'जैताणेच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार दिल्यास रस्त्यावर उतरणार'

jaitane
jaitane

निजामपूर : जैताणे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी योगेंद्र सोनवणे यांना निजामपूर ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार दिल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा सरपंच संजय खैरनार यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाला दिला आहे. यासंदर्भात साक्रीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार यांना दूरध्वनीवरून त्यांनी घेतलेल्या निर्णयावर फेरविचार करावा अन्यथा रस्त्यावर उतरू असा सज्जड इशारा दिला.

निजामपूर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विश्वास नवाणकर यांना दप्तरतपासणी दरम्यान कामात अनियमितता व दप्तर दिरंगाईमुळे धुळे जिल्हा परिषदेचे 'सीईओ' डी. गंगाथरन यांनी 26 जुलैला तडकाफडकी निलंबित केले होते. त्यांनतर श्री. नवाणकर यांना कार्यालयीन वेळेत कार्यमुक्त करून निलंबन काळात शिंदखेडा पंचायत समिती हे मुख्यालय नेमण्यात आले. 'सीईओं'च्या 27 जुलैच्या आदेशानुसार गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार यांनी निजामपूर ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्याचा लेखी आदेश जैताणेचे ग्रामविकास अधिकारी योगेंद्र सोनवणे यांना दिला. परंतु श्री. सोनवणे यांनी सदर कार्यभार स्वीकारण्यास असमर्थता दर्शवत दुसऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याकडे निजामपूर ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार सोपवावा असा लेखी अर्ज 31 जुलैला गटविकास अधिकाऱ्यांना दिला. त्यात त्यांनी निजामपूर व जैताणे या दोन्ही गावांची लोकसंख्या प्रत्येकी सुमारे 20 ते 25 हजाराच्या घरात असून दोन्हीही गावे मोठी असल्याने तेथील ग्रामस्थांना न्याय देता येणार नसल्याचे नमूद केले आहे.

निलंबित ग्रामविकास अधिकारी नवाणकर यांना निजामपूर व दुसाणे अशा दोन ग्रामपंचायतींचा कार्यभार देण्यात आला होता. त्यापैकी निजामपूर ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार श्री.सोनवणे यांच्याकडे तर दुसाणे ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार इंदवे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी पी. बी. मोराणे यांच्याकडे देण्यात आला आहे. यासंदर्भात जैताणेचे सरपंच व धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संजय खैरनार हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते व मुख्य कार्यकारी अधिकारी डी. गंगाथरण यांच्याकडेही आपली कैफियत मांडणार असून मागणी मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरु. अशी प्रतिक्रिया त्यांनी 'दैनिक सकाळ'शी बोलताना दिली. दोन्ही गावे तालुक्यातील मोठी गावे असून एकाच माणसाकडे दोन्ही गावांचा कार्यभार  सोपविल्यास जनतेची कामे खोळंबतील. असेही त्यांनी नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com