आमदार गोटे यांच्या संभाषणाची ध्वनीफित उघड

आमदार गोटे यांच्या संभाषणाची ध्वनीफित उघड

धुळे - राज्य रस्ते विकास महामंडळाचे पदच्युत उपाध्यक्ष राधेश्‍याम मोपलवार यांच्याशी आणि मांगले अपहरण प्रकरणाशी संबंधित सत्ताधारी भाजपचे आमदार अनिल गोटे आणि भाजपच्याच भिसे नावाच्या कार्यकर्त्यामधील सव्वासात मिनिटांच्या संभाषणाची खळबळजनक ध्वनीफित राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मनोज मोरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ऐकवली.

विधिमंडळ अधिवेशनातील लक्षवेधी सूचनेचा वापर सत्ताधारी आमदार गोटे हे गैरव्यवसायासाठी करीत असल्याचा गंभीर आरोप मोरे यांनी केला. या प्रकरणी आमदार गोटे यांची "ईडी'सह लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, प्राप्तिकर विभाग आणि "एसआयटी'कडून तत्काळ चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, या पार्श्‍वभूमीवर दूरध्वनीद्वारे प्रतिक्रिया देताना गोटे म्हणाले, की "होय, संभाषणातील आवाज माझा आहे. याबाबत धुळ्यात शनिवारू (ता. 12) सकाळी पत्रकार परिषदेत भूमिका मांडेन.

भाजपच्या भूमिकेचे वाभाडे
मोरे म्हणाले, की अब्दुल करीम तेलगीच्या बनावट मुद्रांक गैरव्यवहारातील आरोपी व जामिनावर सुटलेले आमदार गोटे यांच्याप्रमाणेच या प्रकरणात मोपलवार हेही जामिनावर सुटलेले आहेत. अशा अधिकाऱ्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाचे काम सोपविलेच कसे, हा कळीचा प्रश्‍न आहे. या प्रकरणातून आमदार गोटे यांच्या सभ्यतेसह नैतिकेवर प्रश्‍नचिन्ह लागले आहे.

सखोल चौकशीची मागणी
धुळे शहरातील सलग 13 वर्षांतील आमदारकीत गोटे यांनी शहराचा विकास, बेरोजगारांच्या प्रश्‍नावर कधीही लक्षवेधी सूचना मांडली नाही. मात्र, त्यांनी अधिवेशनातील लक्षवेधी सूचना भ्रष्ट अधिकारी, मोठ्या अधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत होती. गोटे यांचे खाण्याचे व दाखविण्याचे दात वेगळे आहेत. हे त्यांच्या संभाषणवरून कळते. या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे प्रथम दाद मागणार आहे, असे मोरे यांनी सांगितले.

कारभार तपासा
मुंबई गुन्हे शाखेबाबत गोटे यांनी केलेले विधान गंभीर असून, त्याची गांभीर्याने चौकशी व्हावी. गोटे यांची आमदारकी तत्काळ रद्द करावी. गोटे आमदार निवासऐवजी मुंबईतील आलिशान हॉटेलमध्ये राहून जो काही कारभार करतात त्याचीही चौकशी करावी, अशी मागणी मोरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

दोघांमधील संभाषणाचा आशय
आमदार गोटे व भिसे यांच्यातील संभाषणाची लिखित "स्क्रिप्ट'ही मोरे यांनी पत्रकारांना दिली. त्यातील सारांश असा :
गोटे : माझ्या अर्जावरून मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने मांगले किडनॅपिंग प्रकरणी मुंबई क्राईम ब्रॅंचकडे तपास दिला.

भिसे : घेणे आहे म्हणून काम करताय ना आपण.
गोटे : मोपलवार लायकीचा नाही, जिवापेक्षा पैसे महत्त्वाचे आहे काय?
भिसे : साहेब, करत होतो ऍरेजमेंट, झाली नाही. त्याच्या मुलाबाळांकडे पाहा, आमच्या पाठीशी असलेला 'सपोर्ट' तुम्ही काढू नका, तुमच्या मार्गदर्शनाखाली काय करायचे ते करू, मी पक्षाचा कार्यकर्ता आहे, तुम्ही माझे नेते आहात, तुमच्या शब्दाच्या बाहेर कधी गेलो आहे का?
गोटे : नागपूरला येताना जुनी करन्सी आणू नको, नवीन करन्सी आण. जुन्या करन्सीला कुणी बाप हात लावत नाही. आदेशाचा कागद घेऊन जा, मुंबई क्राईम ब्रॅंच माझ्या खिशातच आहे. मोपलवार मला सारखे फोन करतोय.
भिसे : आपण फोनवर जास्त नको बोलायला, समोरासमोर बोलू, माझे फोन टॅप होताहेत ना.
गोटे : मी कुणाच्या बापाला घाबरत नाही.
भिसे : साहेब, तुम्ही जी लक्षवेधी करणार होते ती आता नाही करणार ना?
गोटे : लक्षवेधी करणार आहे. ...नाही सांगितले तर नाही करणार.
भिसे : सकाळी निघताना फोन करतो. तुम्ही कुठे असाल?
गोटे : मी हाऊसमध्ये असेल. केळकरचा नंबर तुला दिला आहे. त्याच्याशी संपर्क साध.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com