मुलीसाठी दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

जळगाव - येथील समतानगरातील अल्पवयीन मुलीला परिसरातील तरुणासह त्याच्या दोन मित्रांनी लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. यासंदर्भात रामानंदनगर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र, महिना उलटूनही पोलिसांनी कुठलीही हालचाल न केल्याने संबंधित मुलीच्या संतप्त आई-वडिलांनी पोलिस ठाण्यातच आत्मदहनाचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे पोलिस ठाण्यात खळबळ उडाली.

जळगाव - येथील समतानगरातील अल्पवयीन मुलीला परिसरातील तरुणासह त्याच्या दोन मित्रांनी लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. यासंदर्भात रामानंदनगर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र, महिना उलटूनही पोलिसांनी कुठलीही हालचाल न केल्याने संबंधित मुलीच्या संतप्त आई-वडिलांनी पोलिस ठाण्यातच आत्मदहनाचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे पोलिस ठाण्यात खळबळ उडाली.

समतानगरातील रहिवासी शब्बीर अजीम खाटीक (वय 44) यांची सतरावर्षीय मुलगी 26 नोव्हेंबरला सकाळी दहाला घरातून काहीही न सांगता निघून गेली. तिचा शोध घेतल्यावर ती न मिळाल्याने 27 नोव्हेंबरला खाटीक यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणी परिसरातीलच रहिवासी अविनाश प्रकाश तायडे आणि त्याच्या दोन मित्रांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मुलगी गेल्यापासून वडिलांनी रोज सकाळ-सायंकाळ पोलिस ठाण्यात चकरा मारल्या, तरीही संबंधित तपासाधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुठलेही पाऊल उचलले नाही. रोज टाळाटाळ करून पिटाळून लावले जात असल्याने कंटाळलेल्या आई-वडिलांनी आज पेट्रोल भरलेली कॅन घेत रामानंदनगर पोलिस ठाणे गाठले. दुपारी चारच्या सुमारास पोलिस ठाणे आवारातच संबंधितांनी पेटवून घेण्याचा बेत आखला होता. मात्र, पोलिसांनी हा प्रयत्नही गोड बोलून हाणून पाडत दोघांना ताब्यात घेतले.

संशयिताच्या आई-वडिलांची चौकशी
शब्बीर खाटीक कुटुंबीयांसह आज दुपारी तीनच्या सुमारास रामानंदनगर पोलिस ठाण्यात आले. त्यांनी पेट्रोल भरलेली कॅन घेऊन मुलीला पळवून नेण्याचा आरोप असलेल्या अविनाश तायडेच्या कुटुंबीयांना अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांची तारांबळ उडाली. त्यांनी या प्रकरणी प्रकाश सोनू तायडे (वय 51) व प्रमिला प्रकाश तायडे (वय 45) यांना आज सायंकाळी पाचच्या सुमारास ताब्यात घेतले व चौकशी केली. मात्र, संशयित त्यांच्याही संपर्कात नसल्याचे समोर आले.

तपासाचे काय?
दाखल गुन्ह्याचा तपास 33 दिवस उलटूनही होत नाही. तपास होत नाही, की केला जात नाही याविषयी ठोस उत्तर कुणाकडेही नसले, तरी
मुलगी घरातून निघून गेल्याने हतबल झालेल्या आई-वडिलांना काय करावे ते सुचत नसल्याचे सांगत धाय मोकलून रडू कोसळले. समाजही साथ द्यायला तयार नाही, बदनामीमुळे नातेवाइक जवळ येईना. त्यामुळे आता अखेर धर्मांतरच करून घ्यावे का, असा विचार मनात असल्याचे उद्विग्न वडिलांनी पत्रकारांना सांगितले.