विकास, अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी पूरक

विकास, अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी पूरक

जळगाव - प्रत्येक क्षेत्रासाठी काहीतरी चांगली तरतूद देण्याचा केलेला प्रयत्न, पायाभूत सुविधा क्षेत्रावर अधिक भर देतानाच सर्व व्यवहार कॅशलेस करण्यावर भर देण्यासाठी केलेल्या उपाययोजना, लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन मिळावे म्हणून कर सवलतीची दिलेली विशेष तरतूद यासारख्या चांगल्या व स्वागतार्ह तरतुदी यंदाच्या अर्थसंकल्पात आहेत. पाच राज्यांच्या निवडणुका असतानाही अशाप्रकारे काही धाडसी आणि संतुलित निर्णय घेत सादर केलेला अर्थसंकल्प देशाच्या भविष्यातील विकासाच्या दृष्टीने पूरक आणि अर्थव्यवस्था मजबूत करणारा ठरेल, असा विश्‍वास अर्थ, उद्योग व व्यापार क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केल्या. 

कृषिक्षेत्रासाठी स्वागतार्ह
ठिबक सिंचनासाठी ५ हजार कोटींच्या विशेष कॉरपस फंडाची तरतूद केली असून ती दरवर्षी वाढत जाईल, त्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांसाठी मोठे दालन निर्माण झाले आहे. केंद्र सरकारने मनरेगा योजनेत केलेली भरीव वाढ ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये परिणामकारक ठरेल.  सिंचनासाठी केलेली ४० हजार कोटींची तरतूद हा अर्थसंकल्प शेती व शेतकरी केंद्रबिंदू मानून सादर केल्याचे द्योतक आहे. सौरऊर्जासाठी केलेली २७ हजार कोटींची तरतूद उल्लेखनीय. नवतंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणारा दिलासादायक अर्थसंकल्प आहे.
 - अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टिम्स.

चांगल्या योजनांवर भर
सर्वसामान्यांसाठी चांगले असलेले हे बजेट असून लघु व मध्य उद्योगांसाठी ५० कोटींच्या उलाढालीपर्यंत कर सवलत दिल्याने या उद्योगांच्या विकासासाठी ही चांगली तरतूद आहे. पायाभूत सुविधा क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्यात आले असून त्यामुळे रोजगाराच्या संधीही बऱ्यापैकी उपलब्ध होतील, असे वाटते. बेघरांना घरे देण्याच्या योजना स्वागतार्ह आहेत. 
- भालचंद्र पाटील, अध्यक्ष, जळगाव पीपल्स को-ऑप. बॅंक

गृहक्षेत्रासाठी स्वागतार्ह
गृहक्षेत्राला चांगले दिवस येतील. अर्थात, संपूर्ण गृहबांधकाम क्षेत्रच यात समाविष्ट व्हायला हवे होते. क्रेडाईने यासंदर्भात मागणी केली होती, सरकारने या मागणीचा विचार करुन अर्थसंकल्पात त्याची तरतूद केली, हे स्वागतार्ह आहे. या क्षेत्रासाठी ‘अच्छे दिन’ नक्कीच येतील. 
- अनीश शाह, अध्यक्ष, क्रेडाई, जळगाव

भविष्यातील विकासासाठी पूरक
प्रत्येक क्षेत्रासाठी काही ना काही चांगले करण्याचा प्रयत्न यातून केला आहे. कॅशलेस व्यवहारांवर भर देण्याच्या योजनांमुळे करचोरीवर नियंत्रण मिळविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, पायाभूत सुविधा, सेवा क्षेत्रासाठी चांगल्या तरतुदी आहेत. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकप्रिय घोषणांपेक्षा वास्तव व संतुलित नियोजनावर यात भर आहे. 
- सीए नितीन झंवर

अर्थव्यवस्था मजबूत होईल
जीडीपी वाढविण्यासंबंधी योजनांमुळे अर्थव्यवस्था आणखी मजबूत होण्यास मदत होईल. बॅंकिंग, ऑइल ॲन्ड गॅस, मायनिंग आदी क्षेत्रांसाठी तरतुदी असल्याने रोजगाराच्या संधीही वाढतील. 
- ज्ञानेश्‍वर बढे, कर सल्लागार

विकासासाठी सकारात्मक बजेट
लघु व मध्यम उद्योगांना दिलेली करसवलत या उद्योगांच्या विकास, वृद्धीसाठी पूरक ठरेल. अन्य सर्व उद्योगांनाही अशाप्रकारची सवलत दिली असती, तर अधिक चांगले झाले असते. 
- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन.

अर्थव्यवस्थेसाठी चांगले
करमुक्त उत्पन्नाची मर्यादा अडीच वरुन तीन लाख रुपये करण्यात आली, सामान्यांची खरेदीक्षमता वाढेल. लघु व मध्य उद्योगांना करसवलत देण्याची तरतूद पूरक ठरणारी आहे. अर्थसंकल्प नंतर सेंसेक्‍स वाढला, हे सुचिन्ह आहे.
- युसूफ मकरा, उपाध्यक्ष, जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ

कृषिउद्योगांसाठी चांगले
अर्थसंकल्प उद्योगक्षेत्रासाठी स्वागतार्ह म्हटला पाहिजे. कृषिक्षेत्रासाठी भरीव तरतूद असल्याने कृषी उद्योगांना चालना मिळू शकेल. भविष्यातील विकासात्मक धोरणाची दिशा दिसून येते. 
- रवींद्र लढ्ढा, अध्यक्ष, पीव्हीसी पाईप असोसिएशन, जळगाव

नियोजनबद्ध वाटचाल
अर्थसंकल्पातील तरतुदी लक्षात घेतल्या तर सरकारची वाटचाल विशिष्ट ध्येयाकडे नियोजनबद्ध पद्धतीने सुरु आहे, असे दिसते. अर्थात, करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढेल, अशी अपेक्षा होती. पायाभूत सुविधाक्षेत्र व उद्योगक्षेत्रासाठी बजेटमध्ये चांगल्या तरतुदी आहेत. कॅशलेससाठी आवश्‍यक यंत्रणा उभारण्यावर भर दिला पाहिजे. 
- अनिल कांकरिया, संचालक, नवजीवन सुपरशॉप

अंमलबजावणी आवश्‍यक
यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी काही चांगल्या तरतुदी, घोषणा केल्या आहेत. त्यामुळे प्रथमदर्शनी जरी हे बजेट स्वागतार्ह व चांगले वाटत असले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीवर सर्वकाही अवलंबून आहे. रेल्वेसाठी पायाभूत सुविधा उभारण्यासंबंधी फार काही तरतुदी नाहीत. डॉक्‍टरांची संख्या वाढविण्याचे म्हटले असले तरी त्याची रचना व स्वरुप कसे असेल, याबाबत उल्लेख नाही. आहे त्या तरतुदी व घोषणांची पूर्तता करावी, एवढीच अपेक्षा. 
- डॉ. उल्हास पाटील, माजी खासदार

दूरगामी चांगले परिणाम
एकूणच यंदाचा अर्थसंकल्प चांगला आहे. जीएसटी लागू करण्याच्या दिशेने या बजेटमध्ये एक पाऊल टाकण्यात आले आहे. करचोरीवर नियंत्रणासाठी कॅशलेस व्यवहारावर भर देण्यात आला असला तरी अशा व्यवहारांना चालना देण्यासाठी त्यावरील चार्जेस कमी करायला हवे होते. देशांतर्गत विविध क्षेत्रांच्या विकासाच्या दृष्टीने दूरगामी विचार करणारे हे बजेट आहे.
- प्रवीण पगारिया, व्यापारी
 

विकासाचे प्रवेशद्वार उघडणारा अर्थसंकल्प
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी, गरीब नागरिक, महिला व युवक या चार घटकांना केंद्रस्थानी ठेवल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते. आज सादर केलेल्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांचे क्रेडिट १० लाख करोड करणे, दूध क्रांती, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, मनरेगा ४८ हजार कोटी, युवकांसाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्र, युवकांच्या विविध योजना, महिला शक्‍ती केंद्र, हेल्थ वेलनेस सेंटर, डिजी गाव अशा अनेक योजना केंद्र सरकारने प्रस्तावित केल्या आहेत. 
- रक्षा खडसे, खासदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com