धुळे: छेडछाडीला कंटाळून युवतीची आत्महत्या

प्रा. भगवान जगदाळे
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

शाळा-महाविद्यालयांत व गावातील मुख्य चौकांत सीसीटीव्ही कमेरे बसविण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. विशेषतः शाळा-महाविद्यालये भरताना, मधल्या सुटीत व शाळा सुटताना शालेय परिसरात व प्रवेशद्वारांजवळ टवाळखोर व रोडरोमिओंची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे विद्यार्थिनींची छेड काढण्याचे प्रकारही काही वेळा घडतात. अशा टवाळखोर व रोडरोमिओंचाही कठोर बंदोबस्त करण्याची मागणीही पालक वर्गातून जोर धरू लागली आहे.

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : जैताणे (ता.साक्री) येथील सावता चौकातील रहिवासी व येथील आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाची बारावी कला शाखेची विद्यार्थिनी कोमल सुनील वाघ (वय 18) हिने गल्लीतीलच एका तरुणाच्या छेडछाडीस कंटाळून गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

सकाळी नेहमीप्रमाणे कोमलचे आई-वडील शेतात कामाला गेले होते. गेल्या अनेक दिवसांपासून गल्लीतीलच तुषार राजेंद्र जाधव हा कोमलशी अंगलट करत होता व तिची छेड काढून जाणूनबुजून त्रास देत होता. त्यामुळे तिची गल्लीत बदनामी होत होती. म्हणून ती बऱ्याच दिवसांपासून तणावाखाली वावरत होती, जेवणदेखील करत नव्हती व तसे तिने वडील सुनील वाघ यांना बोलूनही दाखवले होते. याबाबत कोमलच्या कुटुंबीयांनी त्रास न देण्याबाबत तुषार जाधव ह्यास यापूर्वी समजही दिली होती. आज सकाळी कोमलने वडिलांना पुन्हा संबंधित त्रासाबद्दल फोनवरून कळवले. विनाकारण बदनामी व त्रास असह्य झाल्यामुळे मी आत्महत्या करतेय असे सांगून तिने फोन बंद केला. त्यामुळे वडील सुनील चैत्राम वाघ व काका सतीश चैत्राम वाघ यांनी ताबडतोब एकमेकांशी फोनवरून संपर्क केला व त्यांनी तातडीने शेतातून घरी येऊन पाहिले असता कोमल ही घराच्या छताला दोर बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.

त्यांनतर याबाबत ताबडतोब निजामपूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पोलिसांना पाचारण करण्यात आले. सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर व उपनिरीक्षक अनिल पाटील हे ताबडतोब पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह जैताणे आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी शोकाकुल वातावरणात कोमलवर जैताणे येथील स्मशानभूमीत अंतिमसंस्कार करण्यात आले. सतीश वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित तुषार राजेंद्र जाधव याच्याविरुद्ध निजामपूर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

सरपंच संजय खैरनार, ग्रामपंचायत सदस्य नवल खैरनार, ईश्वर न्याहळदे, सुरेश सोनवणे आदींसह ग्रामस्थांनी घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे...

शाळा-महाविद्यालयांत व गावातील मुख्य चौकांत सीसीटीव्ही कमेरे बसविण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. विशेषतः शाळा-महाविद्यालये भरताना, मधल्या सुटीत व शाळा सुटताना शालेय परिसरात व प्रवेशद्वारांजवळ टवाळखोर व रोडरोमिओंची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे विद्यार्थिनींची छेड काढण्याचे प्रकारही काही वेळा घडतात. अशा टवाळखोर व रोडरोमिओंचाही कठोर बंदोबस्त करण्याची मागणीही पालक वर्गातून जोर धरू लागली आहे.