डेंगीवरून महापौरांची झाडाझडती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

नाशिक - शहरात डेंगीने कहर केला असून, अवघ्या पंचवीस दिवसांत पावणेदोनशेहून अधिक डेंगीचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महापौर अशोक मुर्तडक यांनी गटनेत्यांबरोबर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून झाडाझडती घेत तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

नाशिक - शहरात डेंगीने कहर केला असून, अवघ्या पंचवीस दिवसांत पावणेदोनशेहून अधिक डेंगीचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महापौर अशोक मुर्तडक यांनी गटनेत्यांबरोबर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून झाडाझडती घेत तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

गेल्या काही दिवसांत डेंगीच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पंचवीस दिवसांत तब्बल 555 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 185 रुग्णांना डेंगी झाल्याचे निष्पन्न झाले आहे; तर वर्षभरात तेराशेहून अधिक डेंगी संशयित आढळले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून साथ नियंत्रणात असल्याचा दावा केला जात असला, तरी आकडेवारीवरून परिस्थिती गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. नगरसेविका मेघा साळवे यांच्या मुलाला डेंगी झाल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. लोकप्रतिनिधींना प्रशासनाच्या अजब कारभाराचा अनुभव येत असेल तर सर्वसामान्यांना कसा प्रतिसाद मिळेल, असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे. या वेळी उपमहापौर गुरुमित बग्गा, विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते, शिक्षण समितीचे सभापती संजय चव्हाण, पश्‍चिम प्रभाग समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, डॉ. विजय डेकाटे, डॉ. सुनील बुकाणे, डॉ. सचिन हिरे, अग्निशमन दलाचे प्रमुख अनिल महाजन आदी उपस्थित होते. 

मूळ सेवेत पाठवावे 
दरम्यान, आरोग्य अधिकारी डॉ. डेकाटे यांनी गेल्या काही दिवसांत कंत्राटे देण्याचा धडाका लावल्याने त्यांच्याकडे शहराच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ नसल्याचे दिसून येत असल्याने त्यांना मूळ सेवेत पाठविण्याची मागणी संजय चव्हाण यांनी केली. पेस्ट कंट्रोलचा ठेका चुकीच्या पद्धतीने दिला आहे. ठेका देऊनही शहरात औषधे व धूरफवारणी होत नसल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. 

महापौरांच्या सूचना 
- पंचवटी बस डेपोतील टायर हटवावे 
- कृषी उत्पन्न बाजार समितीत स्वच्छता करावी 
- घरोघरी तपासणी करून जनजागृती हाती घ्यावी 
- इमारतींचे तळघर साफ करावे 
- नवीन बांधकाम साइटवर सूचना द्याव्यात 
- सरकारी कार्यालयांमधील भंगार हटवावे.