सर्वपक्षीयांच्या सहकार्याने दराडे चम्मूत आमदार झाल्यासारखं वाटतंय!

Narandra darade2.jpg
Narandra darade2.jpg

येवला : विधानपरिषदेचा निकाल मागील वेळेप्रमाणे चुरशीच्या वळणावर येऊन ठेपल्याने दोन्ही उमेदवार विजयाचा दावा करित आहेत. मात्र, येथील जेष्ठ नेते व शिवसेनेचे नेते नरेंद्र दराडेसह त्यांच्या गोटाने आकड्यांची मांडणी करून आजच विजय निश्चित समजला जात आहे. वरवर राष्ट्रवादीला काँग्रेस, भाजपाचा पाठिंबा दिसत असला तरी या मित्र पक्षांसह अपक्ष व आघाड्यांना पोखरण्याचे पडद्याआड राजकारण शिजल्याने समर्थकांना आपले पारडे जड वाटत आहे. नाशिक शहराने सस्पेन्स वाढवला असला तरी कसमादेसह निफाड, सिन्नर, येवला, नांदगावची मते निकाल ठरविणार असल्याचे गणित मांडले जात आहे.

खरे तर मोठा पक्ष असूनही या निवडणुकीत शिवसेनेला सूरवातीपासूनच अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. पक्षातील नाराजी शमविण्यासाठी थेट पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंना कान उघडणी करण्याची वेळ आली. त्यातच पालघरमध्ये शिजलेल्या राजकारनाची शिट्टी येथे वाजली अन अगोदर भाजपाने पुरस्कृत उमेदवार दिला तर सरतेशेवटी राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी शहाणेना पाठिंबा जाहीर केला. भाजपा मदत करणार नाहीत हे लक्षात आल्यावर दराडे परिवारातील मास्टर माईंड किशोर दराडे व नवे नेतृत्व कुणाल दराडे यांनी फिल्डिंग लावली ती मित्र पक्षांतील मतदारांना गळाला लावण्यासाठी. स्वपक्षांतील मतदारांकडे राज्यमंत्री दादा भुसे यांनी दराडेसोबत जिल्हाभर दौरा केलाच पण संपर्क प्रमुख भाऊ चौधरी व पदाधिकाऱ्यांच्या मदतीने सर्वांना सहलीला पाठवून दिले. हे करतांना भुसे मालेगावातील काँग्रेससह सर्व मतदारांना गळाला लावण्यात यशस्वी झाले. इकडे दराडे बंधूनी नाशिकमध्ये भाजपातील मोठ्या गटासह राष्ट्रवादीचे बळ मिळवण्यासाठी फिल्डिंग लावली. तर तिकडे किशोर दराडेनी भाजपाने झुलवत ठेवलेले अपक्ष परवेझ कोकणीसह त्यांच्या पाठीराख्यांना आपलेसे करण्याची खेळी खेळली. याशिवाय जिल्ह्यातील अनेक अपक्ष गळाला लागल्याचा दावा समर्थक करत आहेत.


नाशिकला ४० टक्के, मालेगाव व येवल्यात ७५ ते ८० टक्के तर सिन्नर, निफाड, इगतपुरी, नांदगाव, मनमाड, त्रंबकेश्वर, देवळा, सटाणा, भगूर आदी भागात स्वपक्षासह अपक्ष व इतर पक्षांना आपलेसे केल्याने ६० ते ७० टक्यांपर्यंत मते मिळाल्याचा दावा समर्थक करत आहेत. हे दावे म्हणजे वास्तव असून या समीकरणानुसार विजयाचा दावा ५५ टक्के निश्चितच असल्याचे दराडेंसह समर्थक छातीठोकपणे सांगत आहेत. पालकमंत्र्यांनी गेले दोन-तीन दिवस नाशिकला न येणे, भाजपाची लेचीपेची भूमिका आणि कोकनीचे थांबणे दराडेंच्या पथ्यावर तर पडलेच पण जातीय समीकरनांची चर्चा सुरु झाल्याने एक गट दराडेना आपोआप फायद्याचा होत गेला, हेही नाकारून चालणार नाही. दराडेनी मतदारांच्या घरोघर जाऊन निवडणुकीच्या अगोदर व आताही घेतलेल्या भेटी आणि शहाणे यांनी शहरावर लक्ष केंदित करतांना ग्रामीण भागाकडे केलेले दुर्लक्ष देखील पथ्यावर पडल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे. एकूणच दावे-प्रतिदावे जोशात असून मतदार राजाने काय दिवे लावलेय हे समजण्यासाठी आता काही तासांची प्रतीक्षा करावी लागणार आहेच.     

“सहा महिन्यात भेठीगाठी घेतल्याने माझा मतदारांशी सलोखा तयार झाला असून मला ३५० ते ४०० च्या दरम्यान मते मिळून मी विजयी होणार आहे. भाजपाने राष्ट्रवादीला उघडपणे पाठींबा दिला नव्हताच पण असा व्हीपही बजावलेला नव्हता. यामुळे काम सोपे झाले याशिवाय इतर पक्षांसह, आघाड्याच्या व अपक्ष मतदारांच्या गटाने देखील मला साथ दिली असून माझा हा विश्वास २४ तारखेला सिध्द होईल.”- नरेंद्र दराडे,शिवसेना उमेदवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com