‘डीजे’ थांबला, भाऊ गेला अन्‌ नवरदेव रुसला!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 ऑक्टोबर 2016

जळगाव - नव्या बसस्थानकासमोरून ‘सैराट’चा झिंगाट वाजवत जाणारा ‘डीजे’... वरातीत नाचणारे बेधुंद तरुण... आणि अशातच या अनधिकृत ‘डीजे’वर कारवाई म्हणून पोलिस वरातीतील नवरदेवाच्या भावाला उचलून नेतात, वरात थांबते आणि भाऊ येत नाही तोवर पुढे जायचंच नाही, असा पवित्रा घेत नवरदेव रुसतो... हा अनोखा प्रकार आज दुपारी या मार्गावरून जाणाऱ्या लोकांनी अनुभवला.

पोलिस मल्टिपर्पज हॉलमध्ये होणाऱ्या लग्नसोहळ्यासाठी श्रीराम मंदिरापासून निघालेली वरात पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरून पुढे गेली. कर्कश आवाजात वाजणाऱ्या ‘डीजे’वर बेधुंद होत नाचणाऱ्या वरातीतील तरुणांचा उत्साह दांडगा होता. अशातच माशी शिंकली आणि पोलिसांच्या कानी या ‘डीजे’ची खबर गेली. पोलिसांनी तातडीने दखल घेत ‘डीजे’ वाजविणे थांबविले व आयोजक म्हणून नवरदेवाच्या भावाला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले.

नवरदेवही रुसला
सैन्यात नुकताच भरती झालेला तरुण व पोलिस असलेली तरुणी यांचा हा विवाह होता. पोलिस भावालाच घेऊन गेले म्हटल्यावर नवरदेवाची मिरवणूक जागीच थबकली. नवरदेव घोड्यावर उतरून रस्त्यावर आला आणि भाऊ येत नाही तोवर पुढे जायचं नाही, असा पवित्रा त्याने घेतल्यामुळे मुलीकडच्या मंडळींची चांगलीच धावपळ झाली. शेवटी पोलिसांशी चर्चा करून नवरदेवाच्या भावाला हॉलमध्ये आणले व वधू-वराचे ‘सावधान’ पार पडले. मात्र, या प्रकाराने प्रत्यक्षदर्शींचे चांगलेच मनोरंजन झाले.

Web Title: crime on illegal dj