संगणक अर्हतेमध्ये जीसीसी-टीबीसी अभ्यासक्रमाचा समावेश

computer_hands
computer_hands

वणी (नाशिक) : राज्य शासनाने नोकरी व विविध स्पर्धा परीक्षा, अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असलेल्या संगणक अर्हता परीक्षेत महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे मार्फत सुरु करण्यात आलेल्या गर्व्हंनमेट सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स (जीसीसी - टीबीसी) या नवीन अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान शासनाच्या या निर्णयाचे राज्यातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या मान्यताप्राप्त साडेतीन हजारावर संस्थाचालकांनी स्वागत केले आहे.

शासनाच्या सामान्य प्रशासन (माहिती तंत्रज्ञान) या विभागाकडून संगणक अर्हतेबाबत वेळोवेळी शासन निर्णय पारीत करण्यात आले. अर्हतेबाबत ग्राह्य धरण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमा संदर्भातील अद्यावत तरतुदी संदर्भाकीत ता. 2 फेब्रुवारी 2013 च्या शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या आहेत. मात्र महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे मार्फत सुरु करण्यात आलेल्या गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स (जीसीसी - टीबीसी) ३०, ४० श.प्र. मि. या सहा महिने कालावधीच्या अभ्यासक्रमाचा समावेश नव्हता. 

या अभ्यासक्रमांमध्ये एमएससी आयटी संगणक अभ्यासक्रमातील समकक्ष विषय शिकविण्यात येत असल्यामुळे राज्यातील मान्यता प्राप्त संस्थाचालकांची संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य टंकलेखन- लघुलेखन शासनमान्य संस्थाची संघटना मुंबई यांनी जीसीसी टीबीसी कोर्सला संगणक अर्हतेच्या परीक्षेत समावेश करण्याच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य प्रकाश कराळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील संस्थाचालकांनी आंदोलन केले होते. तसेच शासनाने शासन निर्णय १८ जुलै २००३ अन्वये सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीच्या १ जुन २०१८ रोजीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयास अनूसरुन जीसीसी - टीबीसी ३०, ४० श.प्र. मि. या अभ्यासक्रमाचा संगणक अर्हता परीक्षेत समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. 

त्यानुसार अभ्यासक्रमात बदल करण्यात आला. याबाबतचा अद्यादेश सोमवार, ता. १६ जुलै २०१८ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. यामुळे आता जीसीसी - टीबीसी हा संगणक टायपिंग कोर्स केल्या वर विदयार्थ्यांना परत MSCIT किंवा CCC करण्याचे आवश्यकता राहाणार नाही. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ व पैशांचा अपव्यव टळणार असल्याने  संस्थाचालकांबरोबरच विद्यार्थी व पालकांमध्येही शासन निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com