गुन्हेगारी वाढतेय, पोलिस सुस्त!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

जिल्ह्यासह शहरात रोज चोरी, घरफोडी, लूटमारीच्या घटनांनी नागरिक त्रस्त

धुळे - शहरासह जिल्ह्यात लूटमार, चोरी- घरफोडी, फसवणुकीसारखे गुन्हेगारीचे प्रकार वाढले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक एस. चैतन्या यांच्याकडून ठोस कारवाईची अपेक्षा असताना ते केवळ प्रशासकीय कार्यालयातच अडकून पडल्याचे चित्र आहे. नवीन वर्षात तरी गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे शक्‍य होईल का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

जिल्ह्यासह शहरात रोज चोरी, घरफोडी, लूटमारीच्या घटनांनी नागरिक त्रस्त

धुळे - शहरासह जिल्ह्यात लूटमार, चोरी- घरफोडी, फसवणुकीसारखे गुन्हेगारीचे प्रकार वाढले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक एस. चैतन्या यांच्याकडून ठोस कारवाईची अपेक्षा असताना ते केवळ प्रशासकीय कार्यालयातच अडकून पडल्याचे चित्र आहे. नवीन वर्षात तरी गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे शक्‍य होईल का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित असल्याची स्थिती केवळ पोलिस दप्तराच्या कागदोपत्री आहे. वर्दळीची ठिकाणे, सार्वजनिक स्थळे, शासकीय निमशासकीय कार्यालय, बाजारपेठसह कॉलन्यांमध्ये चोरी, लुटमारसारखे गुन्हेगारीचे प्रकार सातत्याने होत आहेत. शिरपूर येथील बॅंकेतील दरोडा, तत्पूर्वी गरताड (ता.धुळे) बारीत दांपत्याची लूटमार, त्यानंतर आनंदखेडे (ता.धुळे) शिवारात तरुण- तरुणीच्या जोडप्यास मारहाण करीत त्यांच्याकडील दागिने लूटमार असे एक ना अनेक घटना घडूनही तपास मात्र शून्य आहे. देवपूरमध्ये तर महिलांच्या गळ्यातील सोनपोत लांबविण्याचे प्रकार दिवसाआड होत आहेत. वाहनेही सुरक्षित नसून बंद घर, कुटुंबीय घरात असतानाही कडी-कोयंडा तोडून ऐवज लंपास होत आहेत. गेल्या काही दिवसात गुन्हेगारी प्रकारात मोठी वाढ झाली आहे.

अधीक्षक हतबल का?  
शहरालगत मुंबई- आग्रा व नागपूर- सुरत महामार्ग असून चाळीसगाव मार्गावरही मोठी वर्दळ असते. मोहाडी, धुळे तालुका, पश्‍चिम देवपूर व आझाद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मार्ग येतात. धुळे तालुका व मोहाडी परिसरातील हद्दीतील बहुतांशी हॉटेल, ढाब्यांवरील वाहने, ट्रक व त्यातील मालाची चोरी होत आहे. बहाण्याने चालक, सहचालकास लुटण्याचे प्रकार गेल्या महिनाभरात घडले. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊनही लूटमार करणाऱ्यांना पकडण्यात यश आलेले नाही, गस्त वाढवून कारवाई करण्यात पोलिस यंत्रणा उदासीन दिसत आहेत. त्यामागचे गौडबंगाल काय, असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे. पोलिस अधीक्षक एस. चैतन्या स्वतः: हतबल आहेत काय, की त्यांचा पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांवर वचक राहिलेला नाही, अशी शंकाही उपस्थित होत आहे.

मोहाडी, देवपूरमध्ये गंभीर स्थिती
मोहाडी व देवपूर, पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्यांतर्गत गेल्या काही वर्षाचा आढावा घेतल्यास यंदा सर्वाधिक गुन्हेगारी कारवाया होत असल्याचे दिसून येत आहेत. पश्‍चिम देवपूर, देवपूर परिसरात धूम स्टाइल चोरी, लूटमार, मारहाण करून लूटमारीचे प्रकार होत आहेत. मोहाडी पोलिस ठाण्यांतर्गत यापेक्षा अधिक गंभीर स्थिती असून लूटमार, चोरीसह ’’अवैध वाहतूक’’ही सर्रास सुरू असल्याचे दिसून येत आहे. दिवसाही चोरी, लूटमार होत असल्याने तेथील पोलिस यंत्रणा किती कमकुवत आहे, ते दिसून येते. त्या ठिकाणी सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: crime increase, police relax