लोकाभिमुखतेसाठी जिल्हा प्रशासन "मिशन मोड'वर 

लोकाभिमुखतेसाठी जिल्हा प्रशासन "मिशन मोड'वर 

जळगाव - जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना केवळ एकाच गोष्टीवर भर न देता सर्वच विषयांवर भर देईन. सर्वसामान्य व्यक्ती केंद्रबिंदू मानून त्याला समोर ठेवत अधिकारी, कर्मचाऱ्यांशी समन्वय ठेवून जिल्हा प्रशासन "मिशन मोड'वर प्रभावीपणे काम करेल. सर्वच कामे महत्त्वाची असल्याने कुठल्याही एका कामाला प्राधान्य नसेल; तरीही महामार्ग चौपदरीकरण, शहरातील समांतर रस्ते, जिल्हा हागणदारीमुक्ती, शाळांचा गुणवत्ता सुधार कार्यक्रम ही कामे अजेंड्यावर असतील, असे "व्हीजन' जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी मांडले. 

"सकाळ'च्या औद्योगिक वसाहतीमधील कार्यालयात आज सकाळी आयोजित "कॉफी विथ सकाळ' उपक्रमात ते बोलत होते. सुरवातीला खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक विजय बुवा यांनी त्यांचे स्वागत केले. युनिट हेड संजय पागे, वितरण व्यवस्थापक प्रमोद पाटील, सहाय्यक वृत्तसंपादक अतुल तांदळीकर उपस्थित होते. 

शिरूर (जि. पुणे) तालुक्‍यातील रहिवासी असलेले श्री. निंबाळकर बी. एस्सी. ऍग्रीकल्चरचे शिक्षण राहुरी विद्यापीठातून घेतले. पदव्युत्तर शिक्षण पुणे येथे झाले. 1987 मध्ये अक्कलकोट येथे तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली. अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांचे अन्नछत्र पूर्ण करण्यास महत्त्वाची भूमिका बजावली होती. सोलापूरला दोन वर्षे प्रांताधिकारी, नंतर पंढरपूरला प्रांताधिकारी म्हणून काम केले. पंढरपूर देवस्थानात अनेक चांगले बदल घडविले. मंदिराच्या गाभाऱ्यापासून दर्शनबारी, लाडूचा प्रसादवाटप, स्वच्छता, अन्नछत्र आदी विषयांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पिंपरी चिंचवड (जि. पुणे) येथे जकात अधिकारी म्हणून काम केले. माजी मंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांचे खासगी सचिव, नंतर ते उपमुख्यमंत्री झाल्यानंतर उपसचिव, सचिवपदावर काम केले. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे- पाटील यांचा सचिव म्हणून काम केले. राज्य सीमा दलाचा सहाय्यक आयुक्त म्हणून काम करताना 34 नवीन नाकाबंदी ठाणी सुरू केली. अलीकडेच ठाणे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना ठाणे जिल्हा हागणदारीमुक्त केला. चार महिन्यांत जिल्ह्यात बावीस हजार शौचालये बांधली. "पेसा' कायद्यांतर्गत 533 पाड्यांचे रूपांतर गावात करून सोयी-सुविधा दिल्या. लोकसहभागातून डिजिटल शाळा केल्या. 

जूनच्या आधी चौपदरीकरणाचे काम 
जिल्हाधिकारी म्हणून जळगावमध्ये पहिलीच "पोस्टिंग' आहे. यासंदर्भात श्री. निंबाळकर म्हणाले, की जिल्ह्याच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय असलेल्या महामार्ग चौपदरीकरणावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी 94 टक्के जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यावर भर राहील. "बायपास'सोबतच शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण व समांतर रस्त्याचेही काम मार्गी लावले जाईल. 

शाळा गुणवत्ता सुधार कार्यक्रम 
जिल्हा परिषद, पालिका, महापालिकांच्या शाळांतील शैक्षणिक दर्जा सुधारण्यावर भर देणार आहे. अनेक गरीब नागरिक अशी आहेत ज्यांना मुलांना खासगी शाळेत पाठवावे, असे वाटते. मात्र, ते पाठवू शकत नाहीत. यामुळे खासगी शाळांइतकाच जिल्हा परिषद, महापालिका, पालिकांच्या शाळांचा दर्जा राहावा यासाठी प्रयत्न राहील. 

डिजिटल शाळा करणार 
जिल्ह्यातील सर्व शाळा डिजिटल करण्याचे "मिशन' सुरू करणार आहे. शंभर टक्के शाळा डिजिटल होण्यासाठी मोठ्या कंपन्या, संस्थांची लोकसहभागाच्या माध्यमातून मदत घेतली जाईल. शाळांमध्ये अजूनही शालेय पोषण आहार लाकडावर तयार केला जातो. शालेय पोषण आहार गॅसवर शिजवण्याबाबत संबंधित ग्रामपंचायती, शाळांना योग्य ते मार्गदर्शन करणार आहे. 

शासकीय कार्यालयांना "कॉर्पोरेट लुक' 
आपण जेथे बसतो तेथील वातावरण स्वच्छ- सुंदर असेल तर काम करताना प्रसन्न वाटेल. यामुळेच सर्व शासकीय कार्यालयांत "स्वच्छता मिशन' सुरू केले आहे. आगामी काळात मी, माझा टेबल, कार्यालय स्वच्छ कसे राहील यासाठीच्या सूचना अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या जातील. मानसिक स्वच्छतेवरही भर दिला जाईल. कार्यालयांना "कॉर्पोरेट लुक' देऊन कामांचा निपटारा करण्यात येईल. 

विविध विभागांची अचानक तपासणी 
जिल्हाधिकारी म्हणून सर्वच विभागांशी संबंध आहे. त्यामुळे प्रत्येक विभाग अथवा कार्यालयीन प्रमुखाने प्रामाणिकपणे काम केले, तर त्या विभागाचे काम सुधारते. त्यासाठी विविध विभागांना "सरप्राइज व्हिजीट' देऊन त्यांची तपासणी करण्यात येईल. आजचे काम आजच संपवावे, यावर आपला भर असून, तशी शिस्त प्रत्येक विभागाला लावली जाईल. 

हागणदारीमुक्ती 2018 पर्यंत 
जिल्हा हागणदारीमुक्त होण्यासाठी "मिशन' घेऊनच कामाला लागणार आहे. व्यक्तिगत शौचालयांच्या योजनेत काही ठिकाणी शौचालये बांधली जात नाहीत. अनेक ठिकाणी बांधूनही उपयोग केला जात नाही. यासाठी संबंधितांची मानसिकता बदलविण्यासाठी उपाय योजले जातील. "रमाई' घरकुल योजना, शबरी घरकुल योजना, पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत घरकुलनिर्मितीसाठी विशेष प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

पाणीपुरवठा योजना 
ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला जाईल. ज्या योजनांमध्ये काही गैरव्यवहार झालेला असेल, तर त्यावर संबंधित समितीच्या सदस्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील. अपूर्ण पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यावर भर राहील. जिल्ह्यात सध्या पाण्याचे चार टॅंकर सुरू आहेत. "जलयुक्त शिवार' योजनेत झालेल्या कामांमुळे यंदा एक मीटरने भूजलपातळी वाढली आहे. यामुळे टॅंकरच्या संख्येत यंदा घट झालेली असेल. महापालिकेचे "ट्रॅफिक गार्डन' बंद आहे. मुलांसाठी असलेली उद्यानेही बंद आहेत. ती सुरू करून त्यांचा विकास करण्यावर भर राहील. त्यासाठी माझ्या स्तरावर, वेळप्रसंगी मंत्रालय स्तरावरही प्रयत्न केले जातील. 

नाट्यसंगीताची गोडी, व्यस्ततेमुळे छंद मागे 
व्यक्तिगत आवडीनिवडींबद्दल विचारले असता जिल्हाधिकारी निंबाळकर म्हणाले, की मराठी गाणी ऐकायला आवडतात. पंडित भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर यांची गाणी आवर्जून ऐकायचो. आताही योग आला तर या गीतांचा आस्वाद घेतो. शेतकरी कुटुंबातील जन्म असल्याने शेती करायलाही आवडते. प्रशासकीय सेवेत आलो नसतो, तर कदाचित गावी प्रगत शेतकरी म्हणून राहिलो असतो. अलीकडच्या काळात कामाच्या व्यस्ततेमुळे छंदांकडे दुर्लक्ष झाले. 

आईस, शुगर फॅक्‍टरी... सॅटिस्फॅक्‍टरी...! 
काम करताना मी गोड बोलतो (तोंडात शुगर फॅक्‍टरी), कोणी कितीही संतापले तरी डोक्‍यावर बर्फ ठेवून काम करतो (आईस फॅक्‍टरी) यामुळे मला टीकेला सामोरे जावे लागत नाही. त्यातून कामाचे समाधान (सॅटिस्फॅक्‍टरी) मिळते. मी लोकसेवक आहे, ही मनात भावना ठेवली, तर काम करताना कुठेही, कोणतीही अडचण येत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com