नांदेडच्या आमदारास लाच देणारा धुळ्याचा 'डेप्युटी सीईओ' ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

पंचायत राज समितीच्या दौऱ्यातील धक्कादायक प्रकार

धुळे : दौऱ्यावर असलेल्या पंचायत राज समितीच्या सदस्य आमदाराने आज (शुक्रवार) सायंकाळी साडेपाचला येथील जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास लाच प्रकरणी पकडून दिल्याने खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संबंधित अधिकाऱ्यास ताब्यात घेतले आहे.

पंचायत राज समितीच्या दौऱ्यातील धक्कादायक प्रकार

धुळे : दौऱ्यावर असलेल्या पंचायत राज समितीच्या सदस्य आमदाराने आज (शुक्रवार) सायंकाळी साडेपाचला येथील जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास लाच प्रकरणी पकडून दिल्याने खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संबंधित अधिकाऱ्यास ताब्यात घेतले आहे.

पंचायत राज समिती तीन दिवसांपासून दौऱ्यावर आहे. तिचा आज अंतिम दिन होता. दौऱ्यात 23 पैकी राज्यातील ठिकठिकाणचे 16 सदस्य आमदार सहभागी झाले. समितीप्रमुख आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हा परिषदेत दुपारी कामकाज आटोपल्यानंतर संबंधित सदस्य आमदार शहरातील हॉटेल झंकार पॅलेसमधील मुक्कामाच्या ठिकाणी परतले. अशात सायंकाळी साडेपाचला आमदारास लाच देताना जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी ताब्यात, अशी वार्ता पसरली.

आमदार पाटलांची तक्रार
समितीस्तरावर आणि अधिकारी स्तरावर मौन बाळगले जात असताना नांदेडचे आमदार हेमंत पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांना पकडून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली. आमदार पाटील यांना दीड लाखाची लाच देण्याचा प्रयत्न माळी यांच्याकडून झाल्याचा आरोप आहे. माळी यांना पकडून ठेवल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक हॉटेल झंकार पॅलेसमध्ये पोहोचले. त्यांनी माळी यांना ताब्यात घेतले. आठवड्यापूर्वी माळी येथील जिल्हा परिषदेत रुजू झाले होते. त्यांनी शिरपूरला गटविकास अधिकारी, नंदुरबार येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा भार सांभाळलेला आहे. आमदार पाटील यांनी तक्रार केल्यावर ही कारवाई झाली. त्यांना "प्रेमाची भेट' देण्याचा प्रकार अधिकारी माळी यांना चांगलाच महागात पडला आहे. आमदार पाटील हे मूळचे कापडणे (ता. धुळे) येथील रहिवाशी आहेत, हे विशेष!

चौकशी टळावी म्हणून...
पंचायत राज समितीमधील सदस्यांना "पाकीट' पोहोचविण्याची संस्कृती जोपासली जात असल्याची चर्चा राज्यात घडत असते. अधिकाऱ्यांची चौकशी लावू नये, निलंबित करू नये, यासाठी "पाकिटे' दिली जातात, ग्रामसेवक, अभियंता व अन्य अधिकारी पैसे गोळा करून पाकिटे वाटप करतात आणि कारवाईचा ससेमिरा टाळतात, अशी खमंग चर्चाही समितीच्या दौऱ्यानंतर ठिकठिकाणी घडतच असते. तिला आमदार पाटील यांनी छेद दिल्याचे म्हटले जात आहे. आमदार पाटील व सहकारी सदस्य आमदारांनी गुरुवारी धुळे तालुक्‍यात कापडणे, नेरसह अनेक गावांचा दौरा केला. त्यात पाणी योजना, आरोग्य केंद्रे, अंगणवाड्या, पोषण आहार, पाणी योजनांसह विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची तपासणी केली. त्यातील काही योजनात गैरप्रकार, अनियमितता आढळल्याने चौकशीसह कारवाई टळावी म्हणून आमदार पाटील यांना लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात आले.