भाजपाची रणनीतीला शिवसेना, काँग्रेसच्या मोर्चाने उत्तर देण्याची धडपड

file photo
file photo

धुळे: आगामी सव्वा वर्षात जिल्हा परीषद व पंचायत समिती, त्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणूका आहेत. त्यादृष्टीने स्थानिक नेत्यांनी आगेकुच करायला सुरुवात केली आहे. ही आगेकुच सामान्य जनतेसाठी किती फायद्याची आहे. हे आगामी काळच ठरवणार आहे. सध्या मोर्चा आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने सुरुवात केली आहे. सत्ताधारी पक्षानेही विकासकामांसाठी मंत्र्याजवळ तगादा सुरु केला आहे. मोर्चा, आंदोलने आणि पाठपुरावा सामान्य जनतेसाठी फायदेशीर ठरायला हवेत.

शिवसेनेचा मोर्चा शेतकर्‍यांच्या विरोधात ?
धुळे जिल्हा शिवसेनेने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरचे वाढलेले भाव आणि धान्य, भाज्या फळांचे वाढलेले दर या विरोधात मोर्चा काढला. वर्षभर शांत असलेल्या सेनेने महागाईबाबत सरकारच्या विरोधात एकदम मोर्चा काढून काय साध्य केले. याबाबतीत जिल्ह्यात चर्चा होत आहे. सततचा दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, शेतीला वीजेचा कमी पुरवठा, बेरोजगारी, कर्जमाफीतील पिळवणूक आदींचा विचार न करता थेट शेतकर्‍यांच्या मालाविरोधातच हा नकळत मोर्चा काढून सेनेने काय साध्य केले? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेनेचा हा मोर्चा सरकार नव्हे तर शेतकर्‍यांच्याच विरोधात होता. अशी मानसिकताही शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाली आहे. सेनेने येत्या काळात जिल्ह्यात भक्कम स्थान निर्माण करण्यासाठी कल्पक आणि भक्कम कृती कार्यक्रम आखणे गरजेचे आहे.

भाजपाचे मंत्री भाजपाच्याच समस्या
ऊर्जामंत्री चंद्रेशेखर बावनकुळे नुकतेच जिल्हा दौर्‍यावर आले होते. त्यांनी छत्रपती शाहू महाराज सभागृहात जनतेच्या वीजेच्या समस्या सोडविण्यासाठी खास दरबारही (?) भरविला. यात समस्या मांडण्यासाठी भाजपाचेच गाव, तालुका व जिल्हा पातळीवरचे पदाधिकारी समस्या मांडत होते. विजविषयक समस्या जनतेच्या होत्या की पदाधिकार्‍यांच्या असा प्रश्न निर्माण झाला आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी समस्या मांडल्या असत्या; तर त्यास राजकिय रंग मिळाला असता. भाजपाचेच पदाधिकारी समस्या मांडत आहेत. म्हणजेच सरकार आमचे असूनही समस्या सुटत नसल्याचा अर्थबोध निघत आहे. अशा स्थिती सामान्य समस्याग्रस्त नागरिकांनी करायचे काय? असा प्रश्न जनसामान्यांमधून उपस्थित होत आहे. एका शेतकर्‍याने भाजपाच्या गावगाड्यातील एका पुढार्‍याला दुष्काळी तालुक्यांमध्ये पाण्याची समस्या बिकट आहे. त्या भागात ज्यादा वीज देण्याचे कारण काय, असा तो प्रश्न विचारायला लावला होता. त्याने तो प्रश्न उपस्थित केलाच नाही. प्रश्न हलकाफुलका होता. पण शासनाची खिल्ली उडविणाराच होता. हा कार्यक्रम म्हणजे भाजपचेच सरकार अन भाजपच्याच समस्या असाच ठरला.

काँग्रेसचेही आंदोलन
जिल्ह्यात काँग्रेसनेही महागाईच्या विरोधात मोर्चा काढण्यास सुरुवात केली आहे. साक्री, धुळे व शिरपूर या तिन्ही तालुक्यांत काँग्रेसचे भक्कम अस्तित्व आहे. मात्र शासनाच्या निर्णयांना तेवढा विरोध होत नाही. जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी स्वतःला शिंदखेडा तालुक्यात पुर्णतः गुंतवून घेतले आहे. युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असतांना त्यांनी विविध आंदोलनांच्या माध्यमातून मोठे अस्तित्व निर्माण केले होते. सध्या पुन्हा त्यांनी काँग्रेस आणि जनतेसाठी सातत्यपुर्ण आंदोलनाचे अस्र्त उचलणे आवश्यक असल्याचे काँग्रेसच्याच गोटात बोलले जावू लागले आहे.

धुळे शहर आणि तालुक्यात माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, म्हाडाचे माजी सभापती किरण शिंदे, माजी कृषी सभापती किरण पाटील यांच्यामुळे राष्र्टवादीचे चांगले अस्तित्व आहे. अस्तित्वाचे मतांमध्ये रुपांतर करण्याची कसरत त्यांनी करावी लागणार आहे. शहरात राष्र्टवादीतून ओउट गोईंग सुरु आहे. शिंदखेडा तालुक्यात माजी हेमंत देशमुख यांनी राष्र्टवादीला बाय बाय केलेय. उद्योजक व जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे विनायक मेटेंनी स्थापलेल्या पक्षात गेलेत. संदीप बेडसे आता एकाकी किल्ला लढवित आहेत. तिथे आता राष्र्टवादीलाच बेडसे यांचा आधार आहे. असे म्हटले जात आहे. भाजपचे नेते केंद्र आणि राज्य शासन करीत असलेल्या कामांवर नजर ठेवून आहेत. स्थानिक पातळीवर ठोस अशी रणनिती नाही. पण विकासकामे हिच रणनीती राहणार आहे. इतर पक्षांमधून दाखल नेत्यांचाही त्यांना सामना करावा लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com