राज्यात दुधाळ जनावरांना "आधार"प्रमाणे बारा आकडी युनिक कोड

दगाजी देवरे
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

केंद्र शासनाची पशुसंजीवनी योजना  

धुळे (म्हसदी)  : शासनाने प्रत्येक ठिकाणी आधार सक्तीचे केले आहे. आधार कार्डवर माणसाची एका क्लिकवर ओळख होते. केंद्र शासनाने दुधाळ जनावरांनाही पशुसंजीवनी योजनेत आधार प्रमाणेच बारा अंकी युनिट कोड देण्यात येत आहे. जिल्ह्यात 89 हजार 44 दुधाळ जनावरांतील 54हजार 719 गाई व 34 हजार 325 म्हशींना टॅग (बिल्ला) लावला जात असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुधाकर शिरसाठ यांनी दिली.

पाळीव जनावरांना स्वताची ओळख मिळवून देण्याचे काम केंद्र शासनाच्या नॅशनल मिशन ऑफ बोव्हाईन प्राडक्टिव्हीटी या योजनेतंर्गत हे काम केले जात आहे. विशेषत: दुधाळ जनावरांना युनिक आयडेंटीफिशन कोड असलेला फायबरचा  टॅग(बिल्ला)लावला जात आहे. यातून शासनाला जनावरांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. धुळे जिल्ह्यात सुमारे पंधरा दिवसापासून दुधाळ गाई-म्हशींना टॅग लावले जात आहे. जनावरांचे टॅगिग झाल्यानंतर सबंधीत गांवातील जनावरांच्या सर्व माहितीची मास्टर फाईल तयार करण्यात येणार आहे. सबंधीत पशुवैद्यकीय अधिकारी, पशुधन विकास अधिकारी वा कर्मचा-यांना शासनाच्या वेबसाईटवर युजर फाईल तयार होईल. त्यात सर्व माहिती ऑनलाइन भरावी लागणार आहे.

बारा आकडी युनिक आयडी कोडवर माहिती
आधार कार्ड प्रमाणे या योजनेत बारा आकडी युनिक कोड सगणंकावर टाकल्यास जनावरांच्या मालकाचे नाव, गांव, जनावरांची जात, किती दुध देते, लसीकरण कधी झाले याची माहिती असणार आहे. तसेच शासकीय योजनेचा लाभ देणे सोयीचे होणार आहे. दुसरीकडे जनावरांच्या उत्पादकतेविषयक औषधोपचार व लसीकरण नोंदी घेण्यासाठी कुठलीही प्रणाली नाही. त्यामुळे आजारी-निरोगी जनावरांची ओळख होत नाही. आजारी-निरोगी जनावरांपासून तयार होणा-या पशुजन्य पदार्थाचे वर्गीकरण करणे शक्य होत नाही. नवीन प्रणालीनुसार या पध्दतीवर नियंत्रण ठेवणे शक्य असल्याचा विश्वास पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केला आहे.

म्हसदी केंद्रात 3200 दुधाळ जनावरे. . . . . !
येथील पशु वैद्यकीय श्रेणी एकच्या दवाखान्यात म्हसदीसह ककाणी, राजबाईशेवाळी, भडगाव, चिंचखेडा आदी गावात 2692 गाई व 508 म्हशी आहेत. यातील सुमारे शंभर दुधाळ जनावरांना टॅग लावल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. श्याम कोळेकर यांनी दिली. पशु पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

 

Web Title: dhule news animals get unit code like aadhar