गुन्हेगार देवाच्या कृत्यावर संतापाची लाट 

गुन्हेगार देवाच्या कृत्यावर संतापाची लाट 

धुळे - शहरातील गुन्हेगार, गावगुंड देवा चंद्रकांत सोनार याने "बोला धुळेकर विचार मांडा- 3' या व्हॉटस्‌ऍप ग्रुपवर आक्षेपार्ह विधान "पोस्ट' केले. या प्रकरणी महिलांची बदनामी आणि दहशत निर्माण करणाऱ्या देवा सोनार याच्याविरुद्ध तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी विविध क्षेत्रातील संतप्त महिलांसह तक्रारदार माजी महापौर, नगरसेविका जयश्री कमलाकर अहिरराव, भारती मनोज मोरे यांनी आज पोलिस प्रशासनाकडे केली. 

थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी महापौर अहिरराव आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मनोज मोरे यांच्या पत्नी व यशस्विनी सामाजिक अभियानाच्या जिल्हा सहसमन्वयक सौ.भारती मोरे यांच्याबाबत खुद्द या पक्षाचेच ज्येष्ठ पदाधिकारी, नगरसेवक चंद्रकांत सोनार यांचा मुलगा देवा यानेच आक्षेपार्ह, बदनामीकारक विधान केल्याने या पक्षासह विविध क्षेत्रातील महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

संतापाची लाट 
संघटित महिलांसह तक्रारदार माजी महापौर व "राष्ट्रवादी'च्या महिला शाखेच्या शहराध्यक्षा अहिरराव, सौ. मोरे, महापौर कल्पना महाले, प्रा. डॉ. सुवर्णा शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, नगरसेविका गुलशन उदासी, युवती शाखेच्या जिल्हाध्यक्षा मीनल पाटील यांनी पोलिस उपअधीक्षक हिंमत जाधव यांना तक्रारीसह मागण्यांचे निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की व्हाटस्‌ऍप ग्रुपवर "बोला धुळेकर विचार मांडा 3' हा व्हाटस्‌अप ग्रुप आहे. महेश बागूल ग्रुप ऍडमिन आहेत. त्यांनी या ग्रुपवर विविध पक्षांसह निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश केला आहे. सामाजिक विषयावर चर्चेसाठी हा ग्रुप असल्याचे सांगण्यात येते. पूर्वीही वादग्रस्त विषयामुळे हा ग्रुप बंद झाला होता. नंतर तो पुन्हा सुरू झाला. यात कमलाकर अहिरराव, मनोज मोरे हेदेखील ग्रुपचे सदस्य होते. असे असताना या ग्रुपवर 22 एप्रिलला मध्यरात्रीनंतर दीडला या ग्रुपचा सदस्य देवा सोनारने बदनामीकारक, आक्षेपार्ह, अश्‍लील स्वरूपाचे विधान "पोस्ट' केले. ते माजी महापौर अहिरराव, सौ. मोरे यांना उद्देशून होते. तसेच अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राजवर्धन कदमबांडे यांचा अवमान होईल, अशा स्वरूपाचे होते. या प्रकाराची माहिती सर्वत्र होत गेल्यानंतर "राष्ट्रवादी'सह विविध क्षेत्रातील महिलांसह व्यक्तींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. देवा सोनारने केलेल्या बदनामी प्रकरणी त्याच्यावर माहिती व तंत्रज्ञान कायद्यासह विविध आनुषंगिक कलमान्वये कारवाई करावी. 

देवा सोनार गुन्हेगारच 
देवा सोनार हा गुंड प्रवृत्तीचा आहे. त्याच्याविरुद्ध कलम 307 सह विविध प्रकारच्या मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. सहायक पोलिस निरीक्षक पाटील यांच्यावर तलवारीने हल्ला केल्याचा त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर हद्दपारीसह मोक्काअंतर्गत कारवाई प्रस्तावित झाली. मात्र, कायदेशीर त्रुटींमुळे तो लवकर सुटला. त्याने नगरसेविका ललिता रवींद्र आघाव यांच्या घरावर हल्ला करून त्यांच्यासह नातेवाइकांना मारहाण केली होती. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनाही वेळोवेळी धमकी देण्याचा गुन्हा देवा सोनारवर दाखल आहे. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करावी, त्यात ग्रुप ऍडमिन बागूल यांचाही समावेश करावा, अशी मागणी निवेदनाव्दारे तक्रारदार अहिरराव, मोरे यांच्यासह कल्पना बोरसे, माधुरी अजळकर, चंद्रकला जाधव, माधुरी बडगुजर, शशिकला मोहन नवले, अवंताबाई माळी, कलाबाई बडगुजर, दीपाली अहिरराव, मनीषा वाघ, वैशाली सगरे आदींसह असंख्य महिलांनी पोलिस उपअधीक्षक जाधव यांच्याकडे केली. 

शिंदखेड्यात निवेदन 
या प्रकाराचे पडसाद शिंदखेडा येथे उमटले. या प्रकरणी गुंड सोनारविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिंदखेडा येथील महिला संघटनांच्या सदस्यांनी पोलिस अधीक्षक चैतन्या एस. यांच्याकडे निवेदनाव्दारे केली. सोनारसह ग्रुप ऍडमिनला उत्तर महाराष्ट्रातून हद्दपार करावे, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनाव्दारे शिंदखेडा नगरपंचायतीच्या सभापती सुषमा चौधरी, छाया पवार, नलिनी वेताळे, प्रीती शाह, मीना चौधरी, मनीषा पाटील, रत्नमाला शिंपी, मनीषा चौधरी, अनिता चौधरी, पूजा पाटील, माधुरी भामरे, उज्वला मेखे, मंगला पाटील, कांचन खैरनार, सुनंदा चौधरी आदींनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com