पासबुकसाठी तीनदा भुर्दंड, परतावा एकदाच, तोही अपूर्ण...

भगवान जगदाळे
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

बँकेने एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तब्बल तीनदा कपात केली. 

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील सेंट्रल बँक शाखेने नवीन पासबुकसाठी एका ग्राहकास तीनदा आर्थिक भुर्दंड आकारून 'बँकेच्या अजब कारभाराची' प्रचिती आणून दिली. विशेष म्हणजे ग्राहकाने तक्रार केल्यानंतरही बँक प्रशासनाने केवळ एकदाच परतावा देऊन अनागोंदीचा कळसच गाठला.

जैताणे येथील सावता चौकातील रहिवासी रामदास दगा भदाणे यांचे सेंट्रल बँक शाखेत बचत खाते आहे. ते वयोवृद्ध, पेन्शनर आहेत. जुने पासबुक भरल्याने त्यांनी 24 ऑक्टोबरला बँकेकडे नवीन पासबुकची मागणी केली. त्यानुसार त्यांना नवीन पासबुकही देण्यात आले. बँकेने ऑनलाईन प्रणालीद्वारे त्यांच्या बचत खात्यातून 100 रुपये पासबुक शुल्क व 18 रुपये जीएसटी शुल्क असे एकूण 118 रुपये एवढी रक्कम परस्पर कपात केली. परंतु ही रक्कम बँकेने एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तब्बल तीनदा कपात केली. म्हणजे 118 रुपयांऐवजी तब्बल 354 रुपये कपात करण्यात आली. ही बाब श्री. भदाणे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 तारखेला बँक कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी नजरचुकीने कपात झाल्याचे मान्य करत केवळ 100 रुपये एवढीच रक्कम श्री. भदाणे यांच्या खात्यावर जमा केली. वास्तविक तीन वेळा प्रत्येकी 100 रुपये (नवीन पासबुक शुल्क) व तीन वेळा प्रत्येकी 18रुपये (जीएसटी शुल्क) असे एकूण 354रुपये कपात केल्यानंतर श्री. भदाणे यांना बँकेने 236 रुपये परतावा देणे आवश्यक असताना बँकेने केवळ 100 रुपये परतावा देऊन ग्राहकाची बोळवण केली.

ग्राहकाने उर्वरित 136 रुपयांचे काय? अशी विचारणा केली असता उर्वरित रक्कम तुमच्या खात्यावर नंतर जमा करू असे सांगून वेळ निभावून नेली. केवळ नवीन पासबुक शुल्कच नाही तर 'जीएसटी' शुल्कसुध्दा तीन वेळा कपात केले आहे. आता कुंपणानेच शेत खाल्ले तर दाद मागावी कुणाकडे? अशी रामदास भदाणे यांची अवस्था झाली आहे. शेवटी श्री. भदाणे यांनी पासबुकच्या लेखी पुराव्यासह 'सकाळ'कडे आपली कैफियत मांडली. आपल्याला जो त्रास झाला तो इतर अशिक्षित, वयोवृद्ध ग्राहकांना होऊ नये व यापुढे असा प्रकार घडू नये. अशी अपेक्षा त्यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :