काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला समान संधी

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला समान संधी

मालेगाव - मालेगाव महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (ता. २४) मतदान होत आहे.  सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर काल  ‘लक्ष्मी’ वाटपाचा दिवस उमेदवारांसाठी घायकुतीला आणणारा ठरला. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राजकीय तज्ज्ञ, पोलिस यंत्रणा व विविध समाजघटक कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याबाबत आडाखे बांधू लागले आहेत. शहराचे पूर्व-पश्‍चिम असे सरळसरळ दोन भाग पडतात. पूर्व भागात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला समान संधी आहे. पश्‍चिम भागात शिवसेना-भाजप फिफ्टी-फिफ्टी होण्याची शक्‍यता आहे. ही सर्व पार्श्‍वभूमी पाहता मित्रपक्षांच्या मदतीने राष्ट्रवादी वरचढ ठरण्याची शक्‍यता आहे. 

३७३ उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रांत 
महापालिका निवडणुकीसाठी ८४ जागा होत्या. काँग्रेसच्या किशोरीबी अशरफ कुरेशी या प्रभाग १९ क मधून बिनविरोध झाल्या. ८३ जागांसाठी उद्या ५१६ केंद्रांवर मतदान होणार असून, ३७३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात अकरा विविध राजकीय पक्षांचे २६२ व १०१ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पूर्व भागातील ६४ पैकी २६ ते २८ जागांवर काँग्रेस बाजी मारण्याची, तर राष्ट्रवादी काँग्रेसला २४ ते २६ जागा मिळण्याची शक्‍यता आहे. पश्‍चिम भागात वीस जागांवर शिवसेना-भाजपला फिफ्टी-फिफ्टी चान्स आहे. भाजपचा प्रचार अखेरच्या टप्प्यात काहीसा फिका पडला. मुख्यमंत्री, पालकमंत्री व प्रदेशच्या नेत्यांनी लक्ष घातले असते तर भाजप शिवसेनेला ओव्हरटेक करू शकला असता. एमआयएम व जनता दल यांना प्रत्येकी चार ते पाच, तर अपक्षांना दोन ते तीन जागा मिळतील, असा अंदाज आहे. 

काँग्रेसची प्रचारात आघाडी
पूर्व भागात उमेदवार जाहीर करण्यापासून ते निवडणूक प्रचारात काँग्रेसने आघाडी घेतली. राष्ट्रवादीला बंडखोरी व उमेदवारी निश्‍चितीवरून अनेक वादांना तोंड द्यावे लागले. काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, टिपू सुलतान यांचे वंशज मन्सूर अली यांच्या सभा झाल्या. उर्वरित प्रचाराची धुरा आमदार आसिफ शेख व माजी आमदार रशीद शेख यांनी सांभाळली. राष्ट्रवादीच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी या निवडणुकीकडे दुर्लक्ष केले. माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल व जनता दलाचे बुलंद एकबाल यांनी प्रचाराची कमान सांभाळली. काँग्रेसने विकासाच्या मुद्द्यावर जोर दिला, तर राष्ट्रवादी व जनता दलाने काँग्रेसच्या भ्रष्टाचार व गैरव्यवहारावर प्रहार केला. एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मालेगाववर खास लक्ष केंद्रित केले. दोन आठवड्यांच्या कालावधीत त्यांच्या तीन जाहीर सभा झाल्या. सर्वांना संधी दिली. एमआयएमला संधी देऊन पाहा, असा त्यांचा प्रचाराचा रोख होता.

राष्ट्रवादीला अधिक संधी
महापालिका निवडणुकीत बहुमतासाठीचा ४३ चा आकडा स्वबळावर गाठणे कोणत्याही पक्षाला शक्‍य नाही. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेनेवर, तर काँग्रेसचा भाजपवर डोळा आहे. निवडणुकीत अप्रत्यक्षरीत्या ही युती जाणवलीदेखील. राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेबरोबरच युती केलेल्या जनता दलासह प्रसंगी एमआयएमची रसद मिळण्याची शक्‍यता आहे. यामुळे बहुमताचा आकडा गाठण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक संधी आहे. काँग्रेसने जोरदार कमबॅक केल्यास ही परिस्थिती पालटू शकते.
 

प्रदेशच्या नेत्यांचे दुर्लक्ष
पश्‍चिम भागात शिवसेनेच्या प्रचाराची धुरा ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यावर होती. अखेरच्या दोन दिवसांत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, उपनेते नितीन बानगुडे-पाटील यांच्या सभा झाल्या. यामुळे चांगली वातावरणनिर्मिती झाली. भाजपचा प्रचार प्रारंभी विस्कटलेला होता. मुख्यमंत्र्यांच्या प्रचारसभेवर त्यांची सारी भिस्त होती. येथेच घात झाला. मुख्यमंत्री फिरकले नाहीत. पालकमंत्री गिरीश महाजन फक्त हजेरी लावून गेले. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, आमदार अपूर्व हिरे, अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दिकी, अद्वय हिरे, सुनील गायकवाड आदींच्या प्रचारसभा झाल्या. अखेरच्या टप्प्यातील सभांनी प्रचारात जान आली. राजकीय पक्षांच्या अखेरच्या रसदबाबत उमेदवारांमध्ये मोठी आशा होती. मात्र पक्षांनी प्रचारसाहित्य वगळता फारसा शिधा पाठविला नाही. यामुळे सर्वच उमेदवारांना स्वबळावर लढावे लागत आहे. यामुळे मतदारांना ‘लक्ष्मी’दर्शनाची असलेली अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही. चार मतांसाठी दोन हिरव्या नोटा असा साधारण दर होता. काट्याची लढत असलेल्या व काही मातब्बर रिंगणात असलेल्या प्रभागात यात थोडी भर पडली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com