धुळ्यात 'सीएम' दौऱयात दानवेंचा फोटो बॅनरवरून गायब

निखिल सूर्यवंशी
बुधवार, 17 मे 2017

अंतर्गत कलहातून जुना भाजप आणि नवा भाजप, असा वेगळा संघर्ष येथे निर्माण झाला आहे. इतर पक्षातून येणारे कार्यकर्ते, पदाधिकारी भामरे यांच्या गोटात, तर जुने कार्यकर्ते गोटे यांच्याकडे, असे चित्र दिसते. पक्ष प्रवेशाच्या वादातून आमदार गोटे आणि शहर-जिल्हाध्यक्ष अग्रवाल यांच्यातही जमत नाही

धुळे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (बुधवार) नंदुरबार, धुळे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी धुळे शहरात ठिकठिकाणी स्वागतपर "बॅनर' झळकत होते. मात्र, पक्षांतर्गत वादाच्य पार्श्वभूमीवर अशा "बॅनर'वरून संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल, शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांचे फोटोच नसल्याने तो चर्चेसह समर्थकांमध्ये वादाचा मुद्दा ठरला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा पक्षांतर्गत वादामुळेही बहुचर्चित ठरला. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी धुळ्यात दुपारी चारला पोहोचल्यावर शासकीय विश्रामगृहात प्रथम मंत्री भामरे, मंत्री रावल व आमदार अनिल गोटे या तिघांशी एकत्रित अर्धातास बंद खोलीत चर्चा केली. त्यातून मुख्यमंत्र्यांनी येथील पक्षांतर्गत वाद गांभीर्याने घेतल्याचे दिसून येते. 

शेतकऱ्यांविषयी अनुद्‌गार काढल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा फोटो नंदुरबार, धुळ्यातील मुख्यमंत्र्यांच्या स्वागतपर "बॅनर'वरून वगळण्यात आल्याचे दिसून आले.

भाजप व शिवसेनेत बिनसल्यामुळे त्याचे पडसाद जिल्ह्यातही दिसले. शिवसेनेचे येथील पालकमंत्री दादा भुसे यांचा फोटोही "बॅनर'वर झळकलेला दिसला नाही. मुख्यमंत्र्यांच्या धुळ्यातील सभेसंबंधी भाजपच्या महानगर शाखेच्या निमंत्रण पत्रिकेतून नेते व संरक्षण राज्यमंत्री भामरे, शिवसेनेचे पालकमंत्री भुसे यांची नावे वगळण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून नेते व पर्यटन, रोहयो मंत्री रावल यांचे एकमेव नाव पत्रिकेत समाविष्ट करण्यात आले. आमदार गोटे या सभेचे आयोजक आहेत. 

संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे, आमदार गोटे आणि पर्यटन व रोहयो मंत्री रावल यांच्याकडे येथे पक्षाची धुरा आहे. मात्र, डॉ. भामरे आणि आमदार गोटे यांच्यात काही वादातून दरी वाढली आहे. मंत्री रावल आणि आमदार गोटे यांच्यातही फारसे सख्य नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेमधील एकूण पाच नगरसेवकांनी डॉ. भामरे यांच्या पुढाकारातून भाजपमध्ये नुकताच प्रवेश केला. "राष्ट्रवादी'सह शिवसेनेची गुंड म्हणून हेटाळणी करणाऱ्या आमदार गोटे यांना डॉ. भामरे यांची ही खेळी रुचली नाही. त्यांनी थेट पक्षाच्या वरिष्ठस्तरावर अशा पक्ष प्रवेशाबाबत तक्रार केली. पडद्याआडून पक्षातीलच काही लोकप्रतिनिधी विरोधकांना हाताशी धरून मंत्री रावल यांच्याविरोधात कारवाई करत असल्याचे लपून राहिलेले नाही. त्यामुळे मंत्री रावल धुळे शहरातील घडामोडींकडे फारसे लक्ष देत नाही. डॉ. भामरे, रावल यांना मंत्रिपद मिळाल्याने आमदार गोटे काहीसे दुखावलेही. या नेत्यांची वेगवेगळ्या तीन दिशांना तोंडे असल्याने कार्यकर्त्यांची फरफट होताना दिसते. 

अंतर्गत कलहातून जुना भाजप आणि नवा भाजप, असा वेगळा संघर्ष येथे निर्माण झाला आहे. इतर पक्षातून येणारे कार्यकर्ते, पदाधिकारी भामरे यांच्या गोटात, तर जुने कार्यकर्ते गोटे यांच्याकडे, असे चित्र दिसते. पक्ष प्रवेशाच्या वादातून आमदार गोटे आणि शहर-जिल्हाध्यक्ष अग्रवाल यांच्यातही जमत नाही. "आमदार गोटे भाजपला मोठे करत आहेत की त्यांच्या नेतृत्वाखालील लोकसंग्राम संघटनेला?,' हाही अनेक कार्यकर्त्यांना पडलेला प्रश्‍न आहे. अशा घडामोडींचे पडसाद मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात स्वागतपर "बॅनर', निमंत्रण पत्रिकेतून उमटलेले दिसले. पक्षातील ही स्थिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सावरावी, अशी निष्ठावंत कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. ती "सकाळ'ने बुधवारी ठळकपणे मांडलीही आहे.