महापालिकेत आली मोकाट जनावरे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

धुळे - आपल्याकडील गुरांची नोंदणी करा, आपल्या मालकीच्या जागेवर गोठ्यात त्यांची व्यवस्था करा अन्यथा संबंधित पशुपालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा महापालिकेने दिला खरा पण या इशाऱ्याला गुरे मालक जुमानत नसल्याचे चित्र आहे.  थेट महापालिकेत मोकाट जनावर मुक्तपणे संचार करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

शहरातील मुख्य रस्ते, चौकांमध्ये मोकाट गुरे ठाण मांडून बसल्याचे चित्र पाहायला मिळते. याप्रश्‍नी प्रशासनाने लक्ष घालत जाहीर नोटीस प्रसिद्ध करून गुरे मालकांना इशारा दिला. गुरे मालकांनी आपल्याकडील गुरे वर्णनासह महापालिकेकडे नोंद करून रीतसर परवानगी घ्यावी, मालकीच्या जागेवर व नियमाप्रमाणे गोठा करून तेथे ती बांधावी, आजूबाजूच्या लोकांना उपद्रव होईल किंवा धोका पोहोचेल अशा जागेवर कोणतेही जनावर पाळू नये, सात दिवसात नियमानुसार नोंदणी, परवानगी व उपाययोजना न केल्यास व गुरे सार्वजनिक रस्त्यावर अथवा जागेवर भटकताना आढळल्यास पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल किंवा संबंधित गुरे पोलिसांकडे जमा करून ते सूचना देतील त्याप्रमाणे व्यवस्था करू अथवा मनपा कोंडवाड्यात टाकू असा इशारा या नोटीशीतून देण्यात आला होता. 27 जुलैला प्रसिद्ध या नोटिशीला सात दिवस झाले मात्र, शहरात मोकाट गुरांचा मुक्तसंचार कायम आहे. 

थेट महापालिकेत संचार 
आज सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान एक मोकाट जनावर थेट महापालिकेत घुसले होते. आवारात फिरून हे जनावर आस्थापना विभाग, सहाय्यक आयुक्त, स्थायी समिती सभापती, बांधकाम विभागाचे दालन असलेल्या पॅसेजमध्येही भटकले. काही जणांनी त्याला हाकलल्यानंतर ते महापालिकेबाहेर गेले.