ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. मु. ब. शहा यांचे निधन

ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. मु. ब. शहा यांचे निधन

धुळे - आपल्या आचरण आणि कृतीतून आयुष्यभर गांधीविचारांची पेरणी करणारे थोर विचारवंत, साक्षेपी समीक्षक अन्‌ आंतरभारतीचे समन्वयक प्रा. डॉ. मु. ब. तथा मुरलीधर बन्सीलाल शहा (वय ८०) यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने येथील सुयोगनगरमधील निवासस्थानी निधन झाले. आज दुपारी बाराच्या सुमारास देवपूरमधील अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या निधनाने गांधीविचारांचे प्रसारक हरपल्याची भावना विविध मान्यवरांनी श्रद्धांजलीप्रसंगी व्यक्त केली. त्यांच्यामागे दोन विवाहित मुली प्रज्ञा आणि ऋचा आणि मुलगा सौमित्र, असा परिवार आहे.

प्राध्यापक असलेल्या डॉ. शहा यांनी येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालयात हिंदी विभागाचे प्रमुख म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी साहित्य आणि समाजसेवेत स्वतःला वाहून घेतले. येथील डॉ. का. स. वाणी संस्थेने निर्मिती केलेल्या अनेक ग्रंथांचे त्यांनी संपादन केले. खानदेशाचा सांस्कृतिक इतिहास खंड, राजवाडे साहित्याचे संशोधन, खंडाचे संपादन यासह विविध विषयांवर त्यांनी विपुल लेखन केले. साहित्य आणि पत्रकारितेतील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन गंगाशरण पुरस्कार आणि महात्मा फुलेंच्या आत्मचरित्राचे मराठीतून हिंदीत केलेल्या अनुवादाबद्दल असे दोनदा त्यांना राष्ट्रपतींचे पुरस्कार मिळाले होते. 

आयुष्यभर गांधी विचारांच्या प्रसारास वाहून घेतलेले डॉ. शहा विविध सामाजिक चळवळी अन्‌ उपक्रमांशी जोडले गेले होते. विद्यार्थ्यांनी राष्ट्राच्या उभारणीत योगदान द्यावे या भूमिकेतून त्यांनी छात्रभारतीची स्थापना केली. पुढे देशपातळीवर ही व्यापक विद्यार्थी चळवळ उभी राहिली. साने गुरुजी, विनोबा भावे यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन तरुणांनी पुढे यावे यासाठी ते आयुष्यभर कार्यरत राहिले. याच माध्यमातून ते पुढे पुण्याच्या ‘राष्ट्रभाषा सभे’च्या कार्यात सहभागी झाले. सध्या ते या संस्थेचे उपाध्यक्ष आणि उत्तर महाराष्ट्र हिंदी राष्ट्रभाषा सभेचे विश्‍वस्त होते. राज्यभर साने गुरुजी कथामाला रुजविण्याचे कामही त्यांनी केले.

‘भारत जोडो’मध्ये योगदान
थोर समाजसेवक बाबा आमटे यांची ‘भारत जोडो’ यात्रा धुळ्यात आली असता ते बाबांच्या सानिध्यात आले. ते यात्रेत सहभागी झाले अन्‌ भारतभर फिरले. गांधीवादी विचारांचे डॉ. शहा यांचे येथून पुढे आमटे परिवाराशी कायमचे ऋणानुबंध जोडले गेले. ते वर्षातून एकदा आनंदवनात हमखास जात असत. तेथे ते युवकांना मार्गदर्शन, युवक बिरादरीसाठी काम करीत. नर्मदा आंदोलन सुरू असताना मणिबेली येथे झालेल्या सत्याग्रहातही ते अग्रभागी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com