कर्जमाफीसाठी सरकारमध्येही आग्रही:गुलाबराव पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

खातं ते खातंच असतं. आपला कोणत्याही खात्याचा आग्रह नाही. जनतेची कामे करणे हेच आपले उद्दिष्ट आहे.
- गुलाबराव पाटील, राज्यमंत्री

जळगाव : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या तपस्येची दखल घेतली. त्यामुळे आज आपल्याला मंत्रिपद मिळाले आहे. आपण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी यापूर्वी आंदोलन केले आहे आणि त्यासाठी आजही आग्रही आहोत. मुख्यमंत्र्यांकडे आपला त्यासाठी आग्रह कायम असणार आहे, अशी भूमिका शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या पहिल्याच जळगावभेटीत मांडली.

राज्यमंत्रिपदाचा मुंबईत शपथविधी कार्यक्रमानंतर ते जळगावात आले. त्यांची रेल्वेस्टेशनपासून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा विरोधक असल्यामुळे मला मंत्रिपद मिळाले हे म्हणणे चुकीचे आहे. "आजा मेला आणि नातू झाला‘, असे घडलेले नाही. मी खडसेंचा विरोधक नव्हतो आणि आजही नाही. केवळ त्यांच्या चुकीच्या धोरणांना विरोध होता. त्यांचे मार्गदर्शन आपण आजही घेणार आहोत. त्यांनी ज्याप्रमाणे चांगली विकासकामे केली आहेत, त्यापेक्षा चांगली कामे करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी आवडता आमदार आहे, आता आवडता मंत्री राहीन. प्रशासकीय कामकाजाबद्दल ते म्हणाले, चांगले निर्णय घेऊन ते राबविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीमागे आपण उभे राहू. मात्र, अधिकारी काम करीत नसतील तर त्या अधिकाऱ्यांना आपण वठणीवर आणण्याचे काम करू. आपण दडपणाखाली कोणतेही काम आजपर्यंत केले नाही, आता मंत्री झाल्यावरही करणार नाही.

Web Title: Debt relief for the government insists: Gulabrao Patil