तिथीच्या शिवजयंतीला सकल मराठा समाजाचा विरोध

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मार्च 2017

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मराठा समाज 19 फेब्रुवारीलाच साजरी करेल. तिथीच्या शिवजयंतीसाठी यापुढे कुणीही देणगी देऊ नये, हा प्रमुख ठराव मंजूर करण्यात आला.

पंचवटी - औरंगाबाद रोडवरील नांदूर नाका येथील वरद लक्ष्मी मंगल कार्यालयात आज झालेल्या मराठा क्रांती मोर्चा सकल समाजाच्या जिल्हस्तरीय आढावा बैठकीत तिथीच्या शिवजयंती विरोधात आक्रमक होत सर्वच समाजबांधवांनी 19 फेब्रुवारीला शिवजयंती मराठा समाजाने साजरी करणे बंधनकारक असल्याचा ठराव मंजूर केला. 

बैठकीत विविध ठरावांवर चर्चा झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मराठा समाज 19 फेब्रुवारीलाच साजरी करेल. तिथीच्या शिवजयंतीसाठी यापुढे कुणीही देणगी देऊ नये, हा प्रमुख ठराव मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर मराठा क्रांती संघटना, नाशिक जिल्हा या नावाने मराठा क्रांती मोर्चा पुरस्कृत अधिकृत संघटना नोंदणी करणे, सप्टेंबरपूर्वी मराठा क्रांती मोर्चासाठी जमा झालेला निधी नवीन नोंदणीकृत संघटनेच्या नावाने राष्ट्रीयीकृत बॅंकेत जमा करणे, भाडेतत्त्वावर संघटनेचे कार्यालय उभारणे, शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, होतकरू विद्यार्थी, महिला, शहीद जवानांची कुटुंबे यांना थेट आर्थिक मदत देणे, उद्योजक, शासकीय व निमशासकीय कर्मचारी बैठका, प्रबोधन व मार्गदर्शन शिबिरे घेणे याकरिता होईल. 

दर वर्षी 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करताना दहादिवसीय शिवमहोत्सव साजरा करणे, जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारणे, राजमाता जिजाऊ यांचा पूर्णाकृती पुतळा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारणे, मराठा समाजाने लग्न समारंभ व विविध कार्यक्रमांत अवास्तव खर्च टाळणे, सामूहिक अथवा अल्पखर्चात विवाह सोहळे पार पाडावे आदी ठराव मांडून ते मंजूर झाले. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तारीख तिथीचा वाद निर्माण करणाऱ्या कालनिर्णय दिनदर्शिकेने पुढील वर्षी तिथीची शिवजयंती छापूच नये, अशी मागणी करत होळीच्या दिवशी "कालनिर्णय' जाळून होळी करण्यात आली. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Web Title: Date of Shivaji Maharaj jayanti Maratha social conflict