थकबाकीची मागणी करताच "तहसील' पुरवठा केला खंडित 

थकबाकीची मागणी करताच "तहसील' पुरवठा केला खंडित 

जळगाव - मार्च अखेर जसजशी जवळ येत आहे. तसतशी वसुलीसाठी सर्वच शासकीय कार्यालयाची ओढाताण सुरू आहे. त्यात शासकीय कार्यालये तरी कशी सुटणार. जळगाव तहसील कार्यालयाचे कर्मचारी वीज कंपनीकडे 32 लाखांची थकबाकी वसुलीसाठी गेले. याचा राग येऊन वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मनमानीपणे तहसील कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित करून मीटरही काढून नेले आहे. 

जळगाव तहसील कार्यालयाला महसूल वसुली करण्याचे उद्दिष्ठ दिलेले आहे. यामुळे सर्वच शासकीय कार्यालये, महापालिका, नागरिकांकडे वसुली करणे आहे. वीज कंपनीकडे जुनी अकृषक जमिनीचा शेतसाऱ्याची सुमारे 32 लाखांची थकबाकी आहे. अनेक वर्षे होऊनही वीज कंपनीने ती तहसील कार्यालयात जमा केलेली नाही. ती थकबाकी घेण्यासाठी तहसील कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी आज वीज कंपनीत गेले होते. अधिकाऱ्यांशी बोलणे झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयाकडे चार लाखांचे बिल बाकी असल्याचे सांगितले. त्यावर तहसीलदारांनी सांगितले की शासनाकडे बिलाच्या रक्कमेची मागणी केली आहे. शासन वर्षअखेरीस ती रक्‍कम पाठविते. एक दोन दिवसात ती रक्कम आमच्याकडे जमा झाल्यानंतर लागलीच बिलाची रक्कम देतो. तुमच्याकडे अनेक वर्षापासून असलेली थकबाकीची रक्कम तर भरा. मात्र वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी थकबाकी न भरताच तहसील कार्यालयाच्या पथकास परत पाठविले. एवढेच नाही तर वसुलीचे पथक तहसील कार्यालयात पोचण्या अगोदरच तहसील कार्यालयात येऊन वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी थेट विजपोलवरून वीज बंद केली. मीटरही काढून नेले. यामुळे कर्मचाऱ्यांना आज दिवसभर उकाडा सहन करावा लागता. रात्री मेणबत्तीच्या उजेडात काम करावे लागल्याने तहसील कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी हैराण झाले आहेत. 

मार्च अखेर येताच वीज तोडतात? 
सर्वसामान्य नागरिकांचा आजवरचा अनुभव असा आहे की, वीज कंपनी एप्रिल ते जानेवारी दरम्यान वसुलीच्या मागे लागत नाही ऐन फेब्रुवारी मार्च महिना आला की बिले न भरलेल्या ग्राहकांना त्रास दिला जातो. जे नागरिक, विविध कंपन्या वर्षभर तारांवर आकडे टाकून वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्याच मदतीने वीज चोरी करतात. त्यांच्यावर कधी कारवाई केली जात नाही. उलट फेब्रूवारी मार्च महिन्यात तपासणीत वीज चोरी करणारे आढळून येऊ नये यासाठी त्यांना दोन महिन्यासाठी तात्पुरते वीज संयोजन घेण्यास सांगतात. 

आजही शहरातील गोलाणी मार्केट, गांधी मार्केट, बि.जे. मार्केटसह इतर मार्केटमध्ये विजेची सर्रास सुरू आहे. मात्र अनेक व्यापाऱ्यांचा वायर एकत्र आल्याने कोणाची वायर नेमकी कोठून हे कळत नाही. 

वीज कंपनीला जर ग्राहकांकडून थकबाकी वसुलीचा एवढाच पुळका असेल तर अनधिकृतरीत्या वीज पुरवठा देणाऱ्या आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलावा. प्रामाणिकपणे बिलांची रक्कम भरणाऱ्यांना त्रास देवू नये. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com