अमळनेरला दोन वर्षांत सूतगिरणी उभारणार - आमदार चौधरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

अमळनेर - ‘शेतीला पाणी आणि हाताला काम’ या पार्श्‍वभूमीवर जलयुक्‍त शिवाराच्या माध्यमातून शेतीला पाणी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आता रोजगारासाठी सूतगिरणी उभारणार आहोत. येत्या दोन वर्षांत सूतगिरणीचे काम पूर्ण करणार असून, शहराला उद्योगनगरी म्हणून ओळख देऊ, अशी माहिती आमदार शिरीष चौधरी यांनी दिली. 

अमळनेर - ‘शेतीला पाणी आणि हाताला काम’ या पार्श्‍वभूमीवर जलयुक्‍त शिवाराच्या माध्यमातून शेतीला पाणी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आता रोजगारासाठी सूतगिरणी उभारणार आहोत. येत्या दोन वर्षांत सूतगिरणीचे काम पूर्ण करणार असून, शहराला उद्योगनगरी म्हणून ओळख देऊ, अशी माहिती आमदार शिरीष चौधरी यांनी दिली. 

राजमाता जिजाऊ शेतकरी सूतगिरणी कार्यालयाच्या आज झालेल्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. वाडी संस्थानचे गादीपुरुष संतश्री प्रसाद महाराज यांच्या हस्ते स्टेशन रोडवरील हीरा पॅलेसमध्ये या कार्यालयाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी आमदार स्मिता वाघ, सूतगिरणीचे अध्यक्ष डॉ. रवींद्र चौधरी, उपाध्यक्ष किरण गोसावी, संचालक वानखेडे आदी उपस्थित होते. यावेळी प्रसाद महाराज यांच्या हस्ते अकरा शेतकऱ्यांना सूतगिरणी शेअर्सचे वितरण करण्यात आले. प्रसाद महाराज यांनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नक्कीच उभा राहील, असा आशीर्वाद दिला. 

आमदार चौधरी म्हणाले, की या भूमीवर शेतीला पाणी देण्याच्या दृष्टीने आम्ही स्वखर्चातून जलयुक्‍त शिवार अभियान राबविले. यासाठी प्रा. डॉ. रवींद्र चौधरी यांनी हीरा उद्योगसमूहाच्या माध्यमातून सव्वा ते दीड कोटी रुपये निधी देऊन अनेक गावांत नाला खोलीकरण केले. शेतकरी बांधवांनी शेअर्स म्हणून गुंतवलेला पैसा कुठेही जाणार नाही. आमदार स्मिता वाघ यांचेही सहकार्य असल्याने दोन वर्षांतच ही सूतगिरणी उभारली जाणार असून, अनेकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. 

आमदार वाघ म्हणाल्या, की प्रताप मिल बंद झाल्यानंतर पेन्शनरांचे गाव म्हणून आपल्या गावाची ओळख आहे. मात्र, आता सूतगिरणीच्या मंजुरीमुळे उद्योगनगरीकडे पाऊल पडत असून, तालुक्‍यातील बेरोजगारांसाठी आमदार चौधरी यांना या चांगल्या कामात सहकार्य करू, अशी भावना त्यांनी व्यक्‍त केली.

प्रा. डॉ. चौधरी म्हणाले, की सूतगिरणी कुठल्याही परिस्थितीत उभी राहणार असून, यात कोणतीही तिळमात्र शंका नाही. मात्र, दुर्दैवाने काही अडचण आल्यास शेतकऱ्यांनी शेअर्सच्या रूपाने दिलेला कष्टाचा पैसा परत करण्यास हीरा उद्योगसमूह बांधील राहील. अमळनेरसह पारोळ्यापर्यंत सूतगिरणीचे कार्यक्षेत्र असून, शेअर्स कापूस उत्पादक शेतकरी, व्यापारी तसेच नागरिकांनी शेअर्स घ्यावेत. यावेळी मोहन सातपुते, प्रा. अशोक पवार, व्ही. आर. पाटील, धनगर पाटील, महेश देशमुख, सुभाष पाटील, श्रीराम चौधरी, गजानन चौधरी, नरेंद्र चौधरी, दीपक चौगुले, सुनील भामरे, किरण सावंत, सुरेश सोनवणे, सुरेश पाटील, अरुण पाटील, उमेश साळुंखे, रणजित शिंदे, अनिल महाजन, रणजित महाजन, पंकज चौधरी, किरण बागूल, पराग चौधरी, योगराज संदानशिव, किशोर मराठे, सुरेंद्र पाटील, दीपक पाटील, दिनेश मणियार आदी उपस्थित होते. उदय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रवीण पाठक यांनी आभार मानले.