गुंड गुड्ड्यावर हल्ला केल्याची कबुली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

सहा मारेकऱ्यांचा जाबजबाब;  दौंडहून चावरेला अटक; बारा जण ताब्यात 

धुळे - गुंड गुड्ड्याकडून आम्हाला त्रास होता. त्यामुळे त्याच्यावर पाळत ठेवली होती. तो १८ जुलैला सकाळी सहाला पारोळा रोडवरील गोपाल टी हाऊसमध्ये येणार असल्याची माहिती होती. तो तेथे आल्यानंतर आम्ही त्याच्यावर हल्ला केला, अशी स्पष्ट कबुली अटकेतील मारेकऱ्यांनी पोलिसांपुढे दिली. या मारेकऱ्यांनी हत्याकांडात आम्ही सहभागी नव्हतो, असे सांगितले नसल्यामुळे कारवाईचा फास आवळला गेला आहे. दरम्यान, पोलिसांनी दौंड (जि. पुणे) तालुक्‍यातून येथून सहावा मारेकरी विक्रम ऊर्फ विकी रमेश चावरे यास आज अटक केली.  

येथील कुख्यात गुंड रफियोद्दीन शेख ऊर्फ गुड्ड्याच्या हत्याकांड प्रकरणी अकरापैकी आतापर्यंत सहा मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक करण्यात यश मिळविले आहे. त्यात सहावा आरोपी चावरे आहे. याशिवाय मारेकऱ्यांना आश्रय देणाऱ्या सात संशयितांनाही अटक झाली आहे. त्यामुळे अटकेतील आरोपी, संशयितांची संख्या एकूण बारा झाली आहे. मुख्य आरोपींमध्ये विकी ऊर्फ विकास श्‍याम गोयर, राजेंद्र ऊर्फ भद्रा रमेश देवरे, श्‍याम जोगीलाल गोयर, विलास श्‍याम गोयर ऊर्फ छोटा पापा, विजय श्‍याम गोयर ऊर्फ बडा पापा अद्यापही फरार असून त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. 

चौघांना पोलिस कोठडी
दोंडाईचा पोलिसांनी मारेकरी भीमा रमेश देवरे (वय २७, स्नेह नगर), योगेश बापू जगताप (वय २२, रा. वडगाव सिंहगड रोड, निवृत्ती नगर, पुणे) यांना बुधवारी अटक केली होती. तसेच पोलिसांच्या अन्य एका पथकाने खंडवा (जि. बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) येथून संशयित मारेकरी गणेश बिवाल यास अटक केली. नाशिक येथून मारेकऱ्यांना आश्रय देण्याच्या संशयावरून अटक झालेला राकेश सोनार, अशा या चौघांना जिल्हा न्यायालयाने चार ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली, अटकेतील सहा आरोपी गुंड गुड्ड्याची येथील पारोळा रोडवरील गोपाल टी हाऊससह समोरील रस्त्यावर अकरा मारेकऱ्यांनी १८ जुलैस सकाळी सव्वासहाच्या सुमारास निर्घृण हत्या झाली. हत्याकांड प्रकरणात आतापर्यंत सागर पवार ऊर्फ कट्टी (रा. धुळे), अभय ऊर्फ दादू देवरे (रा. धुळे), भीमा देवरे (रा. धुळे), योगेश जगताप (पुणे), गणेश बिवाल (खंडवा), विक्की चावरे (दौंड) यास अटक झाली. त्यांची चौकशी सुरू आहे.  

सहा आश्रयदात्यांची चौकशी
आरोपींना आश्रय व मदत केल्याप्रकरणी योगेश रोशनलाल जयस्वाल (रा. सहजीवन नगर, धुळे), प्रकाश देवचंद मोरे (उल्हासनगर), महेंद्र यशवंत खैरनार (कासारे, ता. साक्री), भूषण ठाकरे (रा. फागणे, ता. धुळे), लखन जेधे (संगमनेर), राकेश सोनार (नाशिक) यांनाही अटक झाली असून त्यांची चौकशी सुरू आहे. पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या सहकार्य पोलिस उपअधीक्षक हिंमतराव जाधव, एलसीबी निरीक्षक रमेशसिंह परदेशी, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल वडनेरे व विविध पोलिस पथके अहोरात्र फरार मारेकऱ्यांचा तपास करीत आहेत.

राऊ येथून चावरेला अटक
दौंड (जि. पुणे) तालुक्‍यातील राऊ येथील साखर कारखाना परिसरात संशयित विक्रम ऊर्फ विकी रमेश चावरे (वय २७, रा. एकता नगर, बिलाडी रोड, देवपूर) याला पोलिसांनी अटक केली. याबाबत माहिती मिळताच त्याला पोलिस अधीक्षक एम. रामकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलिस ठाण्याचे  सहाय्यक निरीक्षक पी. जी. राठोड, हवालदार दीपक पाटील, रमेश माळी, कुणाल पानपाटील, रवी राठोड यांनी अटक करून आणले.