जवानाच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा ग्रामपंचायतीचा निर्णय

सुधाकर पाटील
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

ग्रामपंचायतीने स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण करण्याचा मान देऊन खरच खुप मोठा सन्मान केला आहे. देशसेवा करत असल्याचे सार्थक झाले. 
- अनिल पाटील भारतीय सैनिक

भडगाव : जवान सीमेवर आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत. त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रत्येकाला आदराची भावना असणे आवश्यक आहे. त्याभावनेतुनच वडजी ( ता. भडगाव) ग्रामपंचायतीने स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण गावतील सुट्टीवर आलेल्या सैनिकाच्या हस्ते करण्याचा करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने सैनिकाला तसे पत्र देण्यात आले आहे. या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

भारतीय सैनिक जिवाची पर्वा न करता सीमेवर देशवासीयांच्या सुरक्षतेसाठी दुश्मनांशी दोन हात करत असतात. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच भावनेतून वडजी ग्रामपंचायतीने स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहणाचा मान गावातील अनिल बाळु पाटील या सुट्टीवर आलेल्या जवानाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच व ग्रामसेवकाच्या सहीचे पत्र अनिल पाटील यांना देण्यात आले आहे. दरवर्षी सरपंचाच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते.

मात्र यावर्षी जवानाच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार असल्याने ग्रामपंचायतीच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अनिल पाटील हे इंडो तिबेटीयन दलात कार्यरत आहेत. सध्या सुट्टीवर असल्याने गावी आले आहेत. वडजी ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहील्यांच सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. याबाबत सरपंच प्रतिभा वाघ यांनी 'सकाळ' शी बोलतांना सांगितले की, सैनिक निस्वार्थीपणे देशासाठी लढत असतात. त्यांचे आपण देणे लागतो. त्यामुळे जवानांच्या हस्ते ध्वजारोहण करून काहीप्रमाणात उतराई होण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. 

ग्रामपंचायतीने स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण करण्याचा मान देऊन खरच खुप मोठा सन्मान केला आहे. देशसेवा करत असल्याचे सार्थक झाले. 
- अनिल पाटील भारतीय सैनिक

 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :