सटाण्यात अवजड वाहनांना दिवसा प्रवेशबंदी कराण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

सटाणा : सटाणा शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावरील दररोजच्या मोठ्या प्रमाणातील अवजड वाहतुकीमुळे महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. या महामार्गावर शहराबाहेरून जाणाऱ्या वळण रस्त्याचे प्रलंबित काम जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत शहरातील महामार्गावर सर्व अवजड वाहनांना दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रवेशबंदी करावी. तसेच मालेगाव - सटाणा या मार्गावरील अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता टेहरे फाट्याजवळ अवजड वाहनांना प्रतिबंध करावा.

सटाणा : सटाणा शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावरील दररोजच्या मोठ्या प्रमाणातील अवजड वाहतुकीमुळे महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. या महामार्गावर शहराबाहेरून जाणाऱ्या वळण रस्त्याचे प्रलंबित काम जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत शहरातील महामार्गावर सर्व अवजड वाहनांना दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रवेशबंदी करावी. तसेच मालेगाव - सटाणा या मार्गावरील अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता टेहरे फाट्याजवळ अवजड वाहनांना प्रतिबंध करावा. या मागण्या मंजूर तात्काळ कराव्यात, अन्यथा येत्या १ मे महाराष्ट्र दिनापासून बागलाण तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडणार असल्याचा इशारा बागलाण तालुका मराठी पत्रकार संघातर्फे काल गुरुवार (ता.२६) रोजी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

याबाबत संघाचे तालुकाध्यक्ष विश्वास मामा चंद्रात्रे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व सभासदांनी प्रभारी तहसीलदार जितेंद्र कुवर, पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांची भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदन दिले. निवेदनात, शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वाहतुकीमुळे महामार्गावर अपघातांची मालिका सुरु असून गेल्या काही वर्षात हजारो निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शहरातून जाणाऱ्या या महामार्गावर प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने, बँका, पतसंस्था, बसस्थानक, हॉटेल्स, उपहारगृहे असून शहर व तालुक्यातील हजारो जनतेचा वावर परिसरात असतो.

शालेय विद्यार्थ्यांना तर आपला जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. गुजरात राज्याला जोडणारा अत्यंत जवळचा महामार्ग असल्याने या महामार्गावर दररोज हजारो अवजड वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे अनेक लहान - मोठे अपघात होत असतात. ता. १० मे २०१६ रोजी महामार्गावर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी व्हीपीएन विद्यालयाजवळ गॅसचे टँकर उलटून झालेल्या स्फोटांच्या मालिकेमुळे शहरवासीय हादरून गेले होते. या पार्श्वभूमीवर सटाणा शहराला पूर्व व पश्चिम बाजूकडून वळण रस्ता व्हावा, यासाठी शहरातील अनेकवेळा विविध संघटनांनी सनदशीर मार्गाने आंदोलनेही केलेली आहेत. मात्र ही मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. वळण रस्त्याला जागा देण्यासाठी शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविल्याने वळण रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबितच आहे. 

या महामार्गाला केंद्र शासनाने नुकताच राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ असा दर्जा बहाल केला असून तशी अधिसूचना देखील काढली आहे. लवकरच चौपदरीकरणासोबत वळण रस्त्याचे काम सुरु होईल, असे आश्वासन लोकप्रतिनिधी देत आहेत. मात्र अजूनही प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नाही. त्यामुळे जोपर्यंत वळण रस्त्याचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरातील विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावरून जाणाऱ्या ट्रॅक्टर्स, ट्रेलर्स, बारा चाकी, १६ चाकी व इतर सर्व अवजड वाहनांना प्रवेशबंदी असावी.

मालेगाव - सटाणा या रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरु असल्याने या मार्गावर अपघातांची मालिका सुरु आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यात ब्राह्मणगाव येथे दोन शाळकरी मुले तर लखमापूर येथे बसस्थानकावर एक व्यक्ती अवजड वाहतुकीचे बळी ठरले होते. या अपघातांना आळा घालण्यासाठी सोयगावजवळील टेहरे फाट्यालगत रस्त्यावर दोन्ही बाजूला आडवे अँगल लावावेत. त्यामुळे अवजड वाहनांना प्रतिबंध बसेल. आमच्या या मागण्या मान्य न केल्यास महाराष्ट्र दिनापासून बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी संघाचे खजिनदार अंबादास देवरे, सरचिटणीस रोशन खैरनार, कार्याध्यक्ष सतीश कापडणीस, उपाध्यक्ष रमेश देसले, निलेश गौतम, कैलास येवला, शशिकांत कापडणीस, काशिनाथ हांडे, नंदकिशोर शेवाळे, दीपक खैरनार, संजय खैरनार, शशिकांत बिरारी, अशोक गायकवाड, संजय जाधव, परिमल चंद्रात्रे, अरुणकुमार भामरे, राकेश शिरोडे, प्रशांत बैरागी, राकेश येवला, सुनील येवला, प्रफुल्ल कुवर, सुनील खैरनार, रोशन भामरे, प्रशांत भामरे, महेश भामरे, रणधीर भामरे, चेतन देवरे, कृष्णा मोहन, मनोहर बागुल, साहेबराव काकुळते, सुभाष येवला, सुरेश बच्छाव आदींसह गंगाधर जाधव, एस. आर. अडसुळे, उत्तम बहिरम, बबन बहिरम, कारभारी अहिरे, नारायण कासार आदी पत्रकार व नागरिक उपस्थित होते.

Web Title: demand for prohibition of heavy vehicles in satana city