दाभोळकर, पानसरेंच्या हत्येची सखोल चौकशी करा : जैताणे ग्रामसभेत ठराव

प्रा. भगवान जगदाळे
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

जैताणे ग्रामपंचायतीचा ग्रामसभेतील ठराव 'अंनिस'कडे सुपूर्द, ठराव करुन देणारी तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत...

निजामपूर-जैताणे (धुळे) : शासनाने "अंनिस"चे राज्याध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोळकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करणारा ठराव ग्रामसभेत एकमताने मंजूर करून तो 'अंनिस'च्या निजामपूर-जैताणे शाखेला सोपविणारी माळमाथा परिसरातील जैताणे ग्रामपंचायत ही असा ठराव पारित करुन देणारी तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. 'अंनिस'चे शाखा कार्याध्यक्ष प्रा.भगवान जगदाळे सूचक होते तर प्रकाशन कार्यवाह चंद्रकांत पवार अनुमोदक होते.

सरपंच संजय खैरनार यांच्या हस्ते सदर ठराव काल निजामपूर-जैताणे शाखेला सुपूर्द करण्यात आला. शाखेच्या वतीने कार्याध्यक्ष प्रा.भगवान जगदाळे व प्रकाशन कार्यवाह चंद्रकांत पवार यांनी ग्रामपंचायत कार्यालयात हा ठराव स्वीकारला. यावेळी साक्री पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जे.पी. खाडे, ग्रामविकास अधिकारी योगेंद्र सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर न्याहळदे, वरिष्ठ लिपिक यादव भदाणे, जाकीर सय्यद, प्रदीप भदाणे, योगेश बोरसे, अनिल बागुल आदी उपस्थित होते.

डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला चार वर्षे तर कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला अडीच वर्षे पूर्ण होऊन देखील अजून त्यांचे मारेकरी मोकाटच आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात 20 जुलै ते 20 ऑगस्ट पर्यंत 'अंनिस'च्या वतीने "जवाब दो" आंदोलन छेडण्यात आले आहे. शासनाला व पोलीस प्रशासनाला जागे करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील व गावागावातील शाखांना तसे कळविण्यात आले आहे. "अंनिस"चे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, प्रधान सचिव माधव बावगे, सुशीला मुंढे, मिलिंद देशमुख, प्रशांत पोतदार आदींसह महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर नुकतीच जैताणे ग्रामपंचायत कार्यालयात 'अंनिस'चे राज्याचे उपाध्यक्ष विनायक सावळे व निजामपूर-जैताणे शाखाध्यक्ष डॉ. रमाकांत शिरोडे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जैताणेचे सरपंच संजय खैरनार होते. तर जिल्हा प्रधान सचिव प्रा.दीपक बाविस्कर, जिल्हा शाखा प्रधान सचिव व प्रभारी जिल्हा कार्याध्यक्ष रणजित शिंदे, जिल्हा युवा कार्यवाह किरण ईशी, महिला प्रतिनिधी प्रज्ञा तायडे-ईशी, जिल्हा परिषद सदस्या व महिला संघटक उषा ठाकरे, जिल्हा सांस्कृतिक कार्यवाह अनिल सोनवणे आदींसह शाखेचे कार्याध्यक्ष प्रा.भगवान जगदाळे, प्रधान सचिव दत्तात्रय महाजन, प्रसिद्धी प्रमुख रघुवीर खारकर, प्रशिक्षण कार्यवाह सुनील शाह, प्रकाशन कार्यवाह चंद्रकांत पवार, डॉ. हरिभाऊ ठाकरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सरपंच संजय खैरनार यांनी ग्रामपंचायत 'अंनिस'च्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असे आश्वासन दिले. त्यांनतर क्षणाचाही विलंब न करता ग्रामसभेत सर्वानुमते हा ठराव मंजूर करून घेतला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सरपंच संजय खैरनार यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले व त्यांचे आभारही मानण्यात आले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: dhule news jaitane dabholkar, pansare murder probe demand