जैताणे आरोग्य केंद्रात घाणीचे साम्राज्य; आरोग्याची ऐसीतैशी...

जैताणे (ता. साक्री) : येथील आरोग्य केंद्र परिसरात वाढलेले गाजरगवत व काटेरी झुडपे.
जैताणे (ता. साक्री) : येथील आरोग्य केंद्र परिसरात वाढलेले गाजरगवत व काटेरी झुडपे.

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील आरोग्य केंद्रात घाणीचे साम्राज्य पसरले असून, आरोग्य केंद्राच्या आजूबाजूच्या परिसरात उगवलेल्या काटेरी झुडपे व गाजरगवतामुळे डासांचा प्रादुर्भाव होऊन रुग्णांसह ग्रामस्थांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. रुग्णालय प्रशासनाने त्वरित स्वच्छता मोहीम हाती घेऊन परिसर स्वच्छ केला पाहिजे. अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

रुग्णांसह विद्यार्थ्यांचे आरोग्यही धोक्यात...
आरोग्य केंद्राच्या कुंपणाला लागूनच आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय ही सुमारे तीन हजार विद्यार्थी संख्या असलेली मोठी शाळा आहे. आरोग्य केंद्र परिसरात वाढलेल्या गाजरगवतामुळे डासांचा प्रादुर्भाव होऊन विद्यार्थ्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. तसेच याठिकाणी फेकलेल्या मृत जनावरांमुळेही वर्गांत प्रचंड दुर्गंधी येते. त्यावर प्रभावी उपाययोजना झाली पाहिजे.

ड्रेनेजची असुविधा...
रुग्णालयात ड्रेनेजची सुविधा नसल्याने निवासस्थानांचे सांडपाणी उघडयावर वाहते. पावसाचे पाणीही मोठमोठ्या डबक्यात साचून राहते. त्यामुळेही डासांचा प्रादुर्भाव होतो. म्हणून हे सांडपाणी भूमिगत गटारीत सोडले गेले पाहिजे.

रुग्णालयासह निवासस्थानांचीही दुरावस्था...
येथील रुग्णालयाची इमारत ही कौलारू आहे. त्यामुळे तिला पावसाळ्यात गळती लागते. तर निवासस्थानांचीही प्रचंड दुरावस्था झाल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारीही येथे राहण्यास धजावत नाहीत. त्यामुळे काही कर्मचारी बाहेरगावाहून ये-जा करतात तर काही गावातच खाजगी घरे भाड्याने घेऊन राहतात.

रुग्णालयात केवळ एकच शौचालय...
एवढ्या मोठ्या रुग्णालयात रुग्णांसाठी केवळ एकच शौचालय चालू अवस्थेत आहे. इतर चार शौचालये कुलूपबंद अवस्थेत आहेत. रुग्णांसोबत येणाऱ्या नातलगांसाठी साध्या स्वच्छतागृहांचीही सोय नाही. गावाला स्वच्छतेचे धडे देणाऱ्या रुग्णालयाची ही अवस्था आहे. गावाच्या आरोग्याचा सर्व्हे करणाऱ्या आरोग्य यंत्रणेच्या आरोग्याचा सर्व्हे कुणी करावा ? असा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे.

शवविच्छेदन गृहाचीही दुरावस्था...
येथील शवविच्छेदन गृहाचीही प्रचंड दुरावस्था झाली असून ते संपूर्ण गाजरगवताने वेढलेले आहे. शवविच्छेदन गृहातील स्वीपर पदही अनेक वर्षांपासून रिक्तच आहे. त्यामुळे अनेकदा शवविच्छेदनाला विलंब होऊन मृतदेहांचीही विटंबना व कुचंबना होते. त्यामुळे अनेकदा कर्मचारी व मृतांचे नातेवाईक यांच्यात शाब्दिक चकमकीही उडतात.

ग्रामीण रुग्णालय केवळ नावाला...
येथे सन 2008 पासून मंजूर झालेले ग्रामीण रुग्णालय जागेच्या न्यायालयीन स्थगितीमुळे केवळ कागदावरच आहे. ग्रामपंचायतही ग्रामीण रुग्णालयाला पर्यायी जागा देण्याबाबत बेफिकीर आहे. आराखड्यानुसार किमान 25 कर्मचाऱ्यांचा स्टाफ आवश्यक असताना याठिकाणी हजेरीपुस्तकावर फक्त 11 कर्मचारी आहेत. त्यातीलही काही प्रतिनियुक्तीवर, काही प्रशिक्षणाला तर काही रजेवर आहेत. सद्या केवळ पाच ते सहा कर्मचारी प्रत्यक्ष कार्यरत आहेत. औषधसाठाही प्राथमिक आरोग्य केंद्राचाच वापरला जातो..

पायाभूत सुविधांचा अभाव...
याठिकाणी ग्रामस्थांची फार पूर्वीपासून 108 रुग्णवाहिकेची मागणी आहे. पण साधी तेवढीही पूर्तता झालेली नाही. माळमाथा परिसरात जैताणे, दुसाणे, छडवेल, नवापाडा व कळंभीर ही पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. ही पाचही आरोग्य केंद्रे जैताणे ग्रामीण रुग्णालयांतर्गत समाविष्ट आहेत. म्हणून हा प्रश्न फक्त निजामपूर-जैताणे गावांपुरता मर्यादित नसून माळमाथा परिसरातील एक लाख एवढया लोकसंख्येचा आहे.

रुग्णकल्याण समितीच्या चौकशीची गरज...
येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णकल्याण समित्यांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. या समित्यांच्या नियमित बैठका होतात का ? रुग्णकल्याणासाठी येणारा लाखो रुपयांचा निधी नक्की जातो कुठे ? यासह वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्थानिक आर्थिक बजेटचे काय ? या सर्व बाबींची सखोल चौकशी झाली पाहिजे.

ग्रामीण रुग्णालयासाठी "वादग्रस्त" जागेचा अट्टाहास का ?
ग्रामीण रुग्णालयासाठी न्यायप्रविष्ट व वादग्रस्त जागेचाच अट्टाहास का धरला जातो असा सर्वसामान्यांना प्रश्न पडतो. वास्तविक बहुतेक गावांमध्ये गावापासून एक-दोन किलोमीटर अंतरावर शासकीय रुग्णालये आहेत. मग जैताणे ग्रामपंचायत पर्यायी जागा का देत नाही ? हा खरा प्रश्न आहे. लोकप्रतिनिधींनी त्याच वादग्रस्त जागेचा अट्टाहास सोडून पाच एकर पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्यास चुटकीसरशी हा प्रश्न सुटेल. पुढाऱ्यांनी जनतेच्या जिव्हाळ्याच्या आरोग्याच्या प्रश्नावर राजकारण करू नये अशी अपेक्षा आहे.

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव...
वास्तविक माळमाथा परिसरासह निजामपूर-जैताणे व संपूर्ण साक्री तालुका हा नंदुरबार लोकसभा मतदार संघात येतो. खासदार हिना गावीत ह्या स्वतः डॉक्टर असूनही जर हा प्रश्न सुटत नसेल तर हे मोठे दुर्दैव आहे. तालुक्याचे आमदार डी. एस. हेही प्रशासनात एक मोठे सनदी अधिकारी पदावर होते. त्यांनाही या गोष्टीची जाणीव आहे. तालुक्याचे ज्येष्ठ नेते शिवाजी दहिते हे स्वतः जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत. तरीही हा प्रश्न निकाली निघत नसेल तर यापेक्षा मोठे दुर्दैव काय असेल ? निजामपूर-जैताणेच्या स्थानिक नेत्यांनीही जातीपातीचे संकुचित राजकारण बाजूला ठेवून याचा वरीष्ठ पातळीवर पाठपुरावा केला पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com