अवैध व्यवसायांसह गुन्हेगारीत हरवतेय धुळे! 

अवैध व्यवसायांसह गुन्हेगारीत हरवतेय धुळे! 

धुळे - मुंबई- आग्रा, नागपूर- सुरत आणि धुळे- सोलापूर, अशा तीन राष्ट्रीय महामार्गांलगत वसलेले धुळे शहर औद्योगिक विकासापेक्षा गुन्हेगारी कारवाया, अवैध व्यवसाय, जातीय वादामुळेच चर्चेत असते. एकीकडे "एज्युकेशनल हब' म्हणून जिल्हा नावारूपाला आला असताना आजही अनामिक भीती, अशांततेची स्थिती काही केल्या पाठ सोडत नसल्याचेही वास्तव आहे. याचा गैरफायदा गुंड, असामाजिक प्रवृत्तींनी उठवला. त्यांनी काही राजकीय मंडळींच्या पाठबळावर उभारलेली समांतर गैरअर्थव्यवस्था धुळेकरांच्या मुळावर उठली आहे. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा गुंड गुड्ड्याच्या हत्याकांडानंतर प्रत्येक जण अनुभवतो आहे. 

महामार्गांचे चौपदरीकरण, रेल्वेसह विमानतळामुळे दळणवळण सुविधेचे बळकटीकरण, विविध प्रकल्पांमुळे मुबलक जलसाठा, "एज्युकेशन हब'मुळे कुशल, तसेच अकुशल कामगारांची उपलब्धता, जमिनीच्या उपलब्धतेमुळे औद्योगिक विकासाला वाव, समर्थ रामदास स्वामींचा वैचारिक ठेवा जोपासणारे वाग्देवता मंदिर, राजवाडे संशोधन मंडळ यासह अनेक ऐतिहासिक वास्तू, ठेवा, कर्तबगार आणि कर्तृत्ववान व्यक्तींमुळे धुळ्याचा लौकिक सातासमुद्रापारही आहे. 

न उलगडणारे कोडे 
या बळावर देशासह जगाच्या औद्योगिक नकाशावर शहरासह जिल्हा स्थान बळकट करण्याच्या प्रयत्नात असतानाच जसजशी प्रगती होतेय (संथपणे?) त्या प्रमाणात शहरात आजही वाढत्या गुन्हेगारी कारवाया, अवैध व्यवसाय, हत्या, अनुचित प्रकार, प्रसंगी जातीय वादातून निर्माण केली जाणारी अशांतता, मूठभर असामाजिक प्रवृत्तींकडून ठेवली जाणारी दहशत आदी प्रकारांच्या विळख्यात "धुळे हरवतेय', अशी प्रतिक्रिया प्रत्येक जण व्यक्त करताना दिसतो. असे का, हेदेखील एक न उलगडणारे कोडेच ठरते आहे. 

गुन्हेगारी जगताचे पाय पसरले 
राजकारणाचे गुन्हेगारीकरण असो की काही वादामुळे दंगलीला पोषक स्थिती, त्यात खतपाणी घालणाऱ्यांसह टोळ्यांमुळे देशातील विविध भागांतील गुन्हेगारी जगतातील लोकांचा या शहराशी वाढलेला संपर्कही चिंतेचा विषय ठरतो आहे. एकीकडे विकासाच्या टप्प्यावरील शहर आणि लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचा कुठलाही अंकुश नसल्याने निरनिराळ्या टोळ्यांसह गुन्हेगारी जगताने केव्हाच येथे हातपाय पसरण्यास प्रारंभ केल्याचे वेळोवेळी घडलेल्या घटनांनीही दर्शविले आहे. 

शहराचा चेहरा काळवंडलेलाच 
गुन्हेगारी जगतातील बहुसंख्य घटकांनी या शहराला स्पर्श केल्याने एक चांगली प्रतिमा म्हणून मिरवू पाहणाऱ्या या शहराचा चेहरा चमकण्यापेक्षा काळवंडलेलाच दिसतो आहे. तसे मत गुंड गुड्ड्याच्या निर्घृण हत्याकांडाची क्‍लीप देशभरातील सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रत्येक जण मांडू लागला. हीच बाब सुजाण धुळेकरांच्या दृष्टीने चिंतेची ठरली आहे. 

विकासावर विपरीतच परिणाम 
पूर्वी झालेल्या जातीय दंगलींमुळे येथील जनजीवनासह बाजारपेठेवर परिणाम झाला. उद्योग- व्यवसायांच्या प्रगतीला खीळ बसली. वरच्या वर होणाऱ्या काही दंगली, हाणामारी, टोळीयुद्ध व तणावाच्या वातावरणामुळे शहर केव्हा, कसे वेठीस धरले जाईल, याचा कुठला नेम नाही. गुंड गुड्ड्याच्या हत्याकांडानंतर चार दिवस दहशतीचे वातावरण धुळेकरांनी अनुभवलेच आहे. त्याचा परिणाम व्यापारी पेठेवर झाला. कोणत्या वेळी काय घडेल, याची शाश्‍वती नाही. शहर ज्वालामुखीच्या तोंडावरच असल्याची भावना अनेक सुजाण धुळेकर मांडत असतात. शहराला हे स्वरूप का आणि कसे आले?, ते कायम का आहे?, याचा उलगडा नेमकेपणाने करता येणे अशक्‍य असले तरी लोकप्रतिनिधी आणि खाबुगिरीत अडकलेल्या सरकारी यंत्रणांमध्ये समन्वय, इच्छाशक्तीचा अभाव असल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचा धुळेकर काढत असलेला निष्कर्ष कोण छातीठोकपणे नाकारू शकेल? 
 

"त्याचे' उत्तर कुणाकडेही नाही... 
जळगाव, नाशिकप्रमाणे विकासाची आस असणाऱ्या धुळ्यात गुन्हेगारीचा चेहरा काही केल्या बदलत नसल्याने, दंगलीचे शहर असा कलंक ठोसपणे पुसला जात नसल्याने प्रत्येक जण अस्वस्थ आहे. त्यात कुख्यात गुंड गुड्ड्याच्या दिवसाढवळ्या झालेल्या हत्याकांडाने या स्थितीत भर घातल्याने ही अस्वस्थता कधी व कशी संपणार याचे उत्तर मात्र सध्या कोणाकडेच नाही. मात्र, ते बदलायला हवे यासाठी समाजधुरिणांनाही पुढाकार घ्यायला हवा. 

(क्रमशः) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com