जैताणेतील गणेश मंडळांवर दुःखाचे सावट; दोन तरुणांचा अकाली मृत्यू

प्रा. भगवान जगदाळे
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

"अधिकृतपणे नोंदणी करण्याची जबाबदारी ही प्रत्येक गणेश मंडळाची असून ज्यांनी नोंदणी केली नसेल त्यांनी ताबडतोब नोंदणी करून घ्यावी. अन्यथा ती गणेश मंडळे अनधिकृत ग्राह्य धरण्यात येतील."
- दिलीप खेडकर, सहाय्यक निरीक्षक, पोलिस स्टेशन, निजामपूर-जैताणे

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : जैताणे (ता.साक्री) येथील विकी जिभाऊ जाधव (वय 18) व अशोक (पिंटू) आनंदा पगारे (वय 27) या माळी व धनगर समाजातील दोन्ही तरुणांच्या अकाली निधनामुळे गावातील बहुतेक गणेश मंडळांनी गणेशाची स्थापना करणे रद्द केले असून आतापर्यंत निजामपूर-जैताणेतून केवळ 5 गणेश मंडळांची अधिकृत नोंदणी झाली आहे.

तर ज्या मंडळांनी श्रीगणेशाची स्थापना करायचा निर्णय घेतला आहे. त्यांनीही साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. मागील वर्षी निजामपूर-जैताणेतून 12 मंडळांनी श्रीगणेशाची स्थापना केली होती. माळमाथा परिसरातील आमखेल, खोरी, टिटाणे, छडवेल-कोर्डे, बळसाणे, जामकी व डोमकाणी आदी गावांसह बहुतेक गावांमध्ये "एक गाव एक गणपती" ही संकल्पना राबविण्यात येत असल्याने गणेश मूर्ती विक्रीवरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

सध्या 'जीएसटी'मुळे रंगांचे भाव वाढल्याने मूर्तींच्या किमतीही किमान दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत. अशी प्रतिक्रिया मूर्ती विक्रेत्यांनी दिली आहे.