वच्छतेविषयक कामांच्या सूचना केल्या. गेल्या महिन्यात श्री. यादव यांनी भुसावळ स्थानकातील सर्व फलाट, तिकीट कार्यालय, सायकल तळ, लोहमार्ग पोलिस ठाणे, बसस्थानक, त्यासमोरील वसाहती आदींची पाहणी केली. तसेच स्थानकात ठिकठिकाणी लावलेले शुभेच्छाफलक हटविण्याच्या सूचना केल्या होत्या.

Web Title: clean initiative in Bhusaval