ग्रामसभेत दारूबंदीचा एकमुखी ठराव; विकासकामांसाठी महिलांचा एल्गार

ग्रामसभेत दारूबंदीचा एकमुखी ठराव; विकासकामांसाठी महिलांचा एल्गार
ग्रामसभेत दारूबंदीचा एकमुखी ठराव; विकासकामांसाठी महिलांचा एल्गार

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील आखाडे (ता. साक्री) येथील ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या महिला ग्रामसभेत सोमवारी (ता. 22) महिलांनी दारूबंदीचा एकमुखी ठराव मंजूर करून घेत विकासकामांसाठी एल्गार पुकारला. त्यासाठी महिलांच्या अकरा सदस्यीय समितीचे गठनही करण्यात आले. गटनेते व उपरपंच शिवलाल ठाकरे ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी होते. तर साक्रीच्या नगरसेविका ऍड. पूनम काकुस्ते-शिंदे प्रमुख मार्गदर्शक होत्या.

व्यासपीठावर निजामपूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल पाटील, सरपंच श्रावण भवरे, माजी सरपंच रावसाहेब ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते हभप. गोविंदराव ठाकरे, ग्रामपंचायत सदस्या सुनंदा ठाकरे, कल्पना ठाकरे, पोलिस हवालदार राजाराम बहिरम, प्रा. भगवान जगदाळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. ऍड. पूनम काकुस्ते, पोलिस उपनिरीक्षक अनिल पाटील, उपरपंच शिवलाल ठाकरे, गोविंदराव ठाकरे, प्रा. भगवान जगदाळे आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी बोलताना ऍड. पूनम काकुस्ते म्हणाल्या की, "महिलांना पन्नास टक्के आरक्षण फक्त कागदोपत्री देण्यात आले असून, प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवणे गरजेचे आहे. स्त्रीला नवनिर्मितीचे, सृजनशीलतेचे निसर्गदत्त वरदान लाभले असून ती कुटुंब, समाज, राष्ट्र उभारणीचे आदर्श कार्य करून गावातच स्वर्ग निर्माण करू शकते. आजवर फक्त रस्ते, वीज आणि पाणी या मुद्द्यांवर निवडणुका झाल्या. पण येथून पुढे मात्र आरोग्य, शिक्षण, शासकीय निधी व त्याचा विनियोग या मुद्द्यांवर निवडणूका होतील. व्यसनाधीनतेचा महिलांनी प्रतिकार केला पाहिजे. त्यासाठी गावातील तरुणांनीही महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे," असे प्रतिपादन ऍड. पूनम काकुस्ते-शिंदे यांनी यावेळी केले.

यावेळी महिलांनी विविध प्रश्न उपस्थित केले. त्यात लग्नकार्य, गणेशोत्सव, कानुबाई उत्सव आदी कार्यक्रमांत तरुणपिढी मोठ्या प्रमाणावर मद्यप्राशन करते. त्याला पायबंद घातला पाहिजे. हातभट्टीची गावठी दारू गावासह परिसरात तयार करणाऱ्यांवर, गावात देशी-विदेशी दारूविक्री करणाऱ्यांवर, मद्यप्राशन करणाऱ्यांवर ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनातर्फे कठोर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी करण्यात आली. दारूबंदीसाठी काम करत असताना गावठी दारूनिर्मिती व विक्री करणाऱ्या महिला व पुरुषही आम्हाला धमक्या देतात. त्यांचाही बंदोबस्त झाला पाहिजे. असे मुद्दे अनुक्रमे केवळबाई फुला बेडसे, बेबीबाई बाळू देसले, विजया विलास ठाकरे यांनी मांडले.

पोलिस उपनिरीक्षक अनिल पाटील यांनीही याबाबत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ग्रामपंचायतीनेही महिलांना पुरेपूर सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सामाजिक कार्यकर्ते हभप. गोविंदराव ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. यावेळी गावातील महिला, पुरुष व तरुण शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.

आदीवासी महिलांची रोजगाराची मागणी
गावात जर संपूर्ण दारूबंदी होणार असेल तर ग्रामपंचायतीने आम्हाला रोजगाराचे पर्यायी साधन उपलब्ध करून द्यावे. शेतकऱ्यांनीही आमचा मजुरीचा दर वाढवून द्यावा. अशी आग्रही मागणी उपस्थित काही आदिवासी महिलांनी केली. यावेळी संबंधित आदिवासी महिला मात्र चांगल्याच संतप्त झाल्या होत्या. शेवटी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढली, तेव्हा त्या शांत झाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com