राइनपाडा हत्याकांड - प्रमुख दोन आरोपी पोलिसांच्या तावडीत 

maharu-pawar-hiralal-gawali
maharu-pawar-hiralal-gawali

धुळे - समाजमन सुन्न करणाऱ्या आणि संपूर्ण राज्याला बदनामीला सामोरे जाव्या लागणाऱ्या राइनपाड्यातील (ता. साक्री) पाच भिक्षुकांच्या क्रूर हत्याकांडप्रकरणी "एलसीबी'च्या पथकाने आज वाटवी (ता. नवापूर, जि. नंदुरबार) येथून हिरालाल गवळी या दुसऱ्या मुख्य आरोपीला अटक केली. तत्पूर्वी, धुळे तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने विसरवाडी (ता. नवापूर, जि. नंदुरबार) येथील कोकणीपाड्यातून काल (ता. 4) रात्री पहिला मुख्य आरोपी महारू पवारला अटक केली होती. 

क्रूर हत्याकांड घडविणाऱ्या प्रमुख बारा आरोपींपैकी दोघे पोलिसांच्या तावडीत आल्याने तपासाला आणखी योग्य दिशा मिळेल. 

आरोपी महारू वनक्‍या पवार (वय 22, रा. जामनपाडा, ता. साक्री) याला साक्री न्यायालयाने सात जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तो कोकणीपाडा (ता. नवापूर, जि. नंदुरबार) येथे चुलत मावशीकडे लपला होता. आरोपी हिरालाल गवळी ऊर्फ ढवळू (वय 28, रा. सावरपाडा, ता. साक्री, जि. धुळे) याला दुपारी एकला वाटवी येथून चार किलोमीटरवरील मामेसासऱ्याच्या शेतातून पोलिस पथकाने अटक केली. 

मतदार याद्यांवरूनही तपास 
या घटनेच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्‍लिप, फोटोंद्वारे पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. यात सर्व आरोपींचे नाव आणि छायाचित्रांची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी मतदार याद्यांचाही आधार घेतला आहे. साक्री येथे पोलिस कोठडीत असलेल्या 23 आरोपींचाही मृत पाच जणांच्या मारहाणीत व हत्याकांडात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याशिवाय राइनपाड्यातील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात रविवारी (ता. 1) दुपारी साडेबारानंतर लोखंडी सळई, रॉड, काठ्या, खुर्च्या, दगड, विटा, मिळेल त्या हत्यार, साहित्याने खवे (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) येथील पाच भिक्षुकांचा रक्तपात करत क्रूरतेने ठेचून मारणारे प्रमुख 12 आरोपी घटनेनंतर पसार झाले होते. केवळ सोशल मीडियावरील मुले पळवून नेणे, किडनी चोर असल्याच्या अफवेतून क्रूर आरोपींनी पाच जणांचा बळी घेतला आहे. उर्वरित प्रमुख दहा आरोपींचा पोलिस कसून शोध घेत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com