जैताणे शिवारात आढळला कुजलेला मानवी सांगाडा

प्रा. भगवान जगदाळे
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री)  शिवारात नंदुरबार रोडलगत साईबाबा मंदिराच्या पश्चिमेला एका शेताला लागून असलेल्या रस्त्यावरील नाल्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे माती वाहून गेल्याने खड्डे निर्माण होऊन जमिनीत पुरलेला मानवी मृतदेहाचा हाडांचा सांगाडा अर्धवट उघडा झालेला आढळून आल्याने खळबळ उडाली. दरम्यान हा खुनाचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री)  शिवारात नंदुरबार रोडलगत साईबाबा मंदिराच्या पश्चिमेला एका शेताला लागून असलेल्या रस्त्यावरील नाल्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे माती वाहून गेल्याने खड्डे निर्माण होऊन जमिनीत पुरलेला मानवी मृतदेहाचा हाडांचा सांगाडा अर्धवट उघडा झालेला आढळून आल्याने खळबळ उडाली. दरम्यान हा खुनाचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

शेतकरी साहेबराव अभिमन सोनजे (वय 34) यांना दोन दिवसांपूर्वी सकाळी सातच्या सुमारास हा सांगाडा दिसला. त्यांनी निजामपूर पोलीसांना कळविल्यानंतर तहसीलदार संदीप भोसले, निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर, उपनिरीक्षक अनिल पाटील, उपनिरीक्षक हेमंत मोहिते, पोलीस नाईक कांतीलाल अहिरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल आकडे, डॉ. जी.जी. वळवी आदी घटनास्थळी दाखल झाले व जागीच घटनेचा पंचनामा केला. उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश सोनवणे यांनीही प्रत्यक्ष भेट देत घटनेची माहिती घेतली.
जैताणे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. जी. वळवी व डॉ. अनिल आकडे यांनी कुजलेल्या हाडांची प्राथमिक तपासणी केली. त्यानंतर सीलबंद करून हाडांचे नमुने व अवशेष मुंबई येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. डी. एन. ए. चाचणीसह अन्य अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नक्की कारण, वयोगट, स्त्री की पुरुष, किती वर्षांपूर्वीचा सांगाडा आहे आदी बाबी स्पष्ट होतील, असे त्यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

शेतकरी साहेबराव सोनजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, निजामपूर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश सोनवणे, सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल पाटील घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

ग्रामस्थांची सखोल चौकशीची मागणी...
गेल्या वर्षीच जैताणे येथील गोकुळ मुरलीधर न्याहळदे हा विवाहित तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी निजामपूर पोलीस ठाण्यात दिली होती. परंतु नातेवाईकांसह सगळीकडे शोध घेऊनही अद्याप त्याचा तपास लागलेला नाही. त्यामुळे त्याचा घातपात झाला असावा व सदर हाडांचा सांगाडा हा त्याचाच असावा अशी शक्यता बेपत्ता गोकुळच्या कुटुंबीय व नातेवाईकांसह काही ग्रामस्थांनी वर्तविल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. तसेच यावेळी पोलिसांवर दिरंगाईचा आरोपही काही ग्रामस्थांनी केला. घटनास्थळासह पोलीस ठाण्यात एकच गर्दी झाली होती. घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली. तहसीलदार संदीप भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश सोनवणे, सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर यांनी घटनेची त्वरित सखोल चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले.