महास्वच्छता अभियान यशस्वितेचा निर्धार

jalgaon municipal corporation
jalgaon municipal corporation

जळगाव - महास्वच्छता अभियानासंदर्भात आज पूर्वनियोजनाच्या झालेल्या बैठकीत महापालिका प्रशासन अधिकारी, पदाधिकारी तसेच सहभागी विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी हे अभियान यशस्वी करण्याचा निर्धार केला. तसेच सहभागी संस्थांच्या प्रतिनिधींनी विविध सूचना प्रशासनापुढे मांडून अभियान अधिक चांगल्याप्रकारे कसे यशस्वी करता येईल, याबाबत विविध सूचना केल्या. अभियानासंदर्भात सूक्ष्म नियोजन करण्याचेही यावेळी ठरविण्यात आले.

महापालिकेतर्फे संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण जळगाव शहरात 20 डिसेंबरला महास्वच्छता अभियान राबविले जाणार आहे. त्यानिमित्त महापालिका प्रशासकीय इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात आज सकाळी अकराला महास्वच्छता अभियानाची पूर्वनियोजन बैठक महापौर नितीन लढ्ढा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आयुक्त जीवन सोनवणे, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, स्थायी समितीच्या सभापती वर्षा खडके, नगरसचिव निरंजन सैंदाणे व्यासपीठावर होते. आयुक्त सोनवणे यांनी अभियानाची माहिती सांगून यात सहभागी संस्थांचे अभिनंदन केले.

स्पर्धेत सहभाग
देशभरातील पाचशे शहरांतील या स्वच्छतेच्या स्पर्धेत आपण सहभागी असून, याची जानेवारीत गुणवत्ता चाचणी होईल. या लोकसहभाग स्वच्छता अभियानातून चांगले गुण मिळण्यासाठी मोठा फायदा मिळेल. यावेळी महापौर लढ्ढा म्हणाले, की कुठलीही चळवळ लोकसहभागातून यशस्वी होते. या अभियानात शहरातील विविध संस्था, विद्यार्थी, नागरिकांनी सहभाग घेतला, याचा आनंद आहे. यावेळी विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी सूचना केल्या. प्रकल्प समन्वयक उदय पाटील यांनी सूचना नोंदवून अभियानाची सविस्तर माहिती दिली.

साहित्य खरेदीसाठी एजन्सी
महास्वच्छता अभियानात संस्थांना होलसेल भावात साहित्य खरेदी करण्यासाठी महापालिकेने एजन्सी नियुक्त केली आहे. खराटा खरेदीसाठी एमआयडीसीतील मोहन उद्योग 20 रुपये नगाप्रमाणे खराटा देईल, तर टोपली 35 रुपये नगाप्रमाणे पंकज जैन यांची एजन्सी देणार आहे. सहभागी संस्थांनी आपले सहभागाचे पत्र दाखवून हे साहित्य खरेदी करावयाचे आहे.

कचरा संकलनावर दुप्पट खर्च
आयुक्त सोनवणे म्हणाले, की महापालिकेला शहरात कचरा संकलनासाठी दुप्पट खर्च करावा लागत आहे. कचरा संकलनासाठी घंटागाडी तसेच कचराकुंड्यांतील कचरा उचलण्यासाठी दुसरी व्यवस्था करावी लागत आहे. नागरिकांनी इतरत्र कचरा न टाकता जर घंटागाडीत तो टाकला तर हा डबल खर्च व वाहने दुसऱ्या विकासकामासाठी वापरता येऊ शकेल.

संस्थांच्या सूचना अशा
महास्वच्छता अभियानाच्या पूर्वनियोजनासाठी आज झालेल्या बैठकीत विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी अभियानाबाबत सूचना केल्या. त्यात हॅण्डग्लोज, मास्क मिळावे, स्वच्छतेबरोबरच शहरात अनेक ठिकाणी लागलेले चित्र-विचित्र पोस्टर, झाडे-झुडपे, रस्त्यावरील दगडगोटे उचलण्यासाठी वेगवेगळी पथके नेमावीत, परिसर दत्तक घेणे, अभियानातून स्वच्छतेचे सर्वेक्षणही करावे आदींचा समावेश आहे.

वर्षातून दोनदा अभियान राबवा
स्वच्छता अभियानाच्या बैठकीत एका सहभागी संस्थेच्या प्रतिनिधीने या प्रकारचे अभियान शहरात वर्षभरात दोनवेळा राबवावे. त्यामुळे स्वच्छतेबाबत सातत्य राहून शहर स्वच्छ व निरोगी राहू शकेल, अशी सूचना केली.

बावीस हजार नागरिकांचा सहभाग
महास्वच्छता अभियानात 137 सेवाभावी संस्था, शासकीय कार्यालये, विविध शाळा, महाविद्यालये, विद्यापीठाचे कर्मचारी असे बावीस हजार नागरिक, विद्यार्थी सहभाग नोंदविणार आहेत. तसेच प्रत्येक प्रभागातील
नगरसेवक, प्रभाग अधिकारी, अभिनयाचे 24 समन्वयक असतील. महापालिकेच्या सर्व वाहनांद्वारे कचरा उचला जाईल. सहभागी संस्थांना स्वच्छ करण्यासाठी स्थान निश्‍चित करून त्यांना फोनद्वारे लवकरच कळविले जाईल, अशी माहिती समन्वयक उदय पाटील यांनी यावेळी दिली.

"सकाळ संवाद ऍप्स'ने होईल जनजागृती
स्वच्छता अभियान पूर्वनियोजन बैठकीत समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. नीलेश चौधरी यांनी सूचना केल्या. यात या अभियानात समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभाग घेऊन अभियानाची जनजागृती करणार आहेत. तसेच "सकाळ माध्यम समूहा'ने "सकाळ संवाद ऍप्स' हे माध्यम आणले आहे. त्यात या अभियानाची अधिकाधिक चांगल्याप्रकारे जनजागृती होऊ शकते. तसेच या ऍप्सवर शहरात अस्वच्छतेबाबत फोटो टाकल्यास समस्येवर चांगल्याप्रकारे नियंत्रण मिळविता येऊ शकते, असे मत प्रा. चौधरी यांनी यावेळी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com