कडकडीत ‘बंद’ पाळून पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

शेतकरी संपास जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रतिसाद; आंदोलनातून सरकारचा निषेध 

शेतकरी संपास जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रतिसाद; आंदोलनातून सरकारचा निषेध 

धुळे - संपूर्ण कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी होत असलेल्या शेतकरी संपाच्या आज सलग पाचव्या दिवशी ’बंद’ला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. प्रमुख शहरी भागातील संमिश्र प्रतिसाद वगळता साक्रीसह जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण भागात शेतकरी संपाला पाठिंब्यासाठी सोमवारी कडकडीत ‘बंद’ पाळण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी लोणखेडी (ता. धुळे) फाट्यावर अटक केली, तर सत्तेतील घटक पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने धुळे शहर, शिंदखेडा व ठिकठिकाणी ‘बंद’चे आवाहन करत काढलेल्या फेरीला त्या- त्या भागातील व्यापारी, दुकानदारांनी प्रतिसाद दिला. जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरत, व्यापारी आणि व्यावसायिकांनी व्यवहार बंद ठेवत ‘बंद’ची तीव्रता वाढविली. शेतकरी संपाला पाठबळ देण्यासाठी राज्यात सर्वत्र ‘बंद’ची हाक दिली गेली होती. शांततेत आंदोलने झाल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. 

शिंदखेड्यात बंदला संमिश्र प्रतिसाद
शिंदखेडा - शेतकरी संपास पाठिंब्यासाठी शिंदखेड्यासह परिसरातील ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बाजारपेठेत फेरी काढत व्यापाऱ्यांना ‘बंद’चे आवाहन केले. त्यास दुकानदारांनी प्रतिसाद दिल्याने व्यवहार बंद झाले. काही तासानंतर पूर्ववत व्यवहार सुरू झाले. आठवडे बाजार सुरू होता. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, तालुकाप्रमुख विश्वनाथ पाटील, छोटू पाटील, मंगेश पवार, सर्जेराव पाटील, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश पाटील, नंदकिशोर पाटील, कपिल सूर्यवंशी, संतोष देसले, सागर देसले, गणेश परदेशी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश चौधरी, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन पाटील व शेतकऱ्यांनी ‘बंद’चे आवाहन केले.  

‘राष्ट्रवादी’चे कमखेडा फाट्यावर रास्तारोको 
नरडाणा - राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिंदखेडा तालुका शाखेने शेतकरी संपास पाठिंब्यासाठी कमखेडा (ता. शिंदखेडा) फाट्यावर रास्ता- रोको आंदोलन केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सत्यजित शिसोदे, बेटावद गटाचे गटनेते ललित वारुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. प्रभारी तालुकाध्यक्ष प्रवीण मोरे, युवक तालुकाध्यक्ष चेतन पाटील, वारुड गटप्रमुख पंकज सोनावणे, तालुका उपाध्यक्ष कपिल ठाकरे, लीलाधर सोनवणे, विजय महाले, जगदीश ठाकरे, सतीश बेहरे, राजेश बोरसे, केतन पवार, विकास पाटील, नारायण ढोले, नितीन मोरे, अनिल ठाकरे, राजेंद्र पवार, सागर निळे, बाळा धनगर, जगदीश चौधरी, साहेबराव भदाणे, राहुल पाटील आदी उपस्थित होते. तासाभराच्या आंदोलनातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अटकेनंतर सुटका करण्यात आली.