बत्तीस प्रभागांत डेंग्यूचे सर्वेक्षण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 ऑक्टोबर 2016

जळगाव - राज्यासह जळगाव जिल्ह्यातही डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले आहे. शहरातही मोठ्या संख्येने डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असून, त्या पार्श्‍वभूमीवर आज आयुक्त, आरोग्य अधिकारी यांनी स्वत: डेंग्यूच्या सर्वेक्षणाची पाहणी केली. डेंग्यूबाबतचे सर्वेक्षण ३२ प्रभागांमध्ये झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महापालिकेतर्फे डेंग्यूवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टिकोनातून कृती आराखडा करण्यात आला. त्यानुसार आज महापालिकेचा आरोग्य विभाग व वैद्यकीय विभागाच्या पथकाने शहरातील ३७ पैकी ३२ प्रभागांत जाऊन पाहणी केली. यावेळी अनेक सेवाभावी संस्था, विविध मंडळे, सामाजिक कार्यकर्ते मदत करत असल्याचे सांगितले. तसेच डेंग्यू व साथरोगांच्या आजारांच्या जनजागृतीविषयी नागरिकांना स्वच्छतेसंदर्भात काळजी घेण्याचेही आवाहन सर्वेक्षणातून करण्यात आले. 

१२५ घरांची पाहणी
‘मनपा’च्या आरोग्य विभागाकडून शहरात रोज १२५ घरांची प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्यात येत आहे. आतापर्यंत ५० हजार घरांची पाहणी करून त्या ठिकाणी डेंग्यूविरोधी उपाययोजना केल्या आहेत. 

आयुक्तांनी केले आवाहन
आयुक्त जीवन सोनवणे यांनी आरोग्य विभागातर्फे डेंग्यूच्या सर्वेक्षणात आज सहभाग घेतला. शहरातील दोन प्रभागांत स्वत: त्यांनी पथकासोबत घरांमध्ये जाऊन डेंग्यूच्या डासांसंदर्भात पाहणी केली. नागरिकांना घराजवळ पाणी साचू देऊ नये, स्वच्छता ठेवावी, असे आवाहन केले.

डेंग्यूचे आणखी १४ रुग्ण
शहरात ‘डेंग्यू’च्या सर्वेक्षणासाठी कर्मचारी संख्या कमी पडत असल्याने ‘मनपा’ने अतिरिक्त कर्मचारी यासाठी दिले आहेत. सध्या शहरात ३०६ ‘डेंग्यू’चे संशयित रुग्ण आढळले असून, त्यात १४ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. शहरात आतापर्यंत एका साडेचारवर्षीय बालकासह तरुणाचा ‘डेंग्यू’ने बळी गेला आहे.