आम्ही सावध आणि चाणाक्ष!

दत्ता पाटील
सोमवार, 9 जानेवारी 2017

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

आताच्या चाणाक्ष धार्मिक आणि जातीय उन्मादाची नक्की सुरवात कधी झाली असेल हे सांगता नाही येणार, पण प्रत्येक वेळी सुटी संपवून गाव सोडताना गावात झालेले सूक्ष्म बदल मनात घेऊन परतायचो, तेव्हा जाणवायला लागलं होतं हे आज कळतंय. रामनवमीनिमित्त बोहाडा व्हायचा. रामायणाचा धर्माशी थेट संबंध जोडला जात नसे तोवर बोहाडा चालू होता. विविध जातिधर्मांची मंडळी बोहाडा जगत. मग तो बंद पडला. कारणं ही असू शकतील का?

विषय आपला बोहाडा नाही, पण आजच्या या घाई आणि गदारोळात कलासंस्कृतीकडून नेमकं काय प्रतिबिंबित होतंय, ते किती रोमॅंटिक आहे, किती खरं किंवा बेगडी आहे, त्याचे अंतस्थ हेतू काही आहेत का हे बघणं अनिवार्य ठरेल. निसर्गतः एखादी कलापरंपरा लयास न जाता ती रूपांतरित होत असते वेगळ्या फॉर्ममध्ये... पण धार्मिक, जातीय उन्मादातून एकात्म जगण्याची परंपरांच्या रूपातली मूल्यं थेट नष्ट होताना आपण असहायपणे बघत राहिलो. माहितीचा भडिमार गावागावातही ज्ञान म्हणून मिरवला जाऊ लागला. ‘गावपण’ नष्ट करणारा बदल दिसू लागला. यंत्रयुगात यंत्रांच्या खडखडाटातून लय, गाणं शोधणारी माणसं मात्र माहिती आणि तंत्रज्ञान नावाच्या भांडारातून केवळ चाणाक्ष होत राहिली. अतिसावधान होत राहिली. गुजरातच्या दंगलीचं लोण आमच्या शांत, फुफाट्याच्या गल्ल्यांच्या छोट्याशा गावापर्यंत येऊन पोचलं तेव्हाच माहितीच्या जागतिक जाळ्याला आपलं गावही जोडलं गेल्याचा पहिला पुरावा आम्ही मातीच्या धाब्यावर चढून पलीकडं आकाशात उठत असलेल्या आगीच्या लोळांच्या माध्यमातून पाहिला. एरवी आग विझवायला धावत जाणारी गर्दी आता मात्र त्या उजेडापासून शांतपणे परतताना आम्ही पाहिली. छतावरून बेसुमार तारका बघणं बंद झालंय. कधी लक्ष गेलंच तर त्या प्राचीनत्वाचं एक विलक्षण अपराधी दडपण येतंय.

दंगली या शहराच्या व्यक्तिमत्त्वाचाच एक भाग असल्याचं ऐकून असणाऱ्या अशाच अनेक गावांच्या उंबरठ्याशीच दूरवरून प्रवास करीत ‘दंगल’ नामक गोष्ट येऊन ठेपली, तेव्हा तिनं वेशीपाशी जमलेल्या अनेकांच्या टोप्या हलकेच वर करून कपाळावरचे चंदन-बुक्के पुसून नव्या उभ्या रेषा ओढल्या. गावातून शांत पावलांनी नवे हसरे मिशनरी फिरू लागले. शत्रू डिफाइन करून देऊ लागले. शेकडो वर्षं आपली संस्कृती ‘बळकावून’ बसलेल्या शत्रूंच्या (!) चारदोन घरांना खुशाल आपण सामावून घेतलंय, याची ‘जाणीव’ करून देत गावाच्या अंगावर सरसरून काटा आणण्याचा कार्यक्रम राबवू लागले. त्या वेळी ग्रामदैवताऐवजी गावाबाहेरच्या राममंदिरात पहिल्यांदाच लायटिंगची माळ लागल्याचंही आम्ही पाहिलं... घरातील गर्दीमुळे मंदिराच्या ओट्यावर येऊन झोपणारी वस्तीतील काही माणसं त्या दिवसापासून बिचकल्याचंही आम्ही पाहिलं. पूर्वी वेशीत रेडा मारला जायचा. गावानं या धर्मपरंपरेचे नियम स्वत:च्याच विवेकबुद्धीनं बदलून प्रथा नारळापर्यंत आणली होती. पण त्यावरून धर्म बुडाल्याचं कुणी कुणाकडं बोललं नव्हतं. आम्ही जगाशी जोडले गेलेलो नव्हतो तेव्हा एकमेकांशी जोडलेले होतो. आम्हास जगाशी जोडण्याचा एककलमी कार्यक्रम राबविला जाऊ लागला आणि वैश्‍विक होण्याच्या नादात आम्ही चाणाक्ष होत गेलो. (आता हसऱ्या चेहऱ्याचे मिशनरी आम्ही धर्मसंकटात असल्याचे खूप ‘पुरावे’ पाठवत असतात!) आता आम्हास गावाकडच्या आठवणी कुणी विचारल्याच, तर आम्ही झुळझुळती नदी, घनदाट झाडी, हिरवी शेतं, गौरीगणपती, गरिबीतही आनंदानं खाल्लेली कांदाभाकरी, चावडीवरच्या गप्पा, कोकिळेचं कुहुकुहु अशा गोडगोड आठवणी... बस! यापलीकडं काही सांगत नाही. लिहीत नाही! कारण आम्हाला सावध आणि चाणाक्ष करण्यात मिशनऱ्यांना भलतंच यश मिळू लागलं आहे!

टीव्हीवरचं रामायण बघून गावाकडच्या आमच्या मंडळींना ‘जग कुडं चाललं नि काय येडापणा करतोय आपन’ असा साक्षात्कार झाला.

माहितीच्या विस्फोटानं धार्मिक आणि जातीय ‘अस्मिता’ हा शब्द ग्रामदैवताच्या ओट्यापर्यंत बाबरी मशीद पाडण्याच्या काळात येऊन पोचला. ‘बाहेर’च्या जगातील बातम्यांमुळे ‘अरे, जगात तर आपलं नातं ‘असं’ असल्याचं सांगितलं जातंय’ याचाही साक्षात्कार!