"मागेल त्याला शेततळे' योजनेत अनुदान वाढविण्याची मागणी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

चाळीसगाव- शासनाने मागेल त्याला शेततळे योजना फेब्रुवारी 2015 पासून राज्यात सुरू केली असून यासाठी 0.60 हेक्‍टर क्षेत्र असलेले सर्वच शेतकरी पात्र आहेत. या योजनेत मिळणारे अनुदान वाढवून मिळावे, अशी मागणी होत आहे.

चाळीसगाव- शासनाने मागेल त्याला शेततळे योजना फेब्रुवारी 2015 पासून राज्यात सुरू केली असून यासाठी 0.60 हेक्‍टर क्षेत्र असलेले सर्वच शेतकरी पात्र आहेत. या योजनेत मिळणारे अनुदान वाढवून मिळावे, अशी मागणी होत आहे.

चाळीसगाव तालुक्‍याला एकूण 275 शेततळे करण्याचे लक्षांक असून आज अखेर 402 शेतकऱ्यांनी "ऑनलाइन' मागणी अर्ज भरून दिले आहेत. क्षेत्रीय स्तरावरील कृषी कर्मचारी प्रत्यक्ष शेतांवर जाऊन जागा तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याची पाहणी करीत आहेत. जागा योग्य असल्यास लगेचच आखणी करून कामे सुरू करण्यास शेतकऱ्यांना सांगत आहेत. ज्या शेतकऱ्यांना पाण्याची अत्यंत गरज आहे, असे शेतकरी गरजेपोटी शेततळे करीत आहेत. मात्र, या शेततळ्यांसाठी अनुदान वजा जाता जास्तीचा खर्च स्वतः घरून करावा लागत आहे. त्यामुळे या योजनेला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र तालुक्‍यात दिसत आहे. केवळ अनुदान कमी असल्याने आतापर्यंत शेततळ्यांसाठी प्राप्त झालेले अर्ज व झालेली कामे यात मोठी तफावत दिसत आहे. प्रत्यक्षात शेततळे करण्यास घेतल्यानंतर खर्च जास्त येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत केवळ अठरा शेततळे तालुक्‍यात पूर्ण झालेले आहेत.

सन 2009- 10 वर्षात राष्ट्रीय कृषी विभाग योजनेत 3 बाय 30 आकारमानाच्या शेततळ्यास 84 हजार रुपये अनुदान शासन खोदकामास देत होते. सध्या हे अनुदान जास्तीत जास्त 50 हजार रुपये इतकेच असल्याने इच्छुक शेतकरी कामे सुरू करण्यासाठी उत्सुक दिसत नाही. त्यामुळे अजून दहा ते वीस हजार रुपयांनी अनुदानात वाढ व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

दरम्यान, या व्यतिरिक्त पूर्ण झालेल्या शेततळ्यास प्लास्टिक अच्छादन पेपर टाकण्यासाठी 75 हजार रुपये जास्तीत जास्त अनुदानही शासनाकडून देण्यात येत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी आर. एस. राजपूत यांनी केले आहे.