ग्रामसभेत शाब्दिक खडाजंगी; दोनच विषयांवर गुंडाळली सभा

प्रा. भगवान जगदाळे
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

ग्रामसभेत नियोजनाचा अभाव...
येथील ग्रामविकास अधिकाऱ्याला मागील महिन्यात निलंबित करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर नुकतेच रुजू झालेले ग्रामविकास अधिकारी श्री. पवार यांना येथील कोणत्याच प्रश्नांची माहिती नसल्याने तेही समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. वास्तविक ग्रामसभेत पूर्वनियोजित, अर्ज दिलेल्या विषयांवर आधी चर्चा झाली पाहिजे व शेवटी आयत्यावेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा झाली पाहिजे. पण तशा प्रकारचे कोणतेही नियोजन दिसून आले नाही.

निजामपूर-जैताणे(धुळे) : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर निजामपूर येथील ग्रामपंचायत सभागृहात बोलाविण्यात आलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांच्यात विकासकामांवरून जोरदार शाब्दिक खडाजंगी उडाली. सार्वजनिक स्वच्छतागृह व सार्वजनिक शौचालये एवढया दोनच मुद्द्यांवर ग्रामसभा गुंडाळावी लागली.

सरपंच साधना राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत प्रभाग क्रमांक तीनमधील दमदम्याजवळील पाडलेले सार्वजनिक स्वच्छतागृह (मुतारी) त्याच जागेवर बांधण्यात यावे यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तर ग्रामपंचायत प्रशासनाने शॉपिंगसह स्वच्छतागृह आहे त्याच जागेवर बांधण्याचे आश्वासन दिले. तरीही ग्रामस्थांचे समाधान न झाल्याने वाद विकोपाला गेला.

त्यांनतर प्रभाग क्रमांक एकमधील भिलाटीतील रहिवाशांनी सार्वजनिक शौचालये बांधण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना पुन्हा चांगलेच धारेवर धरले. परंतु एका बाजूला स्वच्छ भारत अभियानांतर्गत शासन घरोघरी शौचालये बांधण्याचा प्रचार आणि प्रसार करत असून शौचालयांसाठी ग्रामपंचायतीमार्फत गरजूंना प्रत्येकी बारा हजाराचे वैयक्तिक शौचालय अनुदान उपलब्ध करून देत आहे. त्याचा लाभ घेणे गरजेचे असताना सार्वजनिक शौचालये कशासाठी हवीत. असा सवाल ग्रामपंचायत प्रशासनाने उपस्थित केला. तर ग्रामस्थांनी आधी पाण्याची समस्या सोडवा. वैयक्तिक शौचालये बांधल्यास पाणी कसे पुरेल असा उलटप्रश्न केला. त्यामुळे सभेत चांगलाच गोंधळ उडाला. सरपंच साधना राणे, उपसरपंच रजनी वाणी, माजी सरपंच अजितचंद्र शाह, जिल्हा परिषद सदस्या उषा ठाकरे, पंचायत समिती सदस्य वासुदेव बदामे, रमेश वाणी, युसूफ सय्यद, सलीम पठाण, प्रविण वाणी, परेश वाणी, दीपक देवरे, जाकीर तांबोळी, सुनील बागले, विजय राणे, महेश राणे, मिलिंद भार्गव आदींसह ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामस्थांची समज काढण्याचा प्रयत्न केला. पण कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी एवढया दोनच विषयांवर सत्ताधाऱ्यांना ग्रामसभा गुंडाळावी लागली. सामाजिक कार्यकर्ते भय्या गुरव यांनी स्मशानभूमीत अजून एक शेड बांधण्याची व इंदिरा नगरसाठी वेगळी स्मशानभूमी मंजूर करण्याची मागणी केली. तर दिव्यांग बांधव श्री.राणे यांनीही ग्रामपंचायत दिव्यांगांना सहकार्य करत नसल्याचा आरोप केला.

ग्रामसभेत नियोजनाचा अभाव...
येथील ग्रामविकास अधिकाऱ्याला मागील महिन्यात निलंबित करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर नुकतेच रुजू झालेले ग्रामविकास अधिकारी श्री. पवार यांना येथील कोणत्याच प्रश्नांची माहिती नसल्याने तेही समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. वास्तविक ग्रामसभेत पूर्वनियोजित, अर्ज दिलेल्या विषयांवर आधी चर्चा झाली पाहिजे व शेवटी आयत्यावेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा झाली पाहिजे. पण तशा प्रकारचे कोणतेही नियोजन दिसून आले नाही.

ग्रामपंचायतीतर्फे स्वच्छतागृह बांधकाम सुरू...
ग्रामसभेतील प्रभाग क्रमांक तीनमधील ग्रामस्थांचा विरोध पाहता ग्रामपंचायत प्रशासनाने दुसऱ्याच दिवशी ताबडतोब स्वछतागृह बांधकामास सुरुवात केली आहे.

ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने व एकेकाने प्रश्न विचारणे आवश्यक असताना अशा प्रकारे गोंधळ व धुडगूस घालणे चुकीचे आहे. त्यामुळे गावाच्या विकासाला खीळ बसते. विरोधकांनी लोकशाही मार्गाने आपले प्रश्न मांडावे.
- साधना राणे, सरपंच, निजामपूर ग्रामपंचायत

विरोधक ग्रामसभा उधळून लावण्यासाठी मुद्दामहून काही लोकांना हाताशी धरून षडयंत्र रचतात व गोंधळ घालतात. ग्रामपंचायतीत विकासकामांसाठी निधी आणणे जास्त गरजेचे आहे.
- युसूफ सय्यद, सामाजिक कार्यकर्ते