देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांचा २०३ वा जन्मोत्सव उत्साहात 

देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांचा २०३ वा जन्मोत्सव उत्साहात 

सटाणा : बागलाण तालुक्याचे आराध्यदैवत असलेले येथील संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांचा २०३ वा जन्मोत्सव देवस्थान ट्रस्टतर्फे आज बुधवार (ता.१९) रोजी मोठ्या उत्साहात साजरा झाला. सप्ताहातील पारायण सोहळा व विविध धार्मिक कार्यक्रमांनंतर आज शहरातून देवमामलेदारांची सजविलेल्या रथावर काढलेली मिरवणूक प्रमुख आकर्षण होते. 

एका शासकीय अधिकाऱ्याचे मंदिर असणे ही संपूर्ण देशभरातील एकमेव घटना असेल. अशा या देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांचा पुण्यतिथी व जन्मोत्सव दरवर्षी देवस्थान ट्रस्टतर्फे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. आज पहाटे देवमामलेदारांच्या मंदिरात विश्वस्त रमेश सोनवणे यांच्या सपत्नीक हस्ते वेद मंत्रोच्चारात यशवंतराव महाराजांच्या मूर्तीची विधिवत महापूजा करून जन्मोत्सवास सुरुवात करण्यात आली.

पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी ९ वाजता देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांच्या हस्ते सजविलेल्या रथावरील देवमामलेदारांच्या प्रतिमा व मूर्तीचे पूजन करून रथयात्रेचा प्रारंभ करण्यात आला. यानंतर फुलांनी सजविलेल्या रथावरून शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत अग्रभागी वारकरी संप्रदायाचे महिला व पुरुष, देवस्थानचे विश्वस्त व भाविक सहभागी होते. शहरातील चौकाचौकात रथाचे पूजन करून दर्शन घेण्यासाठी भाविकांमध्ये चढाओढ लागली होती. 

दरम्यान, जन्मोत्सवाचे औचित्य साधून देवस्थानतर्फे सप्ताहात देवमामलेदारांच्या जीवनावर यशवंत लीलामृत ग्रंथपारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वारकरी संप्रदायाचे मधुकर आप्पा बागड व आशा चांदसकर यांनी पोथीवाचन केले. जन्मोत्सवानिमित्त देवस्थानतर्फे भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.

रथयात्रेत रोटरीचे उपप्रांतपाल अभिजित बागड, विश्वस्त रमेश सोनवणे, हेमंत सोनवणे, प्रवीण पाठक, समको बँकेच्या माजी संचालिका अरुणा बागड, रोटरी क्लब देवमामलेदारच्या अध्यक्षा सीमा सोनवणे, सचिव उज्वला जाधव, प्रियंका बागड, सुनील खैरनार, कमलाकर येवला, भास्कर अमृतकार, प्रकाश अहिरे, प्रकाश अमृतकार, एकनाथ येवला, बाळा येवला, म्हेह्स येवला, पेंटर डी. मोरे, देविदास भावसार, शेखलाल मन्सुरी, मधुकर बागड, भगवान मुसळे, भालचंद्र अहिरराव, आदींसह भाविक बहुसंख्येने सहभागी होते. 

मुंजवाड येथील उमेश आर्ट यांनी आज महाराजांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून मंदिराच्या गाभाऱ्यात देवमामलेदार यशवंतराव महाराजांचे रांगोळीतून सुरेख चित्र रेखाटले होते. या चित्रातून मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतले होते. दर्शनासाठी येणारे भाविक आपल्या मोबाईलमध्ये हे चित्र कैद करीत होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com