अध्यापनक्षेत्रातील दीपस्तंभ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.
डिलिव्हरिंग चेंज फोरम
२४ व २५ जानेवारी २०१७ 
नेहरू सेंटर, मुंबई
अधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा
www.deliveringchangeforum.com

मुंबईत होणाऱ्या डिलिव्हरिंग चेंज फोरमच्या परिषदेत सहभागी होणारे मान्यवर वक्ते

प्रा. उरील राईकमन, - संस्थापक आणि अध्यक्ष आयडीसी हर्जलिया
लष्करात पॅराट्रूपर म्हणून सुरवात. जेरुसलेम विद्यापीठातून कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण. शिकागो विद्यापीठातून कायद्यातील डॉक्‍टरेट. तेल अवीव विद्यापीठात, तसेच अमेरिकी आणि जर्मनीतील विद्यापीठांतही अध्यापन. मालमत्ता कायद्यावर ग्रंथनिर्मिती. १९९० मध्ये पूर्णपणे खासगी रामोत मिशपॅट लॉ स्कूलची मुहूर्तमेढ, तर १९९४ मध्ये आयडीसी हर्जलिया या इस्राईलमधील पहिल्या ना नफा तत्त्वावरील खासगी आंतरविद्याशाखीय अध्ययन संस्थेची स्थापना. केवळ २४० विद्यार्थ्यांसह सुरू केलेल्या या संस्थेत आजमितीला ८४ देशांतील हजारो विद्यार्थी उच्च शिक्षणाचे धडे गिरवतात. 

आयडीसीच्या संस्थापकांनी अध्ययन करताना वैयक्तिक यश आणि सामाजिक जबाबदारी यांची सांगड घालण्याचे सूत्र स्वीकारले. ‘मोकळीक आणि जबाबदारी’ या कल्पनांसह काम करताना आयडीसीचा समाजसेवेला कल्पक पुढाकार आणि नेतृत्वाची जोड देण्यावर भर आहे. समाजात नेतृत्व करण्यासाठी उपयोगी ठरतील अशी कौशल्ये विद्यार्थ्यांना देण्याची कल्पना आयडीसीने सुरवातीपासून स्वीकारली आहे. आयडीसीमधून पदवी मिळवलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी उद्योगासह वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये लक्षणीय ठसा उमटवला आहे. 

इस्राईलच्या सरकार प्रणालीत सुधारणांसाठी झटणाऱ्या राईकमन यांच्या नेतृत्वाखालील गटाने पंतप्रधानांची थेट निवडणूक, हक्कविषयक विधेयक आणि धर्म व सरकार यांच्यातील संबंधातील नवी व्याख्या अशा अनेक बाबतीत घटनात्मक सुधारणा सुचवल्या होत्या. इस्राईल सरकारने त्यातील काही शिफारसी स्वीकारल्या आहेत. 

‘सकाळच्या एज्युकॉन २०१६’मध्ये ‘आयडीसी हर्जलिया’चा भरीव सहभाग होता. 

विद्यार्थी घडविणारा शिल्पकार - डॉ.  एरीक झिमरमॅन, आयडीसी हर्जलियाचे रिसर्च अँड ग्लोबल एंगेजमेंटचे संचालक

ब्रुकलीन महाविद्यालयातील पदवीपूर्व आणि पदवीसाठीच्या शिक्षणानंतर १९८८ मध्ये इस्राईलमधील किबुत्झमध्ये दाखल व इरिगेशन मॅनेजर म्हणून काम. १९९३ पासून उच्च शिक्षण व्यवस्थापनात काम सुरू करून बार आयन विद्यापीठात संशोधनात्मक जबाबदारी स्वीकारली. उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणात विशेष रुची. विद्यार्थ्यांमध्ये वैविध्यपूर्ण जागतिक वातावरणात काम करण्याच्या क्षमता निर्माण करण्यावर भर. आयडीसी हर्जलियातील जबाबदाऱ्यांसह उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध आंतरराष्ट्रीय समित्यांवरही कार्य.

Web Title: delivering-change-forum-nashik