'करन्सी'चा संदर्भ 'डोक्‍याला ताप' नको म्हणून; 'टेप'मधील संभाषण खरे: अनिल गोटे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

गोटेंचा माध्यमांना इशारा? 
"ऑडिओ टेप'च्या अनुषंगाने प्रसिद्धिमाध्यमांनी बातम्या देण्याचा संदर्भ देत आमदार गोटे यांनी "तुम्ही लिहून टाकले...असे म्हणत मी इथे (पत्रकार परिषदेत) जे बोलतो आहे त्याची कायदेशीर जबाबदारी मीच स्वीकारलेली आहे. तशी कायदेशीर जबाबदारी तुम्हालाही स्वीकारावी लागेल', असे सांगत गोटे यांनी माध्यमांना हा इशाराच दिल्याचा सूर उमटला. 

धुळे : भाजपचा कार्यकर्ता भिसे आणि माझ्यातील संभाषणाच्या "ऑडिओ टेप'मध्ये मला एवढे - एवढे पैसे दे अशी "डिमांड' आहे का? असा उलट प्रश्‍न करत आमदार अनिल गोटे यांनी या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या आरोपांवर उत्तर देण्याचा प्रयत्न केला. नागपूरला वापरण्यासाठी नवीन "करन्सी' आण याचा अर्थ हॉटेलचालक जुन्या नोटा स्वीकारत नाहीत वैगेरे कारणांसाठी माझ्या डोक्‍याला ताप नको म्हणून भिसेकडे आपण "नव्या करन्सी'बाबत उल्लेख केल्याचा खुलासा गोटे यांनी केला. 

राज्य रस्ते विकास महामंडळाचे पदच्युत उपाध्यक्ष राधेश्‍याम मोपलवार यांच्यासह मांगले अपहरण प्रकरणाशी संबंधित सत्ताधारी भाजपचे आमदार गोटे आणि भाजपच्याच एका भिसे नामक कार्यकर्त्यांमधील सव्वासात मिनिटांच्या संभाषणाची "ऑडिओ टेप' राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मनोज मोरे यांनी शुक्रवारी उघड करत राज्यभरात खळबळ उडवून दिली. या प्रकरणी मोरे यांनी सखोल चौकशीची मागणी केली. वादग्रस्त "ऑडिओ टेप'च्या अनुषंगाने आमदार गोटे यांनी आज (शनिवारी) गुलमोहर विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. 

"टेप'मध्ये आक्षेपार्ह काय? 
संबंधित "ऑडिओ टेप'मधील आवाज हा माझाच असल्याची व संभाषण खरे असल्याची कबुली देत गोटे यांनी ती "ऑडिओ टेप' पुन्हा ऐकविली. भिसे व माझ्यातील संभाषणाच्या "ऑडिओ टेप'मध्ये कोणती गोष्ट आपल्याला आक्षेपार्ह वाटली, "टेप'मध्ये मी पैसे मागितल्याचा उल्लेख कुठे आहे, ते सांगा मग मी खुलासा करतो, असे गोटे पत्रकारांना म्हणाले. 

32 कोटी रुपये मोजले 
जो मोपलवार पत्नीच्या घटस्फोटासाठी 32 कोटी रुपये देतो तो आपली अब्रू वाचवायला काय मला लाख- दोन लाख देईल का? असेही गोटे म्हणाले. 

...म्हणून "करन्सी'चा उल्लेख 
वादग्रस्त संभाषणात मांगले अपहरण प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने मुंबई क्राईम ब्रॅंचकडे दिल्या गेलेल्या तपासाविषयी उद्देशून गोटे हे भिसेला म्हणतात "हे बघ येताना नवीन करन्सी आण, जुनी नको आणू, इथे कुणी बाप घेत नाही, इथे हात लावत नाही त्याला, कळलं का? लागल सगळ मार्गी आता, घेऊन ये आणि घेऊन जा तो आदेश...'. यावर खुलासा करताना गोटे म्हणाले, की 8 नोव्हेंबरला काही जुन्या नोटा चलनातून रद्द झाल्या. डिसेंबरमधील अधिवेशनाच्या काळात तुम्ही (भिसे) आलात तर, नागपूरमध्ये वापरण्यासाठी नवीन करन्सी आणा. याचा अर्थ पुन्हा तुमचा (भिसे) माझ्या डोक्‍याला ताप नको की अण्णासाहेब (गोटे) हॉटेलचालक जुन्या नोटा स्वीकारत नाहीत वैगेरे. "करन्सी'चा याअर्थाने संभाषणात उल्लेख असल्याचा खुलासा गोटे यांनी केला. 

चौकशीला सामोरे जाऊ 
"ऑडिओ टेप'मधील संभाषणाच्या अनुषंगाने मोरे यांनी गोटे, भिसे, केळकर यांची चौकशी करण्याची मागणी केली. या अनुषंगाने गोटे म्हणाले, की मीच मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे व निवृत्त नव्हे तर जगातील कुठल्याही न्यायाधीशाला नेमा, अशी मागणी करणार आहे. संबंधित "ऑडिओ टेप'मधील आवाज माझा आहे, संभाषणातील शब्द न्‌ शब्द खरा आहे, हे मीच मान्य करतो. शहरातील गुड्ड्याच्या हत्याकांडापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी सहा महिन्यांपूर्वीच्या संभाषणाची "ऑडिओ टेप' उघड करणे ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची नौटंकी असल्याचेही गोटे म्हणाले. 

माझ्याकडे 35 ऑडिओ सीडी 
मोपलवार यांच्यावर झालेली कारवाई ही समृद्धी महामार्गाच्या प्रकरणात नव्हे तर आघाडी शासनाच्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळातील गैरव्यवहार प्रकरणातील आहे. मोपलवारांशी संबंधित 35 ऑडिओ सीडी आपल्याकडे आहेत. मोपलवार यांच्या 800 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराची तक्रार आणि पंतप्रधान कार्यालयापासून ते इडी, एसीबी, सीबीआय, सेंट्रल व्हिजिलन्स अशा सर्व ठिकाणी केली. चौकशी सुरू झाली. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत मला 22 ते 24 तारखेदरम्यान भेटायला बोलावले आहे. 

औचित्याचा मुद्दा मांडला 
मोपलवार प्रकरणी सभागृहात लक्षवेधी सूचना मांडली होती. अध्यक्षांनी ती स्वीकारली नाही. त्यामुळे औचित्याच्या मुद्‌द्‌याद्वारे हा प्रश्‍न सभागृहात मांडला. राधाकृष्ण विखे- पाटील, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, दिलीप वळसे- पाटील यांनाही आपणच या प्रकरणाची माहिती दिली होती. मोपलवार व अन्य सहा-सात आयएएस अधिकाऱ्यांनी तोट्यात गेलेली कोलकत्याची कंपनी घेतली, ही कंपनी एक वर्षात फायद्यात आली. सर्व अधिकाऱ्यांची टक्केवारी आपण सभागृहात मांडली. पक्षाचे नेते, मुख्यमंत्री अथवा पक्षातून कुणीही मोपलवार प्रकरण काढू नका, असे मला सांगितले नाही अथवा नाराजी व्यक्त केली नाही. मोपलवार हा फोन टॅप करण्याचेच काम करत होता. मांगले व त्याच्या चार-पाच मित्रांनी एक डिटेक्‍टिव्ह कंपनी स्थापन केली होती. मोपलवार प्रकरणात 16 ऑगस्टला दुपारी चारला मंत्रालयात पत्रकार परिषद घेणार असल्याचे गोटे यांनी सांगितले. 

गोटेंचा माध्यमांना इशारा? 
"ऑडिओ टेप'च्या अनुषंगाने प्रसिद्धिमाध्यमांनी बातम्या देण्याचा संदर्भ देत आमदार गोटे यांनी "तुम्ही लिहून टाकले...असे म्हणत मी इथे (पत्रकार परिषदेत) जे बोलतो आहे त्याची कायदेशीर जबाबदारी मीच स्वीकारलेली आहे. तशी कायदेशीर जबाबदारी तुम्हालाही स्वीकारावी लागेल', असे सांगत गोटे यांनी माध्यमांना हा इशाराच दिल्याचा सूर उमटला.